24 November 2020

News Flash

काश्मीरचा अमृतानुभव…

आयुष्यात एकदा तरी काश्मीर बघायचं असं प्रत्येक सुजाण भारतीय माणसाचं स्वप्न असतं.

आयुष्यात एकदा तरी काश्मीर बघायचं असं प्रत्येक सुजाण भारतीय माणसाचं स्वप्न असतं. तिथं जाऊन बघायची ठिकाणं तीच तीच असली तरी त्यांचा गोडवा मात्र अप्रतिम!

प्रत्येकाला असते तशीच मलाही काश्मीरला भेट देण्याची-भारतातले हे स्वर्गीय नंदनवन बघण्याची उत्सुकता होती. चार वर्षांचे आणि नऊ महिन्यांचे अशी दोन छोटी नातवंडं बरोबर असल्याने थोडी धाकधूक होती.

आठ दिवसांची आमची ही टूर श्रीनगरपासून सुरू झाली. एकूणच काश्मीरला जायचे ते संपूर्ण विश्रांतीसाठी.. निसर्गाचा, बर्फाचा, रम्य वातावरणाचा पुरेपूर आनंद लुटण्यासाठी. इतर ठिकाणी प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी जी धावाधाव करावी लागते ती या प्रवासात जाणवली नाही.

काश्मीरच्या अस्थिर वातावरणाची अन् राजकीय परिस्थितीची आपल्याला पुरेपूर कल्पना आहेच. त्यामुळे टूर मॅनेजरने पहिल्याच दिवशी काही सावधगिरीच्या सूचना दिल्या. कमी बोलणे हा उत्तम उपाय. कुणी काही बोलले, तर प्रतिक्रिया न दिलेलीच बरी. पटो वा न पटो ऐकून  घ्यायचे. धर्माविषयी अन् क्रिकेटविषयी शक्य तो बोलणे टाळायचेच.

जम्मू काश्मीर या राज्याला दोन राजधान्या आहेत. श्रीनगर ही उन्हाळ्यातली राजधानी अन् जम्मू ही हिवाळ्यातली राजधानी. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा जम्मूहून श्रीनगरला हलवण्याची प्रक्रिया सुरू होती. काश्मीरचे मूळ काश्यप ऋ षींच्या कुळापर्यंत जाते असे सांगतात. इथे एकूण २२ जिल्हे. कच्छ हा सर्वात मोठा जिल्हा. आर्य समाजाची स्थापना ही याच प्रदेशातून झाली असं सांगतात. इथे केवळ गालिचे, पर्यटन अन् केसर हे तीनच महत्त्वाचे उद्योग.

शेकडो वर्षांपूर्वी गुलाबराजा डोगरा सिंग याने जमीन विकत घेऊन आपले ठाण मांडले. ब्रिटिशांचे राज्य आल्यावर त्यांनी १८८८ च्या सुमारास पहिली हाऊस बोट बांधली. व्हिक्टरी हे पहिल्यावहिल्या हाऊस बोटीचे नाव. सध्या चांगल्यापैकी दीडेक हजार हाऊस बोटस् या परिसरात आहेत. पहिल्या दोन रात्री आम्ही ज्या हाऊस बोटीमध्ये वास्तव्याला होतो त्या हाऊस बोटीचे नाव होते ‘काश्मीरची राणी’. अशी बरीच आकर्षक नावे आढळतात इकडच्या बोटींना, सरोवरातील शिकाऱ्यांना.

श्रीनगर समुद्रसपाटीपासून ५४०० फूट उंचावर आहे. आमचे पहिले वास्तव्य होते ते नगीन लेकच्या हाऊस बोटीवर. या हाऊस बोटीतली आतली व्यवस्था, स्वच्छता, सजावट सारेच वाखणण्यासारखे. शिवाय आतिथ्याबद्दल तर विचारायलाच नको. सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा या बोटीत खाण्याची तर चंगळ असतेच. शिवाय अवतीभवतीच्या रमणीय निसर्गाचा आनंददेखील मनमुरादपणे लुटता येतो.

आमच्या ग्रुपची संख्या मर्यादित असल्याचादेखील आम्हाला फायदाच झाला. आमच्या कुटुंबात आम्ही सहा जण- त्यापैकी दोन बच्चे मंडळी. याशिवाय सहा जण गुजराथचे अन् तीन महिला (तेलुगु) हैद्राबादच्या. या पंधरा जणांचे पहिल्याच दिवशी एक जिव्हाळ्याचे छोटे कुटुंब तयार झाले.

हाऊस बोटीवरूनच दुसऱ्या दिवशी आम्ही सोनमर्ग बघायला निघालो. मिडो ऑफ्  गोल्ड- सोने का मैदान असंही म्हणतात या भागाला. साधारण चार तासांचा खडतर प्रवास. खडतर यासाठी की रस्ता अतिशय खराब.. या रस्त्याला नॅशनल हाय वे – राष्ट्रीय महामार्ग कसे म्हणायचे हा  प्रश्न आम्हाला पडला. हा मार्ग पुढे लडाखकडे जातो. लष्करांच्या वाहनांची सारखी ये-जा असते इथून. तरीही प्रवासाचा वेग सरासरी पंधरा किलोमीटर्स प्रति तासाच्या वर शक्य नसतो. रस्त्यात पाम्पोर नावाचे गाव येथे. इथे केशराची शेती आहे. केशर उत्पादनासाठी स्विर्झलड अन् इराण नंतर फक्त काश्मीरचेच नाव घ्यावे लागते. केशर उत्पादन हे महा कटकटीचे, गुंतागुंतीचे नाजूक काम. अडीचशे रुपयाला एक ग्राम ‘असली’ केशर मिळते. खरे-खोटे कसे ओळखायचे हेही समजावून सांगितले जाते. तरी आपण जे काही घेतो ते खरे की खोटे हे कळायला मार्ग नसतो.

पहेलगाम- आरु व्हॅली ही निसर्गरम्य ठिकाणं देखील मन मोहून टाकतात. अमरनाथ यात्रेसाठीचं पहिलं गाव म्हणजे पहेलगाम. संगम हे गाव क्रिकेट बॅटसाठी खास प्रसिद्ध. क्रिकेट वेडी माणसं बॅट विकत घेतल्याशिवाय पुढे जाऊच शकणार नाहीत इथून. बॅट कशी तयार केली जाते याचं प्रात्यक्षिकदेखील इथं दाखवतात.

अवंतीपूर येथील भग्नावस्थेतील देवळांचे अवशेष बघणं हा मन हेलावणारा अनुभव. इथले गाईड त्रिलोकसिंग या भग्न देवळांची कथा विस्तारानं समजावून सांगतात. ते तीन पिढय़ांपासून हेच काम निष्ठेनं करतात.

चार चिनार आयलंडच्या चिनार वृक्षाची वेगळीच कथा सांगितली जाते. या गोल्डन आयलंडमधील चिनार वृक्ष इराणमधून आणलेले. जहांगीराने राणी नूरजहांला मनविण्यासाठी फुलांऐवजी चिनार वृक्षांची पाने दिली म्हणे. कोण कशासाठी रुसून बसेल अन् कशामुळे हसेल काही सांगता यायचे नाही. हरणाच्या कातडय़ासाठी सीता नाही का हट्ट धरून बसली रामाकडे? तसेच काहीसे हे..!

काश्मीर टूरचा कळसाध्याय म्हणजे गुलमर्ग येथील वास्तव्य..थंडीचा, बर्फाचा, हिमशिखरांचा अन् सातत्याने बदलणाऱ्या निसर्गाचा. सुंदर अनुभव इथे घेता येतो. गुलमर्गची समुद्रपातळीपासूनची उंची आहे ८,७५० फूट. इथे जगातले सर्वात मोठे अन् सर्वात उंचावरचे गोल्फचे मैदान आहे. गोंडाला केबल राइडचा थरारक अनुभव केवळ अविस्मरणीय असा असतो. दहा हजार छपन्न फुटांचा पहिला टप्पा अन् तेरा हजार पाचशे फुटांवरचा सर्वात उंचावरचा दुसरा टप्पा. ही ढगातली सैर थरारक असते. अवतीभवती बर्फाच्छादित बर्फाच्या पर्वतरांगा.. दाट पसरलेली धुक्याची चादर.

सर्वात उंच गेल्यावर बर्फात खेळण्याची मजा काही वेगळीच. शिवाय घोडय़ावरून रपेट करत फिरता येते.. वेगवेगळ्या खेळांचा (बर्फाशी संबंधित) आनंद लुटता येतो. या केबलचे तंत्रज्ञान फ्रान्समधून आयात केलेले आहे.

परतीच्या मार्गावर काश्मीरच्या गालिचाची ओळख होते. हेही फार नाजूक अन् मेहनतीचे काम. दुसरा काही ‘उद्योग’ नसतो तेव्हा गारठलेल्या थंडीत प्रत्येक जण म्हणे गालिचे विणण्यात हातभार लावतात. हे गालिचे टिकाऊ असतात. डस्टप्रूफ असतात. अन् महागदेखील असतात. तीस टक्के रक्कम देऊन हे जाडजूड, सुंदर गालिचे घरपोच मागवता येतात. पर्यटक सढळ हाताने पैसे खर्च करीत ते मागवतातदेखील. आम्हीही तेच केले.

इथल्या नद्या, इथली सरोवरे साफ, स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ गंगा सफाई प्रकल्पावर भर देऊन चालणार नाही. अखंड भारत स्वच्छ करायचा तर इथली सिंधू नदीदेखील स्वच्छ करायला हवीच. झेलमसुद्धा स्वच्छ करायला हवी. दल लेक, नगीन लेक, सतीसार सरोवर हे सारे स्वच्छ व्हायला हवे. म्हणजे खऱ्या अर्थाने काश्मीरचे सौंदर्य उठून दिसेल. अगदी तातडीने इथल्या रस्त्यांची दुरुस्ती करणेदेखील तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे पर्यटकांना तर सोयीचे होईलच. पण स्थानिक मंडळीसुद्धा सुखावतील. बहुतेक समस्या या सरकारच्या दुर्लक्षित धोरणांमुळे, निष्काळजीपणामुळे अन् गढूळलेल्या राजकारणामुळे निर्माण झालेल्या आहेत, हे प्रकर्षांने जाणवते. माणसे कुठलीही असोत ती मुळात चांगली असतात. आतून स्वच्छ, निर्मळ असतात. त्यांना जाणूनबुजून चिथवले जाते. रिकामटेकडय़ांच्या मनात राक्षसी भुतांचा वावर असतो म्हणतात. माणसाला उद्योग असला की तो व्यस्त राहतो. सृजनशील होतो. निरुद्योगाने आतंकवादात भर पडते. प्रयत्न केले तर हे चित्र बदलू शकेल.

शेवटच्या टप्प्यात श्रीनगर येथील उंचावरचे शंकराचार्याचे तपश्चर्येचे स्थान बघता आले. हे सारे क्षेत्र सेन्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे सुरक्षा कडक. इथे वरून संपूर्ण श्रीनगरचा परिसर अतिरम्य दिसतो. पण छायाचित्रास, चित्रीकरणास मनाई असल्याने हे सुंदर दृश्य मनातच साठवून ठेवावे लागते. वर जायला सव्वा दोनशे  पायऱ्या चढाव्या लागतात.

दल लेक परिसराची शिकाऱ्यातली दोन तासांची रपेटदेखील संस्मरणीय अशीच असते. इथे फ्लोटिंग मार्केटदेखील आहे. छोटय़ा-मोठय़ा खरेदीसाठी श्रीनगरला मॉल संस्कृती पोहोचली नाही. सुधारणेचे म्हणाल तर फक्त एक फ्लायओव्हर..दुसरा तयार होतोय. एरवी आपल्या मेट्रो शहरात दिसतो तसा बाजारी झगमगाट अभावानेच दिसतो. सारे जुने, पारंपरिक.. कारण जास्तीतजास्त काळ थंडी अन् बर्फ..

आपल्या शहरातून फक्त काँक्रीटची जंगले वाढलीत. निसर्गाला, पानाफुलांना, नद्या सरोवरांना आम्ही हळूहळू हद्दपार केले आहे. या पाश्र्वभूमीवर काश्मीरचा उन्हाळ्यातला हा अविस्मरणीय आठवडा शरीरालाच नव्हे तर मनालादेखील हिरव्या गारव्याचा आनंद देऊन गेला एवढे मात्र निश्चित. बर्फाच्छादित पर्वतरांगा, खळाळत्या प्रवाही नद्या अन् पहाडातले जलप्रपात, पानाफुलांचे नैसर्गिक रंगगंध, सरोवरातील श्किाऱ्यातली सैर हे सारे मनमुराद उपभोगायचे तर काश्मीरला पर्याय नाही.

श्रीनगरहून परतताना विमानतळावर जाण्यासाठी नेहमीपेक्षा एक तास जादा देणे गरजेचे असते. कारण विमानतळावर पोहचण्यापूर्वी एक दीड किलोमीटर आधीच सर्व सामानाची एक्स रे तपासणी होते. म्हणजे सर्व सामान (पर्सेस, हँड बॅग्ज) कार/ टॅक्सीमधून काढायचे. त्याची तपासणी करून घ्यायची..अन् पुन्हा ते कारमध्ये चढवायचे. यासाठी भली मोठी रांग असते. त्यात बराच वेळ जातो.
डॉ. विजय पांढरीपांडे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2016 1:06 am

Web Title: kashmir 3
Next Stories
1 सेंट थॉमस बेटावर…
2 विलोभनीय कामचाट्का
3 एल्क आयलँड नॅशनल पार्क
Just Now!
X