डॉ. अभिजित म्हाळंक

जर्मनी, ऑस्ट्रिया व स्वित्र्झलड या तीन देशांमध्ये वसलेल्या लिश्टनश्टाइन या चिंचोळ्या, निसर्गसुंदर देशाचे भारताच्या स्वातंत्र्यदिनाशी अजब नाते आहे.

आपण १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. जगातील आणखी एक देश हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो हे फारच थोडय़ा लोकांना माहीत असेल. तो देश म्हणजे लिश्टनश्टाइन. युरोपात जर्मनी, ऑस्ट्रिया व स्वित्र्झलड या तीन देशांमध्ये वसलेला हा चिंचोळा, निसर्गसुंदर देश बहुधा फक्त भूगोलाच्या अभ्यासकांना व टेलीफोन डिरेक्टरी बारकाईने वाचणाऱ्यांना माहीत असेल. (कारण लिश्टनश्टाइनला स्वतंत्र आयएसडी कोड आहे). अर्थात ऱ्हाइन नदीच्या खोऱ्यात हा जगातील सर्वात छोटा असा चौथा देश गेली ३०० वर्षे आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. जर्मन भाषा शिकत असताना जर्मन भाषिक देशांच्या यादीत लिश्टनश्टाइनचे नाव मी वाचले होते. पण त्या पलीकडे मलाही या देशाबद्दल बाकी काही माहिती नव्हती. तिथे प्रत्यक्ष जाण्याचा योग आल्यावर या देशाचा छोटेखानी संसार बघून मला अचंबा वाटला.

जगाच्या नकाशात मोठय़ा मुश्किलीने सापडेल इतका हा चिमुकला देश अवघे १६० चौ. कि.मी. क्षेत्र व्यापून आहे (म्हणजे मुंबईच्या केवळ एक चतुर्थाश)! त्यांची दक्षिणोत्तर लांबी २५ किमी तर पूर्व-पश्चिम रुंदी ६ कि.मी. आहे. आल्प्सच्या गगनचुंबी सुळक्यांनी या देशाला एखाद्या अजस्र िभतीप्रमाणे वेढले असून देशाचा १५ टक्के भाग आल्प्सच्या पर्वतरांगांनी तर ५५ टक्के भाग आजही जंगलाने व्यापलेला आहे. गेली तीन शतके या देशावर ऑस्ट्रियन वंशाच्या राजघराण्याची सत्ता आहे. व्हिएन्नाच्या लिश्टनश्टाइन कासलमध्ये पाळमुळं असणाऱ्या या घराण्याला त्याने ऑस्ट्रियाची केलेली सेवा लक्षात घेऊन १७ व्या शतकात राजघराण्याचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे शेतनबर्ग हा परगणा प्रिन्स हान्स अ‍ॅडम पहिला याच्या स्वामित्वाखाली आला. पुढे इ. स. १७१२ मध्ये वडूत्स हा परगणाही त्यात विलीन झाला आणि लिश्टनश्टाइन राजघराण्याची सत्ता निर्माण झाली. १८०९ मध्ये नेपोलियनने तिला सार्वभौमत्व दिले. तेव्हापासून लिश्टनश्टाइनच्या अधिपतीला फ्युर्स्ट आणि त्याच्या पत्नीला फ्युस्र्टीन असे म्हटले जाते. देशाचे अधिकृत नाव फ्युर्स्टनटूम लिश्टनश्टाईा असे आहे.

या देशाची राष्ट्रभाषा जर्मन असून देशाला स्वत:चा झेंडा आहे. आयताकृती झेंडय़ात वरील अर्धा भाग निळा तर खालील अर्धा भाग लाल असून निळ्या भागावर उजव्या कोपऱ्यात पीतवर्णी राजमुकुट आहे, जो इथली राजसत्ता दर्शवतो.

लिश्टनश्टाइनला स्वत:चे राष्ट्रगीत असून ते जर्मन भाषेत आहे. ब्रिटिश राष्ट्रगीताच्या चालीवर ते गायले जाते. ५ ऑक्टोबर १९२१ पासून येथे सुधारित राज्यघटना लागू झाली असून या राज्यघटनेनुसार फ्युर्स्ट हा देशाचा सर्वोच्च अधिकारी असतो आणि लोकनिर्वाचित संसदेच्या मदतीने तो आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करतो. येथील संसदेत एकूण २५ सदस्य असतात व तिचा कार्यकाल चार वर्षांचा असतो. १९५० मध्ये हा देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा सदस्य बनला असून १९९० मध्ये त्यास संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्वही मिळाले आहे.

लिश्टनश्टाइनमध्ये आता तीन राजकीय पक्ष आहेत – सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक व पर्यावरणवादी. रोज दोन वृत्तपत्रे येथे प्रसिद्ध होतात – लिश्टनश्टाइनर फाटरलांड हे दैनिक सोशलिस्ट पक्षातर्फे चालवले जाते तर लिश्टनश्टाइनर फोल्क्सब्लाट हे दैनिक डेमोक्रॅटिक पक्ष प्रकाशित करतो. याशिवाय नभोवाणी व दूरचित्रवाणी यांची एकेक वाहिनी येथे अस्तित्वात असून त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण आहे.

आज लिश्टनश्टाइनची लोकसंख्या ३७ हजारांच्या आसपास असून त्यातील सुमारे एकतृतीयांश रहिवासी परदेशी नागरिक आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत लिश्टनश्टाइन हा शेतिप्रधान देश होता पण दुसऱ्या महायुद्धानंतर येथे कारखानदारी झपाटय़ाने वाढली. या देशात कर द्यावा लागत नाही असा अनेकांचा गैरसमज आहे. पण प्रत्येक नागरिकास येथे ०.२ ते ०.९ टक्के मालमत्ता कर व ४ ते १८ टक्के मिळकत कर मोजावा लागतो. तथापि इतर देशांच्या तुलनेत कराचे दर खूपच कमी असल्याने इतर देशांतील धनिक लोक त्यांचा पसा लिश्टनश्टाइनमधील बँकांत दडवतात. विकिलिक्स वगैरेनी केलेल्या काळ्या पशाविषयक खुलाशात लिश्टनश्टाइनर बँकेचे नाव अनेकदा आले आहे.

सुरुवातीला ऑस्ट्रियाशी घनिष्ठ संबंध ठेवणाऱ्या लिश्टनश्टाइनने पुढे स्वित्र्झलडची कास धरली. स्वित्र्झलडचे स्विस फ्रँक हेच चलन लिश्टनश्टाइनमध्येही वापरले जाते. लिश्टनश्टाइनला जाण्यासाठी स्वतंत्र व्हिसादेखील लागत नाही. स्वित्र्झलडचा व्हिसा किंवा शेंगन व्हिसा असेल तर लिश्टनश्टाइनला जाता येते. या देशात विमानतळही नाही. एक रेल्वेस्थानक मात्र आहे व ते पॅरिस – व्हिएन्ना या आंतरराष्ट्रीय लोहमार्गावर येत असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. लिश्टनश्टाइनमध्ये विद्यापीठ नाही. येथील सरकारतर्फे काही स्विस व ऑस्ट्रियन विद्यापीठांना दर वर्षी थोडे अनुदान दिले जाते. बदल्यात ही विद्यापीठे लिश्टनश्टाइनमधील विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. लिश्टनश्टाइनला स्वतंत्र लष्करही नाही. येथे असणारी पोलीस यंत्रणाच संपूर्ण सुरक्षा व्यवस्था हाताळते.

लिश्टनश्टाइनचे ११ उपनगरांत विभाजन केलेले आहे. ऱ्हाइन नदीच्या खोऱ्यात वसलेल्या उपनगरांना लोअर लॅण्ड तर आल्प्सच्या उतारावर वसलेल्या तीन उपनगरांना अप्पर लॅण्ड म्हणतात.

पर्यटकांसाठी लिश्टनश्टाइन-मधील मुख्य आकर्षण म्हणजे वडूत्स या उपनगरात असणारे चित्रसंग्रहालय होय. फार वर्षांपासून चालत आलेल्या या संग्रहालयाला १७ व्या शतकात प्रिन्स कार्ल युसेबियस व त्यानंतर त्याचा मुलगा योहान अ‍ॅडम पहिला यांनी शिस्तबद्ध स्वरूप दिले. तेव्हापासून येथील राजघराण्यातील थोरल्या मुलाला राजपदाबरोबर या संग्रहाचे मालकी हक्कही मिळतात. अनेक जर्मन, ऑस्ट्रियन, स्पॅनिश, डच चित्रकारांनी चितारलेली पारंपरिक व आधुनिक शैलीतील चित्तवेधक पेंटिंग्ज येथे पाहायला मिळतात.

वडूत्स येथेच असणारे पोस्टाच्या तिकिटांचे संग्रहालय हे लिश्टनश्टाईनचे खास वैशिष्टय़. लिश्टनश्टाइनमधील पोस्टाचे स्टॅम्प्स त्यांच्या आकर्षक व रंगीबेरंगी स्वरूपामुळे पर्यटकांमध्ये व स्टॅम्प्सशौकिनांमध्ये गेल्या कित्येक दशकांपासून अत्यंत लोकप्रिय आहेत. प्रत्यक्ष पत्रसंख्येपेक्षा स्टॅम्प्सची होणारी विक्री लिश्टनश्टाइनमध्ये किती तरी अधिक असते. ही विक्री या देशाच्या वार्षिक महसुलास कायमच मोठा हातभार लावत आली आहे. वडूत्स येथील संग्रहालयात या स्टॅम्प्सचे मनोहारी प्रदर्शन पाहायला मिळते. येथील ५० हजारांहून अधिक स्टॅम्प्समधून प्रतििबबित होणाऱ्या सामाजिक व ऐतिहासिक घडामोडी आणि मुद्रणतंत्रामुळे त्यांत कालौघात येत गेलेला सफाईदारपणा अनुभवणे हा एक संस्मरणीय अनुभव असतो.

वडूत्समधील मुख्य रस्त्यावर उभे राहून दक्षिणेकडे नजर टाकल्यास डोंगरउतारावरील एक दगडी किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. हाच लिश्टनश्टाइनचा राजप्रासाद होय. लिश्टनश्टाइनचे फ्युर्स्ट व त्यांचे कुटुंब येथे वास्तव्याला असते. राजप्रासाद सर्व बाजूंनी द्राक्षाच्या मळ्याने वाढलेला आहे. या द्राक्षांचा वापर राजपरिवारासाठी उंची मद्य बनवण्यासाठी केला जातो. राजप्रासाद आतून बघण्यास परवानगी नाही, तो बाहेरूनच बघता येतो.

वडूत्सपासून दक्षिणेला पाच किमी अंतरावर आहेत लिश्टनश्टाइनमधील दोन आकर्षक पॉइंट्स, गाफ्लाय व सिलूम. संपूर्ण लिश्टनश्टाइनचे नेत्रसुखद दर्शन पर्यटकांना या पॉइंट्सवरून घडते. सुमारे १६०० मीटर उंचीवर असणाऱ्या या पॉइंट्सवरून स्वित्र्झलडचा पूर्व सीमेलगतचा भाग, संपूर्ण देखाव्यात या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेला अजगरासम भासणारा ऱ्हाइन नदीचा पट्टा, त्याच्या दुतर्फा पसरलेली हिरवीगार शेते, त्यांना लागून असणाऱ्या टुमदार इमारती, या संपूर्ण देखाव्यास बुलंद पाश्र्वभूमी प्रदान करणारी आल्प्सची हिमाच्छादित शिखरे व त्यावरून अधोगामी होणारे जलप्रवाह पाहताना वेळेचाही विसर पडतो.

लिश्टनश्टाइनच्या ऑस्ट्रियाला लागून असणाऱ्या भागाचे असेच विहंगम दर्शन सिलूमपासून जवळच असणाऱ्या माल्बून या पॉइंटवरून घडते. सुमारे दोन हजार मीटर उंचीवर असणारी माल्बूनची पर्वतराजी स्कीइंगसाठी प्रसिद्ध आहे. विजेच्या खुर्चीतून पर्वत शिखरावर जाण्याचा व त्यांनंतर पर्वतराजीत भटकण्याचा दुहेरी आनंद पर्यटक येथे लुटू शकतात. या पॉइंट्सवरून लिश्टनश्टाइन पाहणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. माल्बूनची पर्वतराजी स्कीइंगसाठी प्रसिद्ध आहे

लिश्टनश्टाइनच्या आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्व फ्युर्स्टपैकी फ्रांक योसेफ हा फ्युर्स्ट जनतेत खूपच लोकप्रिय होता. त्याचा वाढदिवस १५ ऑगस्टला असायचा. म्हणून १५ ऑगस्ट हा दिवस लिश्टनश्टाइनमध्ये राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. युरोपातील या चिमुकल्या देशाचे भारताशी असणारे हे अजब नाते!