08 March 2021

News Flash

बालीपलीकडचा इंडोनेशिया

आपल्या पर्यटनाच्या यादीत इंडोनेशियाचा उल्लेख येतो तो बालीपुरताच.

इंडोनेशिया म्हटलं की डोळ्यासमोर अनेक नयनरम्य बेटांचं बालीच येतं, पण त्याहीपलीकडे इंडोनेशियाला सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे आणि तो त्यांनी चांगल्या प्रकारे जोपासलादेखील आहे.

एखाद्या देशाबद्दल आपल्या मनात काही एक प्रतिमा तयार झालेली असते. कधी ती त्याबद्दल वाचून, तर कधी ऐकीव गोष्टींमुळे, पण प्रत्यक्षात अनेक वेगळ्या गोष्टी समोर येतात. अर्थात चार -आठ दिवसांच्या भटकंतीत असं काही अनुमान काढता येत नसतं. त्यातही तब्बल पाच हजार किलोमीटर लांबीचा आणि १७ हजार बेटांनी बनलेला इंडोनेशियासारखा खंडप्राय देश असेल तर आणखीनच कठीण म्हणायला हवं, पण तरीदेखील त्या पाच-सात दिवसांच्या भटकंतीतून एक जाणीव होते. निदान उघडय़ा डोळ्यांना जे काही दिसतं त्यातून नक्कीच काही तरी वेगळं समोर येतं आणि मग त्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते. असंच काहीसं इंडोनेशियाबद्दल म्हणावं लागेल.

आपल्या पर्यटनाच्या यादीत इंडोनेशियाचा उल्लेख येतो तो बालीपुरताच. पुरातन वास्तूंची आवड असेल तर बोरोबुद्दूर, प्रांबनन ही नावं ऐकलेली असतात, पण त्यापलीकडचा इंडोनेशिया माहीत नसतो. ‘आपलीच संस्कृती आहे तेथे, हिंदूंचंच राज्य होतं.’  किंवा ‘अरे, तो तर मुस्लीम देश आहे, तेथे काय पाहणार’ अशी अनेक उलटसुलट विधानंदेखील ऐकायला मिळतात. पण इंडोनेशिया आपल्या अशा अनेक समजांना थेट तडा देणारा आहे. आपल्यासारखाच त्याचा भौगोलिक विस्तार प्रचंड आहे. अनेक प्रांत, अनेक भाषा अशी विविधता त्यात आहे, पण त्यातदेखील काही गोष्टी नक्कीच वेगळ्या आहेत.

इंडोनेशियात उतरल्यावर सुरुवातीला तरी आपल्याच देशातल्या एखाद्या किनारपट्टीच्या शहरात भटकतोय की काय अशी भावना होऊ लागते. जकार्तामध्ये तर मुंबईचाच भास होतो, पण जसं जसं या देशाच्या अंतर्गत भागात जाऊ लागतो तसा हा देश वेगळा वाटू लागतो. आपल्याकडचे आणि त्यांच्याकडचे अशी तुलना करायचा मोह टाळणं कठीण होत जातं. वारसा जपण्याची त्यांची धडपड जाणवते, आणि त्याचा पर्यटनात नेमका वापर करून घेण्याची व्यावसायिक प्रवृत्तीदेखील. ९० टक्के मुस्लीम लोकसंख्या असणारा, मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषित झालेला हा देश, पण याच देशानं मुस्लीम वारसा जितका जोपासला नाही त्यापेक्षाही अधिक हिंदू आणि बौद्ध धर्माचा वारसा जपला आहे. मुस्लीम देश असला तरी एकंदरीतच तेथील मोकळे वातावरण (किमान शहरातील तरी) पाहिल्यावर आपल्या देशात आपण नेमकं कोठे आहोत हा प्रश्न आपसूकच डोक्यात येतो. आपल्याकडे अब्रह्मण्यम् अशा सदरात टाकल्या जाणाऱ्या वर्तणुकीचा, राहणीमानाचा तेथे असणारा अगदी मोकळाढाकळा वापर आणि त्याच वेळी हे सारं मोठय़ा अभिमानाने तुम्हाला दाखवण्याची ओढ जपणारा असा हा देश तुम्हाला काही तरी नवं दाखवतो.

आता संपूर्ण देशाची व्याख्या करायची तर सुलावेसी, सुमात्रा, जावा, पप्पुवा, बाली अशा काही महत्त्वाच्या महाकाय बेटांनी तयार झालेली ही खंडप्राय अशी आकृती, पण या सर्वाचे एकत्रीकरण अत्यंत बेमालूमपणे केलं गेलंय. त्याची पहिली झलक अर्थातच जकार्ता या राजधानीच्या शहरात दिसते. मुंबईसारखंच असणारं हे शहर. एकीकडे गर्दीची दाटीवाटीची वस्ती, तर मध्य जकार्तामध्ये गगनचुंबी अशा कॉर्पोरेट कार्यालयीन इमारतींचा गजबजाट,  पण त्यातदेखील स्वत:चा वेगळा थाट मांडणाऱ्या आपल्याकडच्या मंगलोरी कौलारू वास्तूंची नजाकत काही औरच म्हणावी लागेल. विमानातूनच त्याची झलक दिसलेली असते.

येथील ३४ राज्यांची स्वत:ची स्लोगन ठरलेली आहे. जकार्ताची स्लोगन आहे, ‘द सिटी नेव्हर स्लीप.’ याबाबतीतदेखील हे मुंबईचं भावंडच म्हणावे लागेल. जुन्या जकार्तात एक छानसं जुनं बंदर आजदेखील टिकवून ठेवलेलं पाहिल्यावर नकळत कोकण किनारपट्टीवरच्या चौऱ्याऐंशी बंदरांची आजची स्थिती आठवते. त्याच ‘सुंदाकल्प’ बंदरावर त्यांचं खूप प्रेम आहे. मध्यम आकाराच्या बोटी येथे हारीने उभ्या असतात आणि आजूबाजूच्या बेटांवर छोटी-मोठी साधनसामग्री पोहोचवण्यात मग्न असतात.

जुन्या जकार्तात फिरताना जशी मुंबईतल्या फोर्टात फिरताना जुन्या इमारतींची शान जाणवते तसंच काहीसं घडतं. हा त्यांच्यावर राज्य केलेल्या डचांचा प्रभाव. याच जुन्या जकार्तात मुंबईतल्या एशियाटिक लायब्ररीसारखी पांढऱ्याधोप रंगातील भव्य प्राचीन वास्तू आहे. हे फताहिलाह म्युझिअम. समोर भला मोठा चौक. परदेशी तसेच स्थानिक पर्यटक मनमुक्तपणे फिरताहेत. रस्त्याच्या कडेला अगदी पद्धतशीरपणे ओळीने ठेवलेल्या रंगीबेरंगी सायकली ठेवल्या आहेत. अध्र्या तासाला ठरावीक रक्कम देऊन त्या भाडय़ाने मिळतात. पर्यटकांना आकर्षून घेणारी ही क्लृप्ती अफलातूनच म्हणावी लागेल.

असो, तर जकार्तात नोंद घेण्यासारख्या बाबी अनेक आहेत, पण दोन ठिकाणचा अनुभव मुद्दाम नोंदवावा लागेल. एक म्हणजे राष्ट्रीय संग्रहालय आणि दुसरे मोनास.

या देशात नेमकं काय आहे आणि काय नाही याची इत्थंभूत माहिती हवी असेल तर किमान अर्धा दिवस तरी या संग्रहालयात घालवावा लागेल. महत्त्वाच्या बेटांनुसार यात विभाग करण्यात आले आहेत. त्या त्या बेटावर काय घडलं, तेथे कोण राहायचं, काय खायचं, कसं वागायचं, मनोरंजनाची साधनं काय होती, घरं कशी होती अशी सगळी बैजवार मांडणी येथे दिसून येते. इंडोनेशियातील धार्मिक घडामोडीही दिसून येतात. एका विस्तीर्ण प्रांगणात आणि त्याच्याच व्हरांडय़ात उत्खननात सापडलेल्या शेकडो मूर्ती तुमचे लक्ष वेधून घेतात. शिल्पकलेचे इतके सारे नमुने पाहून डोळे विस्फारायलाच हवेत. तुम्ही देव मानत असा किंवा नसा, तुम्हाला मूर्तिकलेतलं काही कळत असो वा नसो, पण हे पाहिल्यावर त्या अनाम शिल्पकारांना दाद द्यावीशी वाटते. प्रवासाच्या सुरुवातीसच हे म्युझिअम पाहिले की या देशाचा नेमका आवाका तर कळतोच, पण पुढे जे पाहणार त्यासाठी एक वेगळी दृष्टी मिळते.

राष्ट्रीय संग्रहालयाच्या बाहेर हत्तीचा देखणा पुतळा आहे. त्यामुळे या इमारतीला गज्जा संग्रहालय म्हणूनदेखील ओळखले जाते. तर समोरच विस्तीर्ण मदानावर मोनास आहे. इंडोनेशियाचे स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून बांधलेली ही खास वास्तू.

येथे एक आधीच सांगायला हवं. एखाद्या पर्यटनस्थळाचे नियोजन कसं असावं याची तीन उदाहरणं तुम्हाला या देशात अगदी ठसठशीतपणे दिसतात. या तीनही वास्तू वेगवेगळ्या धर्मांशी निगडित आहेत. मोनास हे राष्ट्रीय स्मारक, बोरोबुद्दूर बौद्धांचे, तर प्रांबनन हिंदूंचे. तिघांचाही विस्तार मोठा. या तिन्ही वास्तूंमध्ये पर्यटकांना वावरण्यासाठी केलेली रचना वैशिष्टय़पूर्ण म्हणावी लागेल. एकच प्रवेशद्वार आणि बाहेर जाण्यासाठी एकच स्वतंत्र द्वार. आत आल्यावर किंवा निघताना एका विशिष्ट जागी खानपानाची सोय आणि स्थानमाहात्म्य दर्शविणाऱ्या वस्तूंच्या विक्रीची दुकानं. हे सारं मूळ वास्तूपासून एकदम दूरवर. त्यामुळे थेट वास्तूपाशी कसलाही गलका नाही, की कचरा नाही. त्यामुळे अर्थात या तीनही वास्तू अगदी अगदी स्वतंत्रपणे उभ्या राहिल्या आहेत.

मोनासची मुख्य वास्तू सरळसोट उंच गेलेली, पण आजूबाजूच्या जाणीवपूर्वक रिकाम्या ठेवलेल्या परिसरामुळे ही उंची अधिकच उठून दिसते.  मोनासला तर अर्धाएक किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी विशेष छोटी ट्रेनसेवा, तीदेखील अगदी मोफत आहे. पुन्हा थेट वास्तूच्या भोवताली वर्तुळाकार मोठी रिकामी जागा. वास्तूत प्रवेश करण्यासाठी भुयारी मार्ग आहे. वारसास्थळाच्या अगदी जवळच्या परिसराचं जे बेंगरूळ स्वरूप पाहण्याची आपल्याला सवय लागलेली असते तसं येथे काहीच  नाही. मोनासमध्ये स्वातंत्रलढय़ाशी निगडित अनेक घटना पाहता येतात. तर मोनासच्या सर्वोच्च सज्जातून मध्य जकार्ताचे विहंगम दृश्य भुरळ पाडते.

बाकी जकार्ता मजेत भटकायला म्हणून चांगले ठिकाण आहे. मंगा दुआ स्ट्रीट हा आपल्या येथील खाऊ -गल्लीसारखा, पण कैकपटीने मोठा आहे. तेथे इंडोनेशियातले बहुतांश राज्यांतील खाद्यपदार्थ मिळतात. अर्थात तुम्हाला सर्व प्रकारच्या मांसाहाराची आवड असेल तर तुमच्या जिभेचे सर्व प्रकारचे चोचले इथे पुरवले जातात. ठिकठिकाणी बीफचे गोळे उकडून ठेवलेले असतात. तर मेडन प्रांतातील खाद्यपदार्थाचा मोठा स्टॉल त्यातील रश्शांनी भरलेल्या डिशमुळे तुमचे लक्ष वेधून घेत असतो. कुठल्याही खाद्यपदार्थाची चव घेऊन बघायची तयारी असेल तर येथे मस्त आडवा हात मारायला हरकत नाही.

शहरातील वाहतूक व्यवस्था तुलनेनं चांगली आहे. सगळ्या बसेस् वातानुकूलित आणि मुख्य रस्त्यावर त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या विशेष मार्गावरून धावणाऱ्या आहेत. मार्गिकेत अन्य कोणाची घुसखोरी नसते हे विशेषच म्हणावे लागेल. मात्र कार्यालयीन वेळांनुसार होणारी वाहतूक कोंडी ही येथेदेखील अपरिहार्यच आहे.

म्युझिअम आणि मोनाससाठी एक दिवस, इतर जकार्तासाठी आणखीन एक दिवस खर्चून समुद्रकिनाऱ्यापासून थेट तीन साडेतीन हजार फुटावरलं बांडुग जवळ करता येतं. येथे रस्तामार्गे किंवा मस्त वातानुकूलित रेल्वेने पोहोचता येतं. शंभर सव्वाशे किलोमीटरसाठी झकास एक्स्प्रेस वे येथे आहे, पण रेल्वे तुलनेने अधिक आरामदायी आहे.

एक हिल स्टेशन म्हणून असायला हव्या अशा अनेक सुविधा येथे आहेत. पण एकंदरीत हे शहर गजबजललेलं आहे. आधीच प्रचंड भौगोलिक विस्तार त्यात पर्यटकांची गर्दी आणि मूळ बांडुगची विस्तारित लोकसंख्या यामुळे आजूबाजूची खेडीदेखील समाविष्ट झाली आहेत.

खरं तर आपल्याला हिल स्टेशनचं कौतुक तसं कमीच, पण येथे यायचं ते डोंगररांगेत दडलेली जिवंत ज्वालामुखीची विवरं पाहायला. आपल्याकडे नसणारं आणि आवर्जून पाहावं असं हे आकर्षण. एका आकडेवारीनुसार इंडोनेशिया जिवंत ज्वालामुखीची १२७ विवरं आहेत. एके काळी ज्वालामुखीने या देशात अनेक उलथापालथी केल्या आहेत. प्रांतच्या प्रांत दुसऱ्या बेटावर स्थलांतरित झाले. मात्र या देशाने नैसर्गिक आपत्तीचादेखील अगदी चपखलपणे पर्यटनासाठी उपयोग करून घेतला आहे. बांडुगपासून ३० किमीवर असणाऱ्या तांकुबन पराहू डोंगररांगेत उंचच उंच पाइन वृक्षांमधून विवरापर्यंत जाणारा व्यवस्थित बांधून काढलेला रस्ता, विवराच्या बाजूनं अगदी व्यवस्थित लाकडी भक्कम कुंपण घालून संरक्षित केलेला मार्ग, काही खास उंचावरची निरीक्षण ठिकाणं, असं सारं पर्यटनाला डोळ्यासमोर ठेवून केलेलं काम कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे या मार्गावर शेकडो दुकानं असूनदेखील कमालीच्या स्वच्छतेची नोंद घ्यावी लागेल.

येथे काही प्रशिक्षित मार्गदर्शक येथे आहेत. खास माहिती केंद्र आहे. पण स्थानिक  विक्रेत्याशी जरा सलगी केली की आपोआपच चार गोष्टी अधिक कळतात. असाच एक सय्यद नावाचा विक्रेता येथे भेटला. गेली सव्वीस वर्षे तो या विवराच्या भोवती व्यवसाय करतोय. विवरातील दगडापासून तयार केलेली खास ब्रेसलेट आणि गळ्यातले हार हा त्याचा मुख्य व्यवसाय. विवराच्या पलीकडच्या अंगाला त्याचं गाव आहे. अडीच एक हजार वस्तीचं हे सारं गाव या विवराच्या तीरावर विविध वस्तूंची विक्री करून गुजराण करतं. पर्यटनातून स्थानिकांना थेट रोजगार मिळवून देणारं उदाहरण खूप काही सांगणारं आहे.

इंडोनेशियन खाद्यपदार्थाची येथे रेलचेल तर आहेच, पण त्याचबरोबर कलाकुसरीचे विणकाम असणाऱ्या वस्तू, कपडे आणि खास बांबूची वाद्यं आणि वस्तू येथे मिळतात.  या विवराच्या काठावरच एक भन्नाट बांबू वाद्य तुमचे लक्ष वेधून घेत असते. त्याचं शास्त्र थोडय़ा उशिराने उलगडतं. विवराच्या बाबतीतदेखील पर्यटकांचं आणि दुकानांचं आयोजन हे अगदी नेटकं आहे. मोठय़ा वाहनांना थेट विवरापर्यंत प्रवेश नाही. त्यासाठी खास छोटय़ा गाडय़ा आहेत. मोठय़ा गाडय़ा तीन-चार किलोमीटर अलीकडेच थांबतात. तेथेदेखील स्थानिक वस्तूंचा बाजार अगदी नेटकेपणाने रचला आहे.

बांडुगमधले दुसरे आकर्षण म्हणजे ‘साँग अंकलुंग उदजो सेंटर’. हा देश जरी मुस्लीम असला तरी त्यांच्या आजवरच्या साऱ्या संस्कृतीचं त्यांनी जतन केलं आहे. रामायण यांना भारी प्रिय आहे. संपूर्ण देशभरात रामायणाचे अनोख्या पद्धतीने सादरीकरण होत असते. उदजो सेंटरमध्ये तर चक्क रामायणाचा पपेट शोच पाहायला मिळतो. पाठोपाठ लहान मुलांनी सादर केलेली सर्व बेटांवरची पारंपरिक नृत्यं अनुभवता येतात. मात्र या सांगीतिक कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू असतो तो म्हणजे अंकलुंग वादन. विवरांच्या तीरावर पाहिलेले हेच ते बांबूचे वाद्य. हे येथील सर्वात प्राचीन वाद्य. इतर अनेक वाद्यं आहेत, पण याची मजा काही औरच आहे. ती आणखीन खुलते ती कॅथी मयांगसरी याशिक्षिकेमुळे. अगदी सहज आणि सोप्या प्रकारे संगीत कसं शिकवावं याचं हे मूर्तिमंत उदाहरण. आयुष्यात कधीच कोणतेही वाद्य न वाजवलेल्या व्यक्तीकडूनदेखील त्या सप्तसूर अगदी लीलया वाजवून घेतात.

अंकलुंग या वाद्यामध्ये बांबूची विशिष्ट रचना असणारे आणि क्रमाक्रमाने आकाराने लहान होत जाणाऱ्या  सात आयताकृती चौकटी असतात. कॅथीने लोकांच्या सोयीसाठी  या प्रत्येक चौकटीला सोयीसाठी एकेका बेटाचं नाव दिलं होतं आणि प्रेक्षकांच्या प्रत्येक रांगेला वेगवेगळ्या सेटमधील समान नाव असणारी चौकट दिली जाते. प्रत्येक बेटासाठी हाताची एक विशिष्ट खूण ठरवली जाते. त्या खुणेनुसार त्या त्या रांगेतील लोकांनी आपल्या हातातील वाद्याची विशिष्ट पद्धतीने हालचाल करायची. सातही खुणा एका विशिष्ट क्रमाने वाजवल्यावर आपोआपच सप्तसुरांची एक मस्त लकेर तयार होत होती. हे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पाच मिनिटांतच त्यांनी सर्वाकडून दोन गाणीदेखील वाजवून घेतली. भाषा कोणतीही असो, पण एका क्षणात त्यांच्या संस्कृतीशी जोडले जाण्याची ही भावना त्या संगीतातून निर्माण तयार होते. सप्तसुरांची जादू म्हणजे काय हे अनुभवण्यासाठी तरी नक्कीच या सेंटरला भेट द्यावी लागेल.

बांडुग हे प्रचंड मोठं आहे. खरेदीसाठी येथे मोठमोठाले मॉलदेखील आहेत आणि मुंबईच्या महंमद अली रोडवर किंवा अब्दुल रहमान स्ट्रीटवर गल्लीबोळात विस्तारल्याप्रमाणे पारंपरिक मार्केटदेखील येथे आहे.

बांडुगमध्ये आवर्जून पाहावे असे दुसरे ठिकाण म्हणजे आशिया आफ्रिका स्ट्रीट. या दोन खंडाच्या परिषदेमुळे या रस्त्याला हे नाव मिळालं आहे. सर्व राष्ट्रांचे झेंडे तर येथे आहेतच, पण रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर मोठय़ा तोफगोळ्यांप्रमाणे दगडी गोळ्यांवर प्रत्येक देशाचे नाव कोरले आहे. विशेष म्हणजे याच सदैव वाहत्या रस्त्यावर सायकलसाठी खास मार्गिकादेखील आहे आणि त्यात घुसखोरी होत नाही.

बांडुगची ही भटकंती फार लांबवायची गरज नसते, कारण पुढे असणाऱ्या योगकर्ताचे आकर्षण. त्यासाठी मात्र रेल्वेचा आधार घ्यायला हरकत नाही. पाच-सात डब्यांच्या मस्तपैकी वातानुकूलित रेल्वेचा प्रवास अगदी नयनरम्य आहे. संपूर्ण डोंगररांग कापत होणारा हा प्रवास खरे तर उघडय़ा खिडकीतून अनुभवयाला हवा, पण भल्यामोठय़ा बंद काचेतूनदेखील तितकाच आनंद मिळतो. कोकण रेल्वेचा अनुभव देणारा हा
प्रवास आणखीन खुलतो तो त्यांच्या छोटेखानी स्टेशनांमुळे. कडक इस्त्रीचा युनिफॉर्म घातलेले हसतमुख कर्मचारी या कमालीच्या स्वच्छ स्टेशनांवर शोभून दिसतात.

योगकर्ता (स्थानिकांच्या भाषेत जोग्जाकर्ता) हे अगदी छोटंसं म्हणजे ३२ चौरस किलोमीटर इतकं पण महत्त्वाचं शहर. भौगोलिक, नैसर्गिक, ऐतिहासिक आणि पुरातन वारसा लाभलेलं. बोरोबुद्दूर ३० किमीवर तर प्रांबनन दहा किलोमीटरवर. जगातला सर्वात धोकादायक ज्वालामुखी एकीकडे, तर दुसरीकडे समुद्रकिनारी सुनामीचं संकट.

योगकर्ताला दुसरं वलय आहे ते तेथील राजामुळे. १९४५ साली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सारी राज्यं प्रजासत्ताकमध्ये सामील झाली. राजांचे अस्तित्व संपले. पण योगकर्ताच्या राजाला कायमस्वरूपी या राज्याच्या गव्हर्नरचा मान मिळाला. डचांच्या संघर्षांत त्याच्या योगदानामुळे त्याला हा मान मिळाला आहे. तर असं हे योगकर्ता, आणखीन एका कारणामुळे लक्षात राहते ते म्हणजे तेथील तरुणाईचा सळसळता उत्साह.

त्याबद्दल पुढील अंकात.

खानपान

परक्या देशात गेलं की हमखास पडणारा पहिला प्रश्न म्हणजे त्यांच्या आपल्या जेवणाच्या सवयी जुळणार का? त्यातही दक्षिण अशियाई देशातील खाद्यपदार्थाबद्दल असलेली एक अनामिक भीती या मुस्लीम राष्ट्रात आणखीनच तीव्र होते. खरं तर जेथे जावं तेथील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यावा. पण हल्ली आपण याबाबत जरा जास्तीच काटेकोर झालो आहोत. असो. तर इंडोनेशियाचा सारा भर आहे तो मांसाहारावर. त्यातही सी फूड जरा जास्तीच प्रिय आहे. वेगवेगळ्या प्रकारे शिजवलेला चिकन, मटण अथवा बीफचा मोठा तुकडा आणि भाताची मोठी मूद. जोडीला सॅलडचे प्रकार. हा येथील सर्वसाधारण आहार. रस्त्याच्या कडेला थाटलेल्या टपऱ्या कधी टेबल खुर्ची, तर कधी भारतीय बैठक हा येथील प्रसिद्ध प्रकार. आपल्यासारखी छोटी हॉटेल्स येथे तुलनेनं कमीच. पण स्ट्रीट फूड प्रचंड लोकप्रिय आहे. तर जकार्तामध्ये मात्र छोटी हॉटेल्स पाहायला मिळतात. अर्थात सगळंच आपल्या पचनी पडेल असं नाही. पण थोडी थोडी चव पाहायला काय हरकत आहे? बांडुग, योगकर्तामध्ये तर अशा टपऱ्यांवर जेवत असताना एखादा वादक छानपैकी गिटार वाजवत असतो, हे खास नमूद करावं असं.

शाकाहारींसाठी तसे मर्यादितच पर्याय आहेत. पण एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये तुम्हाला पाच पंचवीस प्रकार नक्कीच मिळू शकतात. बांडुगमध्ये कंपागदुवा सारख्या थीम रेस्ट्ॉरंटमध्ये तुम्ही अगदी इंडोनेशियन पद्धतीने बैठक मारून अशा कैक पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. आपल्याकडे जसा यत्रतत्र सर्वत्र पनीरचा वापर असतो, तसं येथे टोफू आहे. सोयाबीनपासून तयार केलेले हे टोफू अगदी चौकाचौकांत गाडय़ांवर मिळतं. आपल्याकडच्या वडापावसारखं. फक्त पाव येथे दिसत नाही. केळ्याचादेखील अनेक प्रकारे वापर केला जातो. अगदी कच्ची केळीदेखील येथे भाजून खाल्ली जातात. उकडलेल्या भाज्या, मशरूम असे इतर पर्याय आहेत.

मांसाहारी असो की शाकाहारी, एकंदरीतच या डिशेसची रचना आहारातलं संतुलन साधणारी असते हे मात्र निश्चित.

चांगल्या तारांकित हॉटेलमध्ये मात्र सर्व पर्याय उपलब्ध असतात. कॉन्टिनेन्टल तर असतंच, पण येथे काही खास पारंपरिक रेसिपींचाही आस्वाद घेता येतो. काही बाबतीत मात्र आपल्यात आणि त्यांच्यात चांगलंच साम्य आहे. सकाळी सकाळी न्याहरीला गुरगुटय़ा मऊ भात खाण्याची कोकणातली प्रथा येथेपण आहे. जोडीला मिरचीच्या ठेच्याचे अनेक प्रकार, आणि हवे असल्यास सुके मासेदेखील.

बाली तर पूर्णत: पर्यटनावर आधारित असल्यामुळे तेथे तर अगदी पंजाबी पद्धतीचं जेवणदेखील मिळतं, पण परदेशात जाऊन असं काही खाण्याचा करंटेपणा शक्यतो करू नये.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सारं फार खर्चीक नाही. साधारण भारतीय चलनात आपण जेवढे खर्च करू शकतो तेवढाच खर्च येथे होतो, कधी कधी त्यापेक्षाही कमी पैसे खर्चावे लागतात.
सुहास जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 1:23 am

Web Title: indonesia
टॅग : Paryatan
Next Stories
1 कोणार्कचे सूर्य मंदिर
2 चेंगीझ खानचे खाराखोरीन्
3 पर्यटन : गोबीचे रण
Just Now!
X