मुक्ता गरसोळे response.lokprabha@expressindia.com

साताऱ्यापासून ४४ किलोमीटरवर असलेल्या औंध संस्थानाजवळच्या डोंगरावर यमाई देवीचे मंदिर आहे. हे मंदिर आणि औंध येथील प्रसिद्ध वस्तुसंग्रहालय पाहणं हा अनोखा योग आहे. 

Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
Hanuman mandir in pakistan | A 1500 Year Old Shri Panchmukhi Hanuman Mandir Is In Karachi Pakistan
पाकिस्तानातील १५०० वर्षे जुने श्री पंचमुखी हनुमानाचे मंदिर तुम्हाला माहितीये का?
14 injured in mahakal temple fire in mp
महाकाल मंदिरातील आगीत १४ जखमी

भाविकांना देवदर्शनाबरोबरच निसर्गसहवास असा दुहेरी सुवर्णयोग साधायचा असेल तर साताऱ्याजवळील औंध येथील यमाई देवीच्या दर्शनाला जायला हवे. पावसाळ्यानंतर आणि नवरात्राच्या आधी या टिकाणी दर्शनाला गेलं तर अत्यंत शांत, कोलाहल, गर्दी नसलेल्या निसर्गरम्य वातावरणात आई यमाईचे दर्शन होते.

नमो देव्यै महादेव्यै

शिवायै सततं नम:

नम: प्रकृति भद्राणि नियता:

प्रणता स्म ताम्।

पुणे-सातारा हायवेने गेल्यानंतर रहिमतपुरामार्गे साताऱ्यापासून ४४ किमी असणाऱ्या औंध संस्थानात आपण येऊन पोहोचतो. औंेध संस्थानचे राजे पंत प्रतिनिधी यांच्या उदार कलाश्रयामुळे औंेध ही एक सांस्कृतिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. औंध येथील डोंगरावरील मूळ पीठ असणाऱ्या यमाई मातेच्या दर्शनाला जाण्यापूर्वी खाली गावातील यमाईच्या स्थानाचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे. गावातील हे स्थानही प्रशस्त असा सभामंडप आणि बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी काढलेल्या रंगीत तैलचित्रांमुळे वैशिष्टय़पूर्ण आहे. या ठिकाणी असणारी राज्यातील सर्वात उंच दीपमाळ लक्ष वेधून घेते. रामायण, महाभारत, शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित मोठय़ा आकाशाची रंगीत तैलचित्रे म्हणजे उत्कृष्ट अशा जिवंत चित्रकलेचा नमुनाच म्हणावी लागतील. त्यांचे आकर्षक रंग, प्रवाही शैली, जिवंत वाटणारे हावभाव बघताना मन मोहून जाते. काचेची मोठी झुंबरे ही गतवैभवाची साक्ष देणारी आहेत. गावातील या देवीची मूर्ती ‘प्रसन्नवदना’ आहे. छोटय़ा गाभाऱ्यातील या प्रदक्षिणामार्गात देवीच्या स्थानाखाली एक भुयार दिसते. चार-पाच पायऱ्या उतरून आता गेल्यास महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेता येते. प्रसन्न अशा देवीदर्शनाबरोबर उत्कृष्ट अशा तैलचित्रांचा चित्रानुभव घेऊन आपण बाहेर पडतो, मूळपीठ असणाऱ्या डोंगरावरील यमाईमातेच्या दर्शनाला. या संपूर्ण परिसरात शहरात दुर्मीळ झालेला चिमण्यांचा चिवचिवाट अखंड कानावर पडत होता हे विशेष.

यमाई या देवीच्या नावांची कथा अशी सांगतात की, फार प्राचीन काळी शंकर-पार्वती सारिपाट खेळत असताना कुणाचा तरी शोक करण्याचा आवाज त्यांना आला. पार्वतीने विचारल्यावर शंकरांनी सांगितले की, श्रीराम सीतेच्या शोधात निघाले आहेत. श्रीराम तर दैवी पुरुष आहेत. मग कसला शोक? कसला शोध? असा विचार करून पार्वतीने त्यांची परीक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप घेतले. परंतु प्रभू श्रीरामांनी सीतेच्या रूपातील पार्वतीला येताना बघून तिला ओळखून ‘ये माई’, तू इथे कशी?’ असे विचारले. पार्वती त्या ठिकाणी अंतर्धान पावली आणि तेव्हापासून त्या ठिकाणी ‘यमाई’ रूपात प्रकट झाली, असे मानतात.

हे मंदिर डोंगरावर आहे. तिथे जाण्यासाठी पायऱ्या-पायऱ्यांचा, भरपूर झाडं आणि सावली असलेला सुंदर रस्ता आहे. तसेच गाडीनेही वपर्यंत जाता येते. काळ्या पाषाणातील दोन मीटर उंच असणाऱ्या या देवीचे भव्य आणि काहीसे उग्र रूप पाहून भाविक नतमस्तक होतो.

‘तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया’.. त्रिशूल, डमरू, गदा, बाण हातात घेतलेल्या देवीच्या मांडी घालून बसलेल्या उंच मूर्तीकडे पाहून हीच भावना मनात उमटते. या गाभाऱ्याशेजारीच देवीचे शेजघरही आहे. देवीची मूर्ती भव्य आहे. मूर्तीसमोरच तांदळा आहे. छोटय़ाशा पण थंडगार अशा गाभाऱ्यात देवीसमोर बसल्यावर पावित्र्य, प्रसन्नता, भक्तीच्या भावनेने मन अगदी भरून येते.

समुद्रसपाटीपासून तीन हजार ३०० फुटांवर असणारे हे मंदिर सातव्या शतकात बांधले असावे असे मानले जाते. पंतप्रतिनिधी घराण्यातील लोकांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून सोन्याचा कळसही बसविला आहे. हे मंदिर शिवलिंगाच्या आकाराचे असून प्रथमदर्शनी एखाद्या गड किंवा किल्ल्याप्रमाणेच याचे प्रवेशद्वार दिसते. देवीच्या मंदिराभोवती असणाऱ्या दगडी तटबंदीवरून फिरत फिरत आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते. मंदिरातील ओवऱ्यांमध्ये क्षणभर विसावता येते. भिंतीत असणारे दगडी फिरते खांब बघून तत्कालीन वास्तुकलेविषयी अभिमान वाटतो. पूर्वाभिमुख आणि कमळात बसलेल्या या यमाई मातेलाच साखरगड निवासिनी असेही म्हणतात.

असे सांगतात की, पुराणकाळात अंबऋ षी मोरण तीर्थ परिसरात तप आणि यज्ञ करीत असताना मायावी विद्या येणाऱ्या औंधासुर राक्षसाने त्यांच्या यज्ञात विघ्ने आणायला सुरुवात केली. तेव्हा यमाई मातेने त्याच्याशी घनघोर युद्ध केले आणि त्याला ठार मारले. मरताना मात्र औंधासुराने देवीजवळ आपली चूक कबूल केली आणि आपले नाव अमर राहावे अशी इच्छा व्यक्त केली.  त्या वेळी यमाई मातेने त्याची इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून त्या नगरीला ‘औंधा’ म्हणून ओळखले जाऊ लागले, अशी औंध या गावाच्या नावाची कथा सांगितली जाते. आजही या औंधासुराच्या कापलेल्या मस्तकाचे छोटे देऊळ मंदिर परिसरात बघायला मिळते

‘जय देवी आदिशक्ती, सुंदर सगुण मूर्ती आरती ओवाळितो, मनी उत्साह प्राप्ती’ अशी यमाई मातेची आरती म्हणत मंदिरातून पायऱ्या उतरून खाली आले की समोर दिसते, औंधनगरीचे सांस्कृतिक वैभव असणारे भवानी म्युझियम. १९-२० व्या शतकातील थोर अशा भारतीय कलाकारांच्या कलेचे (चित्रकला, शिल्पकला) दुर्मीळ नमुने इथे बघायला मिळतात. एम. व्ही. धुरंधर, बाबूराव पेंटर, माधव सातवळेकर, राजा रवी वर्मा या महान कलाकारांच्या कलाकृती हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे वैभव आहेत.

औंध नगरीची अशी ही भेट देवदर्शन, निसर्गसान्निध्य, आणि कलानुभव असा तिहेरी उत्कट अनुभव दिल्याने संस्मरणीय ठरते. ‘जे जे सुंदर आणि शुभंकर, पूर्णत्वा ते नेई’ अशी आर्त साद यमाई मातेला घालत आपण परतीच्या वाटेला लागतो.

मोकळाई तीर्थ

औंधासुराला ठार मारल्यानंतर यमाई मातेच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. त्या स्वच्छ करण्यासाठी आणि स्नानासाठी  देवी केस मोकळे सोडून येथील तळ्यात उतरली. तेव्हापासून तिला ‘मोकळाई’ असेही म्हणतात. आजही या दगडी बांधणीच्या प्रशस्त मोकळाई तलावात पाय धुवून मग देवीदर्शनाला जाण्याची प्रथा आहे.