27 October 2020

News Flash

कलासक्त राजे लुडविग

राजा लुडविग दुसरा याने स्वत:च्या कारकिर्दीत सर्व कलांना भरपूर प्रोत्साहन दिले.

डॉ. अभिजित म्हाळंक

लुडविग पहिला आणि लुडविग दुसरा या दोन राजांनी जर्मनीतील सर्वात मोठे राज्य अशी ख्याती असलेल्या बायर्नवर १९ व्या शतकात राज्य केले. त्यांच्या कलाप्रेमामुळे बायर्नमध्ये अप्रतिम अशा वास्तू उभ्या राहिल्या आहेत.

जर्मनीतील सर्वात मोठे राज्य असणाऱ्या बायर्नला स्वत:चा विलोभनीय इतिहास आहे. १९ व्या शतकात बायर्नवर लुडविग पहिला व नंतर लुडविग दुसरा यांचे राज्य होते. हे दोघेही राजे अत्यंत कलासक्त व मनस्वी म्हणून प्रसिद्ध होते. दोघांनीही बायर्नमध्ये अनेक अद्वितीय वास्तू उभ्या केल्या. दोघांच्या आयुष्याच्या शोकांतिकाही मनाला चटका लावून जाणाऱ्या होत्या.

जिथे कला निर्भयपणे नांदू शकेल असे एक प्रांगण राजा लुडविग पहिला याला स्वत:च्या राज्यात उभारायचे होते. म्हणून त्याने म्युनिक शहरात क्योनिग्जप्लात्झ नामक वैशिष्टय़पूर्ण प्रवेशद्वार बांधून घेतले आणि त्याच्या दोन बाजूंना दोन भव्यदिव्य इमारतींत ग्लिप्टोथेक व स्टेट कलेक्शन ऑफ अँटिक्विटीज ही दोन जगप्रसिद्ध संग्रहालये उभी केली. लुडविग स्ट्रीट हा म्युनिकमधील प्रसिद्ध रस्ताही त्याच्याच कल्पनेतून निर्माण झाला. लोला मॉन्टेत्स या नर्तकीशी असलेल्या संबंधांमुळे त्याला १८४८ मध्ये राजपदाचा त्याग करावा लागला.

राजा लुडविग दुसरा यानेही स्वत:च्या कलाप्रेमी व्यक्तिमत्त्वामुळे व दु:खद जीवनपटामुळे बायर्नच्या इतिहासात एक वेगळेच स्थान निर्माण केले. राजा मॅक्सिमिलियान दुसरा याचा पुत्र असणाऱ्या लुडविगचा जन्म म्युनिकमधील न्युम्फॅम्बुर्ग पॅलेसमध्ये झाला. त्याचे पालनपोषण कडक शिस्तीत झाले. १८६४ मध्ये वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी तो बायर्नचा सर्वाधिकारी बनला. त्याच्या मातेने त्याचा विवाह त्याची मामेबहीण सोफी हिच्याशी ठरवला होता. सहा महिने या विवाहाचे वारे संपूर्ण बायर्नभर वाहत होते. पण सहा महिन्यांनंतर लुडविगने या विवाहास नकार दिला. १८६६ मध्ये प्रुशियाविरुद्धच्या युद्धात बायर्नचा पराभव झाला व लुडविगला प्रुशियाचे मांडलिकत्व पत्करावे लागले. राजकारणातील या पीछेहाटीमुळे लुडविगला तीव्र निराशा आली. या काळात त्यांची मत्री सोफीची बहीण सीसी एलिझाबेथ हिच्याशी झाली. सीसी विवाहित होती व त्या काळात तीही विमनस्क मन:स्थितीत होती. व्हिएन्नाचा राजा काइझर फ्रांक जोसेफ तिचा पती होता. वास्तविक फ्रांक जोसेफचा विवाह सीसीची बहीण रेने हिच्याशी ठरला होता. परंतु सीसी अत्यंत देखणी स्वरूपसुंदरी होती. त्यामुळे फ्रांक जोसेफ तिच्यावर लुब्ध झाला. मात्र सीसी स्वभावाने अतिशय स्वच्छंदी व आत्मकेंद्रित होती. ती दुसऱ्याला प्रेम देऊ शकत नव्हती. त्यामुळे तिच्यात व फ्रांक जोसेफ मध्ये दुरावा निर्माण झाला. सीसीचे स्वच्छंदी वागणे तिची सासू मारिया तेरेसा हिला पसंत नव्हते. मारिया तेरेसाला सोळा मुले होती व ती व्हिएन्नाच्या राजकारणात सक्रिय सहभागी होती. तिने सीसीच्या मुलांना सीसीपासून लांब ठेवले. त्यामुळे सीसी दुखावली गेली. तसेच फ्रांक जोसेफच्या बदफैली वागण्यामुळे तिला नको तो आजार झाला. त्यामुळे अधिकच विमनस्क झालेल्या सीसीने युरोपभर मोठमोठय़ा सफरी केल्या. या काळात म्युनिकजवळील रोझनइंझेल या बेटावर ती व लुडविग एकमेकांना भेटत असत. त्यांनी एकमेकांना अनेक पत्रेही लिहिली. मात्र त्यांची मत्री विशुद्ध होती, त्यांचे कधीही शारीरिक संबंध नव्हते. योगायोग म्हणजे पुढे या दोघांच्याही जीवनाचा दुर्दैवी अंत झाला.

जिनिव्हा सरोवरानजीक लुईची या अनार्किस्ट माणसाने सीसीचा खून केला तर म्युनिकजवळील स्टार्नबॅर्ग सरोवरातील एका बेटावर लुडविगचा गूढ मृत्यू झाला. एका संध्याकाळी राजवैद्याबरोबर लुडविग या बेटावर फिरायला गेला पण परत आला नाही. नंतर त्याचा मृतदेह सरोवरात मिळाला. त्यावरून त्याच्या मृत्यूसंबंधी विविध तर्क केले जातात. लुडविगचे राजवैद्याबरोबर समलैंगिक संबंध होते व कदाचित राजवैद्यानेच त्याला ठार केले असावे असे काही तज्ज्ञ मानतात. कदाचित कोण्या तिसऱ्या व्यक्तीने दोघांचीही हत्या केली असावी अशीही शक्यता वर्तवली जाते. दोघांमध्ये झटापट झाली असावी व त्यात लुडविग ठार झाला असावा असेही मानले जाते. लुडविग बुडून मेला असावा असेही म्हटले जाते. मात्र तो पट्टीचा पोहणारा असल्याने ही शक्यता पटणारी नाही.

राजा लुडविग दुसरा याने स्वत:च्या कारकिर्दीत सर्व कलांना भरपूर प्रोत्साहन दिले. त्यामुळे अनेक मोठे कलाकार त्याच्या काळात उदयाला आले. रिचर्ड वाग्नर हा संगीत-नाटककार त्याला विशेष प्रिय होता. रिचर्ड वाग्नरने रचलेले ऑपेरा आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. रिचर्ड वाग्नरला एक भव्य ऑपेरा थिएटर बांधून देण्याचा लुडविगचा मानस होता. पण तो अर्धवटच राहिला. मात्र त्याच्या हयातीत लुडविगने हॅरेनकीमझे, नॉयश्वानश्टाईन व लिंडरहोफ या तीन ठिकाणी अतिभव्य राजवाडे बांधले. स्वत:ची व राज्याची किती तरी संपत्ती त्याने या राजवाडय़ांवरच खर्च केली. अद्वितीय सौंदर्याने नटलेले हे राजप्रासाद बघण्यासाठी आजही लोकांची अलोट गर्दी होते.

हॅरेनकीमझे पॅलेस

म्युनिक शहराच्या पूर्वेला हॅरेनकीमझे हे ठिकाण आहे. झे या जर्मन शब्दाचा अर्थ सरोवर. कीम झे हे बायर्नमधील सर्वात मोठे सरोवर आहे. त्यामुळे त्याला बायर्नचा समुद्र असेही म्हणतात. या सरोवरात फ्राउव्वनइंझेल व हॅरेनइंझेल अशी दोन बेटे आहेत. यातल्या हॅरेनइंझेल या बेटावर लुडविगने मोठय़ा हौसेने उभारलेला राजवाडा आहे. फ्रान्सचा राजा चौदावा लुई याच्या व्हस्रेलीसमधील राजवाडय़ास लुडविगने १८६७ व १८७४ अशा दोन वेळा भेट दिली होती. तो राजवाडा पाहून प्रभावित झालेल्या लुडविगने तसाच राजवाडा स्वत:साठी उभारण्याचे ठरवले. अनेक वर्षांच्या अभ्यासपूर्ण पूर्वतयारीनंतर २१ मे १८७८ रोजी जॉर्ज डोलमान या स्थापत्यकाराच्या नेतृत्वाखाली या राजवाडय़ाच्या बांधकामाला सुरुवात झाली. या प्रासादाच्या खिडक्या व बगिच्यातील अवाढव्य कारंजी व्हस्रेलीसच्या राजवाडय़ावरून जशीच्या तशी बनवली गेली. लुडविगला मोर अतिशय प्रिय होते. म्हणून प्रवेशद्वाराशी दोन मोर बसवण्यात आले. प्रासादातील प्रत्येक दालनात कलाकुसर, चित्रकला व सजावट यांची खैरात करण्यात आली. महालाचा कानाकोपरा सोन्याने मढवण्यात आला. लुडविगच्या बठकीच्या खोलीत दोन प्रचंड झुंबरे टांगलेली असून प्रत्येक झुंबरचे वजन ५०० किलो आहे. या दालनाच्या दोन्ही बाजूंना दोन प्रचंड मोठे आरसे लावलेले असून संपूर्ण दालनाची प्रतििबबे त्यांमध्ये पडतात. एकात एक पडणारी ही प्रतििबबे राजा लुडविगची कीर्ती अनंत आहे असे सूचित करतात. बठकीच्या खोलीनंतर येतो तो येथील जगप्रसिद्ध आरसेमहाल. व्हस्रेलीसच्या आरसेमहालावरून बेतण्यात आलेला हा महाल सुमारे शंभर फूट लांब आहे. त्यास १७ गवाक्षे असून एकूण ३४ आरसे या महालात टांगण्यात आले आहेत. मेणबत्त्याचे एकूण ४२ स्टॅण्ड्स महालाच्या दुतर्फा मांडलेले असून तितकीच झुंबरे छताला टांगलेली आहेत. या सर्वावर मिळून सुमारे २४०० मेणबत्त्या लावाव्या लागतात. सर्व मेणबत्त्या लावण्यासाठी २५ माणसांना अर्धा तास राबावे लागते. असामान्य सौंदर्य असणाऱ्या या दालनात आजवर अनेक चित्रपटांची शूटिंग्ज झालेली आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाचाही त्यात समवेश होतो.

आरसेमहालानंतर येते ते लुडविगचे शयनगृह. त्यासाठी लुडविगचा आवडता निळा रंग वापरण्यात आला आहे. लुडविगच्या पसंतीस उतरेल अशी प्रकाश योजना करण्यासाठी तंत्रज्ञ येथे दीड वर्षे प्रयत्न करत होते. शयनगृहाच्या उजव्या बाजूला राजवाडय़ात असणारे एकमेव स्वच्छतागृह आहे. डाव्या बाजूला एक गुप्तद्वार असून ते लुडविगच्या कपडे बदलण्याच्या खोलीत उघडते.

राजवाडय़ाच्या भोजनगृहात प्रासादातील सर्वात किमती झुंबर टांगलेले आहे. १८ आरे असणाऱ्या या चिनीमातीच्या झुंबरावर कल्पनातीत नक्षीकाम करण्यात आले आहे. या झुंबराच्या बरोबर खाली लुडविगचे डायनिंग टेबल आहे. लुडविग अविवाहित होता. त्यामुळे या टेबलावर एकाच व्यक्तीची जेवणाची सोय केलेली आहे. भोजनगृहाच्या बरोबर खालून भोजन वर पाठवण्यासाठी अनोखी यंत्रणा येथे आहे. डायनिंग टेबल जेथे ठेवले आहे तो जमिनीचा भाग उघडता येतो. तेथून साखळ्यांच्या साहाय्याने डायनिंग टेबल खाली रसमयी विभागात सोडण्यात येते. तेथे त्यावर भोजन वाढले जाते. मग टेबल पुन्हा साखळ्या ओढून वर पाठवले जाते. या सर्व कार्यक्रमास २० मिनिटे लागतात.

एवढय़ा हौसेने बांधलेल्या या स्वप्नमहालात लुडविग केवळ दहाच दिवस राहू शकला. ७ ते १६ सप्टेंबर १८८५ या काळात तो येथे होता. त्यानंतर तो स्टार्नबॅर्ग येथे गेला जिथे त्याचा गूढ मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर महालाचे काम बंद पडले. त्यामुळे राजवाडय़ाची एक बाजू आजही अपूर्णच आहे. रसमयी विभाग व स्नानगृहाचे कामही अर्धवट राहिले आहे. मुळात लुडविगला हा राजप्रासाद आता आहे त्याहीपेक्षा किती तरी भव्य बांधायचा होता. पण पशाअभावी ते शक्य झाले नाही.

आता या राजवाडय़ाच्या खालच्या भागात लुडविगच्या जीवनावर आधारित एक संग्रहालय आहे. लुडविग व सोफी यांच्यासाठी तयार केलेली विवाहवस्त्रे इथे पाहायला मिळतात, जी दुर्दैवाने कधीच वापरली गेली नाहीत. आणखी काही राजवाडे बांधण्याच्या कल्पना लुडविगच्या मनात होत्या. त्यांची मॉडेल्स येथे ठेवलेली आहेत. रिचर्ड वाग्नरला म्युनिक शहरात इझार नदीच्या काठी एक भव्य ऑपेरा थिएटर बांधून देण्याचा लुडविगचा मानस होता. त्याचेही देखणे मॉडेल येथे बघायला मिळते. लुडविगने नापसंत केलेले फर्निचर व इतर वस्तूदेखील येथे ठेवलेल्या आहेत. त्या वस्तू त्याला आवडलेल्या नसल्या तरी त्या बघून आपले डोळे मात्र फिरतात! लुडविगला पौर्वात्य संस्कृतीबद्दल कुतूहल होते. म्युनिकच्या त्याच्या राजवाडय़ात त्याने हिमालयाचे एक मोठे पेिन्टग टांगलेले होते. ते पेिन्टग आता या संग्रहालयात पाहायला मिळते. लुडविगच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाचे कृष्णधवल छायाचित्रही येथे बघवला मिळते.

हॅरेनकीमझे पॅलेसला दर वर्षी लाखो प्रवासी भेट देतात. रोजच पॅलेस बघण्यासाठी इतकी गर्दी असते की स्वतंत्रपणे रमतगमत राजवाडा बघण्याची परवानगी कुणालाच दिली जात नाही. टूर गाइडबरोबरच राजवाडय़ात प्रवेश करावा लागतो व गाइडबरोबरच बाहेर पडावे लागते. एके काळी पशाअभावी अपूर्ण राहिलेला हा महाल आता दर वर्षी सरकारला अमाप पसा मिळवून देतो.

अमेरिकेतल्या डिस्नीलॅण्डची इमारत आपण चित्रात अनेकदा पाहिलेली असते, पण ती इमारत अन्य कुठल्या इमारतीवरून जशीच्या तशी कॉपी केली गेली असेल याची आपण कल्पनाही केलेली नसते. प्रत्यक्षात ती इमारत लुडविगने बांधलेल्या नॉयश्वानश्टाइन पॅलेसची नक्कल आहे. त्यामुळे म्युनिक शहराच्या पश्चिमेला असणाऱ्या या राजवाडय़ाबद्दल लोकांना इतके प्रचंड आकर्षण आहे की दर वर्षी १५ लाखांहून अधिक प्रवासी या पॅलेसला भेट देतात. प्रुशियाविरुद्धच्या युद्धातील पराभवामुळे निराश झालेल्या लुडविगला बाह्य़ जगतापासून व मानवी वस्तीपासून दूर एकांतात राहण्याची इच्छा होती. म्हणून त्याने अत्यंत डोंगराळ व दुर्गम भागात हा राजप्रासाद उभारण्याचा निर्णय घेतला.

खरे तर दाट जंगलाने वेढलेल्या खडबडीत डोंगरमाथ्यावर देखणा प्रासाद उभा करण्याची कल्पना करणे कठीण आहे. पण नॉयश्वानश्टाइन पॅलेसमुळे ती प्रत्यक्षात उतरलेली आपल्याला दिसते. पॅलेसजवळच्या पार्किंग एरियात पोहचल्यावरदेखील दाट झाडीने लपेटलेला एक डोंगरच समोर दिसतो. पायवाटेने अर्ध्या तासाची दमछाक करणारी चढण चढून गेल्यावर एका बेसावध क्षणी पांढरी, भव्य इमारत समोर ठाकते व डिस्नीलॅण्डची आठवण करून देते. हाच नॉयश्वानश्टाइन पॅलेस. हॅरेनकीमझे पॅलेसप्रमाणे याही राजवाडय़ाचे बांधकाम लुडविगच्या हयातीत पूर्ण झाले नाही. प्रुशियाविरुद्धच्या युद्धातील पराभवानंतर सुरू झालेले या राजवाडय़ाचे बांधकाम लुडविगच्या मृत्यूनंतर सात वर्षांनी १८९२ मध्ये पूर्ण झाले. हॅरेनकीमझे पॅलेसप्रमाणे हाही महाल भव्यदिव्य बांधण्याचा लुडविगचा मानस होता. पण प्रत्यक्षात चौदाच दालने बांधणे शक्य झाले. राजवाडय़ाच्या प्रत्येक दालनातून आल्प्सच्या उत्तुंग शिखरांचे व भोवतालच्या निसर्गसुंदर प्रदेशाचे मनोहारी दर्शन घडते. युद्धातील पराभवामुळे निर्माण झालेली वेदना निसर्गाच्या सान्निध्यात राहून विसरता यावी यासाठी लुडविगने हा राजप्रासाद उभारला. राजवाडय़ातून दिसणारे निसर्गसौंदर्य बघितले की लुडविगचा हेतू साध्य झाला असावा अशी खात्री वाटते.

राजप्रासादाची अंतर्गत सजावट हॅरेनकीमझे पॅलेसच्या सजावटीप्रमाणे डोळे दिपवणारी नसली तरी लुडविगची रसिक दृष्टी अधोरेखित करणारी आहे. सुरुवातीला सामोरी येणारी त्यांची ड्रेसिंग रूम सोन्याने व जांभळ्या रेशीमवस्त्राने सुशोभित केलेली आहे. त्या वेळच्या नामांकित कवींच्या कल्पनांवर आधारित चित्रे या दालनाच्या छतावर रेखाटलेली आहेत. त्यानंतर येणारा दरबार हॉल १३ फुटी झुंबराने व देखण्या नक्षीकामाने नटलेला आहे. सिंहासनासाठी येथे उंच चौथरा आहे. त्यावर लुडविगचे सिंहासन ठेवले जाणार होते. पण तसा योग कधीच आला नाही. राजवाडय़ाचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच लुडविगचा मृत्यू झाला.

राजप्रासाद व त्याच्या भोवतालचे निसर्गसौंदर्य नीट न्याहाळता यावे यासाठी येथे मारीयेन ब्रिज नामक पूल मोठय़ा कल्पकतेने बांधलेला आहे. दोन उत्तुंग डोंगरकडय़ांना जोडणारा हा लोखंडी पूल म्हणजे अभियांत्रिकी कौशल्याचा नमुनाच आहे. एका बाजूला खळाळत अखंड कोसळणारा धबधबा, दुसऱ्या बाजूला दिसणारा नेत्रसुखद पांढराशुभ्र राजवाडा व खाली शेकडो फूट खोल दरी असे विस्मयचकित करणारे अविस्मरणीय दृश्य या पुलावरून बघायला मिळते. येणारा प्रत्येक पर्यटक हे दृश्य डोळ्यात साठवून व कॅमेऱ्यात कैद करूनच परत फिरतो आणि लुडविगच्या रसिकतेला मनोमन अभिवादन करतो.

लिंडरहोफ पॅलेस : लुडविगच्या हयातीत पूर्ण झालेला हा एकमेव राजवाडा. इथे लुडविगने दीर्घकाळ वास्तव्य केले. निंबोणीच्या झाडाला जर्मन भाषेत लिंड असे म्हणतात. या भागात निंबोणीचे बन असल्याने पूर्वापार या ठिकाणाला लिंडरहोफ असे नाव होते. वडील मॅक्सिमिलियान यांच्याबरोबर लुडविग या भागात शिकारीला येत असे. शिकारीच्या काळात राहता यावे यासाठी राजा मॅक्सिमिलियान यांनी येथे एक निवासस्थान उभे केले होते. १८६९ साली लुडविगने आजूबाजूची जमीन खरेदी केली व तेथे राजप्रासादाचे बांधकाम सुरू केले. म्युनिक शहराच्या नर्ऋत्येला असलेल्या, आल्प्सच्या गगनचुंबी शिखरांच्या कुशीत वसलेल्या व १८७८ मध्ये पूर्ण झालेल्या या प्रासादावर फ्रेंच शैलीचा प्रभाव आहे.

फ्रान्सची राणी मेरी अँटॉइनेट हिच्या व्हस्रेलीसमधील महालाप्रमाणे एक राजवाडा बांधावा अशी लुडविगची इच्छा होती. जिथे मनाला पूर्ण शांती लाभेल असे निवासस्थान त्याला हवे होते. म्हणून जॉर्ज डोलमान या स्थापत्यकाराच्या नेतृत्वाखाली १८६९ साली या राजप्रासादाचे बांधकाम सुरू केले गेले, जे दशकभराने पूर्ण झाले. जॉर्ज डोलमानने बरोक व रोकोको शैलींचा अफलातून वापर या कामात केला. त्यामुळे िलडरहोफ पॅलेस व त्याभोवतालचा बगीचा हे १९ व्या शतकातील सर्वोत्कृष्ट कलात्मक वास्तुशिल्प ठरले. पुढे याच स्थापत्यकाराने लुडविगसाठी हॅरेनकीमझे पॅलेसही उभारला. त्यामुळे लिंडरहोफ पॅलेस व हॅरेनकीमझे पॅलेस या दोन्ही प्रासादांमधील दरबारहॉल, शयनगृह, आरसेमहाल भोजनगृह व रसमयी विभाग यांच्या बांधणीत व रचनेत बरेच साम्य आहे. सोन्याने मढवलेली कलाकुसर दोन्ही ठिकाणी डोळे दिपवून टाकते. या राजवाडय़ातील दरबारहॉलमधील डेस्क व छत कलाकुसरीमुळे थक्क करून टाकतात. शयनगृहतील रंगसंगती लुडविगच्या पसंतीची व फ्रेंच शैलीतील आहे. आरसेमहालदेखील स्वर्णजडित रोकोको शैलीत सजवलेला असून आकर्षक पेिन्टग्जनी त्याची शोभा द्विगुणित केली आहे. भोजनगृह व रसमयी विभाग यांची रचना हॅरेनकीमझे पॅलेसमध्ये आहे तशीच आहे. येथेही हे दोन विभाग एकमेकांशी जोडलेले असून डायनिंग टेबल साखळ्यांच्या साहाय्याने खालीवर करता येते. भोजन करताना राजाला सेवकांचा अडथळा येऊ नये म्हणून ही रचना केली गेली होती.

राजप्रासादाच्या दुसऱ्या टोकाला असणारे व्हीनस टेम्पल हे लिंडरहोफ पॅलेसचे महत्त्वाची खासीयत आहे. पाण्याच्या झऱ्याची पाश्र्वभूमी असणाऱ्या या देखण्या वास्तूत लुडविग तासन्तास रमत असे. १८७८ मध्ये जगातील पहिला वीजप्रकल्प जर्मनीत सुरू झाला. त्याची वीज या वास्तूत त्या वेळी खेळवली गेली. त्यामुळे लुडविग सूर्यास्तानंतरही येथे समय व्यतीत करू शकत असे.

या राजवाडय़ासमोरील उद्यान हा आणखी एक कौतुकाचा विषय आहे. राजवाडा बांधून झाल्यानंतर पुढे दोन वर्षे या उद्यानाचे काम सुरू होते. या रेखीव वाटिकेच्या केंद्रभागी तलाव असून त्यात देखणे कारंजे बसवलेले आहे. प्रसादाच्या संपूर्ण प्रांगणात पाणी खेळवलेले असून त्यामुळे बागेचे सौंदर्य अधिकच वाढलेले आहे.

हॅरेनकीमझे, नॉयश्वानश्टाईन व लिंडरहोफ या तीनही प्रासादांचे लावण्य पहिले की लुडविगच्या सौंदर्यदृष्टीला सलाम करावासा वाटतो. तसेच त्याच्या सुखलोलुप मनोवृत्तीची कीवही करावीशी वाटते. १९व्या शतकात त्याने उभारलेल्या राजप्रासादाचे सौंदर्य दोन महायुद्धांनंतर आजही अबाधित राहिले आहे याचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 1:01 am

Web Title: king ludwig i and king ludwig ii of bavaria
Next Stories
1 फ्रेंच रिव्हीएराची भटकंती
2 टिकलीएवढा लिश्टनश्टाइन
3 फॅमिली बॉण्डिंगसाठी
Just Now!
X