वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या संस्कृती, त्यांचा इतिहास, वारसा, तो जपणाऱ्या विविध वास्तूंमुळे स्पेनला ऐतिहासिक संपन्नता लाभली आहे. अमेरिकेचा शोध लावणाऱ्या कोलंबसाचे तर या देशात जरा जास्तच प्रस्थ आहे..

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा हिंदी चित्रपट जेव्हा पाहिला होता तेव्हाच ठरवले होते की ते टोमॅटो फेस्टिव्हल, आपल्या गोविंदासारखा ह्य़ुमन टॉवर पाहावयास स्पेन येथे जाण्याचे ठरविले; पण अंदाज जरा चुकला म्हणजे आम्ही एप्रिलच्या सुरुवातीला गेलो. पण तिथे पोहोचल्यावर कळले की ते सप्टेंबरमध्ये साजरे होते. मग विचार केला की आता आलोच आहोत तर बाकीची मजा केलीच पाहिजे.
अटलांटिक महासागर व मेडिटरनिअन समुद्र या परिसरातील द्वीप समूहाला आयबेरिअन पेनिनसुला म्हटले जाते. या द्वीप समूहातील वेगवेगळी बेटे स्पेनच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे दोन्ही समुद्रांचा किनारा लाभलेला हा देश युरोपात दक्षिणेला आहे. तसेच फ्रान्स, अन्डोरा, बिस्क बे, तसेच उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को यांच्या सीमेशी संलग्न, तर युरोपीअन युनियनमध्ये सर्वात लांब, पोर्तुगालबरोबर १२१४ मैलांची अखंड सीमा असलेला असा हा देश आहे. इथे सुरुवातीला फिनीशिअन, काथरेनिअन, ग्रीक संस्कृतीचे वास्तव्य होते. ख्रिस्तपूर्व दोनशे वर्षे इथे रोमन राजवट होती. त्यांनी या समूहाला हिस्पानिया असे नाव दिले. हे नाव कशावरून आले हे आज कुणालाही सांगता येत नाही. रोमन गुरूंनी टेम्पल्स् उभारली. पुढे उत्तर आफ्रिकेतून मूर्स म्हणजे मुस्लिम आले. ते मात्र सहाशे वर्षे ठाण मांडून बसले.
पंधराव्या शतकात राजा फर्दिनान्द व राणी ईसाबेला या ख्रिश्चन दाम्पत्याने विवाहानंतर मुस्लिमांचा पराभव करून परत कॅथलिक राजवट आणली. त्यानंतर मात्र स्पेन येथे ख्रिश्चन धर्मगुरूंचे वर्चस्व वाढले. ते संखेने भरपूर असल्याने इथे चर्चेसना तोटा नाही. त्याकाळात जनतेवर बरेच अत्याचार झाले, बळजोरी झाली. पुढे सिव्हील वॉरमधे व फ्रँको नामक नेत्याने आपली सत्ता स्थापन करताना सुशिक्षित लोकांची मोठय़ा प्रमाणावर हत्या केली. तेव्हा इथे स्पॅनिश भाषेशिवाय दुसरी भाषा बोलण्यास प्रतिबंध होता. तेव्हा सर्वच मुलांची नावे होजे, तर मुली मारिया अशीच हवीत असा कायदा होता. शालेय शिक्षण कॅथलिक शाळेतच झाले पाहिजे, धार्मिक शिक्षण, रोझरी, प्रार्थनेसाठी आपल्याच विभागातल्या चर्चमध्ये गेले पाहिजे अशी सक्त ताकीद होती. ही परिस्थिती अगदी १९७६ पर्यंत होती. त्यामुळे अजूनही बरीचशी जनता इंग्लिश भाषेत मागे आहे.
lp26स्पेनमध्ये माद्रिद, बार्सेलोनेटा, सालामंका, सारागोसा, अंडालुसिया, सेगोव्हिया, सॅन सॅबेस्टिन, ग्रॅनाडा, कार्दोबा असे वेगवेगळे १७ विभाग आहेत व प्रत्येक विभागाची राजधानी वेगळी. देशात स्पॅनिश, गलीसिया, कातालान व बास्क अशा चार भाषा वेगवेगळ्या विभागांत बोलल्या जातात. पैकी बास्क भाषेचा प्रांत फ्रान्सपासून बराच जवळ असल्याने त्यात फ्रेंच थोडे मिसळले आहे. त्यामुळे ही भाषा थोडी क्लिष्ट समजली जाते. १२ ऑक्टोबर हा एस्पानिया डे फिएस्टा, म्हणजे स्पॅनिश डे संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. कारण त्या दिवशी ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. कोलंबसला स्पॅनिश भाषेत ख्रिस्तोबल कोलान असे म्हणतात. असो.
माद्रिद ही स्पेनची राजधानी. ही युरोपमधली सर्वात मोठी ग्रीन सिटी समजली जाते. मंझार्नेस नदीकाठी लहानशा डोंगरावर वसलेली ही नगरी. खरेतर, येथे राजघराण्याचे निवासस्थान होते. पण ऑस्ट्रअिन हॉब्सबर्ग राजवटीत, राजा फिलीपने माद्रिद येथून राजधानी झारझुला येथे हलवली. येथे पूर्वेस असलेल्या प्रवेशद्वारातून सूर्यप्रकाश प्रथम येत असे म्हणून गेटचे नाव होते पोर्ता डेल सोल. ही जागा हॅपनिंग प्लेस आहे. सदैव लोकांनी गजबजलेली. शिवाय बरीच हॉटेल्स्, भरपूर बार, मोठमोठी दुकानं यांनी सजलेली. वीक एंडला नाईट लाईफ अगदी सकाळी पाचसहा वाजेपर्यंत चालते. मध्यवर्ती ठिकाण असल्याने तिथल्या पोस्ट ऑफिसकडेच आसपासच्या परिसराचे अंतर मोजण्यासाठी शून्य (0- झीरो) मैलाचा माइल स्टोन आहे. इथला पॅलेसिओ रिआल हा फ्रान्सच्या वर्सेलीस येथील राजवाडय़ापेक्षा प्रशस्त आहे. माद्रिद हे शहर राजवाडय़ापासून ते म्युझियम, आर्ट सेंटर अशा वेगवेगळया इमारतींचे संग्रहालयच म्हटले पाहिजे.
lp27२० एकर क्षेत्रफळ असलेले रिअल जार्डीन बोटॅनिको हे युरोपमधील सर्वात मोठे गार्डन म्हटले जाते. राजा फर्दिनान्दच्या काळात त्याची सुरुवात केली होती, पण पुढे चार्लसने त्याचा विस्तार केला. आणि वर्तमानातील जागी उभारले. एवढया मोठया गार्डनमध्ये व्हेलानुवा हॉल, दोन ग्रीन हाउसेस आहेत. पैकी एकात कटिबंधीय, वाळवंटातील व ऊष्ण हवामानातील झाडे अशी लागवड आहे. येथे वनस्पती शास्त्रावर बरेच संशोधन केले जाते. गार्डनमधे एकूण ३० हजार फुलझाडे व लहान झाडे आहेत, तर १५०० मोठे वृक्ष आहेत. पॅलेसिओ रिआल हे राजा चार्लसचे निवासस्थान. या राजवाडय़ात तीन हजारांवर खोल्या आहेत तर चटई क्षेत्र नऊ हजार चारस फुटांपेक्षा जास्त असून नऊ प्रवेशद्वारं आहेत. यावरून भव्यतेची कल्पना येते. पूर्वीच्या काळी सर्व वास्तू लाकडी असत. फिलीप राजाच्या कारकीर्दीत या राजवाडय़ाला आग लागली होती. आतल्या बऱ्याच शोभेच्या वस्तू, टेपेस्ट्रीज् जळून गेल्या. पण राजाने काही अमूल्य पेंटीग्ज तिथून हलवल्याने दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित राहिली. इथले तिकीट फारच महागडे आहे.
lp28प्लाझा डे कोलोन, या स्क्वेअरमध्ये अमेरिकेचा शोध लावणाऱ्या ख्रिस्तोफर कोलंबसचा पुतळा आहे. कारंजे असलेल्या चौथऱ्याच्या उंच मनोऱ्यावर असलेल्या या पुतळ्यातला कोलंबस समुद्राच्या दिशेने पाहतो आहे. त्याच चौकात काही वर्षांनी प्रतिष्ठित स्थानिकांनी सिमेंटचा नांगर उभारून त्यावर स्थानिक भाषेत त्या विषयी मजकूर लिहिला आहे. इथे एकोणिसाव्या शतकात बांधलेल्या अटोचा रेल्वे स्टेशनचे मध्यंतरी लागलेल्या आगीत बरेचसे नुकसान झाले, पण पुढे पॅरिसचा धनिक गस्ताव आयफेल याच्या मदतीने नवे स्टेशन बांधले गेले. लोकल गाडय़ांबरोबर इथे धावणारी अे व्ही ई स्पीड ट्रेन, ही तीन हजार किमी. लांबीच्या ट्रॅकवर ३१० किमी. वेगाने धावणारी, जपानच्या शिंकान्शेन बुलेट ट्रेननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध लोकांचे स्मरण म्हणून चौकात झाडे लावली आहेत.
lp29प्रादो हे जगातील अव्वल दर्जाचे म्युझियम माद्रिद येथे आहे. या ठिकाणी स्पॅनिश राजवटीत वेगवेगळ्या राजघराण्यांतील चित्रे, रंगीत चित्रे, काही शिल्पे असा आठ ते नऊ हजारांवर संग्रह आहे. ही सर्वच चित्रे आपल्याला पाहायला मिळतील असे नाही, कारण ती वेगवेगळ्या ठिकाणी असतात. इथला प्रचंड साठा दोनतीन मजल्यांवर वेगवेगळ्या दालनात ठेवला आहे. इथे व्हेलाकहा, गोया, रुबेन, ग्रेको अशा वेगवेगळ्या कलाकारांची खास शैलीतील चित्रे आहेत. त्या काळी नग्न चित्र पाहणे हे अशिष्ट समजले जात असे. गोयाने अशाच एका स्त्रिच्या नग्न चित्राच्या दोन प्रती केल्या होत्या. समारंभ, प्रदर्शनासाठी वस्त्रे परिधान केलेली नायिका तर मागील खोलीत खास मंडळींसाठी दोरीने ते चित्र वर जाऊन तीच नायिका विवस्त्र दाखवली आहे. तसेच विवस्त्र, पण स्त्रीच्या आयुष्यात अत्यानंद, तेजस्वीपणा, सदाबहार अशा तीन भावांचे तीन स्त्रियांनी हातात हात घालून रिंगण केलेले चित्र पाहण्याजोगे आहे.
ग्रेको याची चित्रे धर्मातील त्या वेळच्या घडामोडींवर आधारित असत. म्हणजे मदर मेरीच्या हातात येशू असताना देवदूतांनी केलेली पुष्पवृष्टी, त्याच्या आयुष्याचा खडतर प्रवास, सुळावर चढताना वगैरे. तर व्हेलाक्झ याने फिलीप राजाच्या कुटुंबाची चित्रे काढली आहेत. त्याच्या चित्रात शरीरयष्टी व्यवस्थित आहे. फिलीप राजाच्या राणीला २१ मुले होती. एवढय़ा बाळंतपणांमुळे अशक्त झालेली राणी उभी असण्यापेक्षा बसलेलीच आहे. ला मिनीनास चित्रात त्याने राजकन्या, तिच्या दासी, कुत्रा, आरशात दिसणारे राजा व राणीचे प्रतिबिंब दाखवले आहे. त्यातील रंगसंगती पाहताना चित्रातील खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात आपण थ्री डायमेंशन चित्रच पाहत आहोत असा भास होतो. त्याची खासियत अशी की जसा आलफ्रेड हिचकॉक त्याच्या चित्रपटात कधीतरी डोकावून जातोच, तसेच हादेखील चित्रात कुठेतरी असतोच. प्रत्येक कलाकाराची आविष्काराची तऱ्हा वेगळी. असो.
माद्रिद येथील फुटबॉल स्टेडियममध्ये लाखांवर प्रेक्षक बसण्याची सोय आहे. इथली बुल फाइट पाहण्याची इच्छा होती, पण हा क्रूर प्रकार असल्याने ठरावीक दिवशीच ही फाइट असते.
सेव्हीआ हे अंदालुसिया प्रांताची राजधानी. वादाल्की ही नदी या शहरातून वाहणारी नदी व ती अटलांटिक महासागराला मिळते. हे अंतर फक्त ९० किमी असल्याने ते स्पेनमधे नदीवरील एकमेव बंदर आहे. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावल्यावर हे मोठे औद्योगिक शहर विकसित झाले. व्यापार, शिक्षण, वैद्यकीय अशा वेगवेगळया पातळ्यांवर आसपासच्या देशांतील नागरिक इथून तिथून ये-जा करू लागले. युरोपात अटलांटिक सागरावर जणू स्पेनची मालकीच झाली होती म्हणा. तो काळ या देशाचा सुवर्ण काळ म्हटला पाहिजे. तेव्हा याबाबतीत स्पेन आघाडीवर होते.
१९२० मध्ये आयबेरो अमेरिकन अधिवेशनात प्लाझा इस्पानिया म्हणून अर्धवर्तुळाकृती वास्तू मारिया लुईसा पार्कमध्ये उभारली आहे. वादाल्कीर नदीच्या पट्टय़ातच असल्याने परिसर सदा हिरवागार असतो. पार्कमध्ये सोनेरी बिटर ऑरेंजची हजारांवर झाडे आहेत. बागेत शिरल्यावर लगेचच फळांचा सुगंध यायला लागतो. ही संत्री चवीला कडवट असल्याने त्याचा मार्मलेडमधे व बार्बेक्युचे मटण मुरवायला त्यांचा वापर केला जातो. स्पेनमध्ये कोलंबसाचे प्रस्थ जरा जास्तच आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याचे स्मारक असतेच. पार्कच्या प्रवेशावरच ज्या बोटीतून कोलंबस अमेरिकेच्या शोधात गेला तिची लहान प्रतिकृती आहे. बोटीच्या एका टोकाला शक्तीचे प्रतीक म्हणून सिंह आहे. शिडाच्या टोकावर दुर्बिणीतून पाहणारा कोलंबस आहे. हा परिसरच एवढा भव्य आहे की इथून तिथून आरामात फिरता येण्यासाठी लहान कालवे व त्यावर पूल बांधले आहेत.
सेव्हियाच्या जुन्या भागात सेव्हिआ कॅथ्रिडल आहे. मूरिश कारकीर्दीत ती मशीद होती. त्या वेळचा राजा कालीफ याने मोरोक्को येथील मराकेशमधली कुतुबिया मशिदीप्रमाणे प्रार्थनेची वेळ सांगणारा व चहूकडे लक्ष ठेवण्यासाठी कळसावर चार तांब्याचे गोळे असलेला मिनार उभारला. तोच कॅथ्रिडलमधला जिराल्डा टॉवर. सर्वात वर हातात ढाल घेतलेला कुणा देवतेचा पुतळा आहे. त्याचा वातकुक्कुट म्हणून उपयोग केला जाई. इतका उंच टॉवर चढण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून जिन्याऐवजी उतरणीचा चढ-उतार आहे. पाया दोन घोडे आरामात वर जातील इतका रुंद आहे.
lp30चर्च इतके भव्य आहे की पाहताना आ वासलेला आपला चेहरा किती वेळ तसाच राहतो ते कळतच नाही. त्याला वेगवेगळ्या नावांचे सोळा प्रवेश आहेत. अॅझम्पशन गेटमधून आवारातली संत्र्याची बाग पार करून आपण चर्चमध्ये प्रवेश करतो. चर्चचे क्षेत्रफळ ११ हजार चौरस फूट आहे. त्यात ८० प्रार्थना ठिकाणं आहेत. मध्यभागी असलेला गाभारा ४२ मी. उंच आहे. त्याला कमानीसारख्या खांबांनी आधार दिला आहे. चारही बाजूंना लाकडावर ख्रि्रश्चन धर्मगुरू, आहेत. येशूच्या जीवन प्रवासाच्या चित्रांना सोन्याचा मुलामा दिला आहे. मधला आल्टर दोन टन वजनाच्या सोन्याने येशू, मदर मेरी वगैरे शिल्पांनी नटला आहे. दक्षिणेला मक्केच्या दिशेने असलेली नक्षीदार महिरप अजूनही छान आहे. तसेच कोलंबसची शव पेटी त्याच्या काळातील चार राजवटींचे प्रतीक असलेले दूत खांद्यावर घेऊन आहेत. कोलंबस मृत्यू पावल्यावर क्युबामध्ये त्याला पुरले होते, पण राजकीय बंडामुळे डॉमिनीकन्, स्पेन या देशांमध्ये शव आणले गेले व शेवटी येथेच पुरले. आपल्या सफरीत कोलंबसने ज्या देशांत पाय ठेवला होता ते सर्व देश त्याच्या अस्थी मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत होते. त्यामुळे असे म्हटले जाते की कोलंबस डाईड इन पीस बट् बरिड इन पीसेस.
कार्दोबा ही अंदालुसीया येथील कार्दोबा विभागाची राजधानी. या ठिकाणचा दबदबाही सेव्हियासारखाच होता. मूरिश राजा अब्द् र्अ रहमान याने ही अफलातून मशीद उभारली. ह्य ठिकाणी पैगंबराच्या हाताचे हाड व कुराणाची मूळ प्रत असल्याने मुस्लिमांचे तीर्थक्षेत्र मानले जाते. त्या काळी टाऊन प्लानिंगप्रमाणे स्थापित झालेल्या शहरात फिरताना एक गंमत पाहायला मिळाली. पूर्वी मुस्लीम देशांत स्त्रियांनी खिडकीत उभे राहू नये असा रिवाज असल्याने चौकोनी घराच्या भिंतींना उंचावर खिडकी, आत मध्यभागी आवार फुलझाडं, कारंजा व आतल्या भिंती छोटय़ा कुंडय़ांत वेगवेगळ्या रंगांची फुलझाडे लावून सुशोभित केलेल्या, त्याला पॅडीओ म्हणतात. ती स्त्रियांची करमणुकीची जागा. हल्लीच्या नव्या युगातही घरांची बांधणी व पॅडीओ तसेच. दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये त्यांच्यात स्पर्धा होऊन उत्कृष्ट पॅडीओला बक्षीस दिले जाते.
नारळीबागेत जसे असंख्य माड दिसतात तसेच चॅपेलमधील लाल-पांढऱ्या पट्टय़ा असलेल्या विशाल कमानींचे खांब असलेल्या बनात आपण अगदी हरखून जातो. आतील उंच गाभाऱ्याच्या छतावरील गॉथिक डिझाइन्स मान वर करून पाहताना भोवळ आल्यासारखी होते. आल्टर व सभोवार आर्च बिशप सीट व इतर धर्मगुरूंना बसण्याची आसनं ही महागोनी लाकडांची असून त्यावर बायबलमधील दृश्ये, मेरी, गरुड अशी चित्रे कोरलेली आहेत. या कॅथ्रिडलचे चॅपेल, मशीद, परत चॅपेल अशी रूपे झाल्याने एक विरोधाभास दिसतो. तो म्हणजे राजा आल्फांसोच्या कॅथ्रिडलमध्ये मुस्लिमांची प्रार्थना जागा अबाधित ठेवल्याने चॅपेल व मशीद हे अगदी एकमेकांना लागूनच आहेत. येथे दोन्ही धर्माच्या प्रार्थना वेळेनुसार पार पडतात. येथेही मक्केच्या दिशेने महिरप असून त्यावर बायझन्टाइन कलेप्रमाणे रंगीत दगडांनी केलेली मोझेक डिझाइन्स आहेत, तसेच सुवर्णाक्षरांनी कुराणातली कलमेदेखील लिहिली आहेत. आतल्या बाजूला सुलतानच्या प्रार्थनेसाठी खास दालन होते तर आम जनता बाहेर मोठय़ा दिवाण ए आममध्ये नमाज पढत असे. आजही खास सणानिमित्त इथे नमाजसाठी ३० ते ४० हजार लोक जमतात असे म्हणतात.
व्हॅलेंसिआ इज अ सिटी ऑफ सायन्स अॅण्ड आर्ट्स असे म्हटले जाते ते सांतियागो कालत्राव व फेलिक्स चंडेला यांच्या अत्याधुनिक, कलात्मक बांधणीने. ५० वर्षांपूर्वी तुरिया नदीला आलेल्या पुराने गावाचे दोन तुकडे केले होते. या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नदीचा प्रवाहच वळवून बाहेरून समुद्राला मिळेपर्यंत दुसरा मार्ग केला. त्या रिक्त पात्रात स्वििमग पूल, टेनिस कोर्ट्स, मुलांसाठी खेळण्यासाठी पार्क, ग्रीन हाऊस असलेले लांबच्या लांब संकन पार्क केले आहे. त्यावर असलेल्या पुलांपैकी एकावर फक्त रंगीत फुलझाडे लावली आहेत. पार्कच्या एका टोकावरून घेतलेली सायकल आपण दुसऱ्या टोकावरील दुकानात परत देऊ शकतो ह्यवरून पार्कच्या भव्यतेची कल्पना आली असेलच.
आता कालत्रावाच्या पाहिलीच पाहिजे अशा कलात्मक बांधणीविषयी पाहू. संकन पार्कच्या शेवटी या सर्व बिल्डिंग उथळ अशा स्वििमग पूलसारख्या पाण्यात आहेत. ल् अंब्रेकल हा सिटी ऑफ सायन्सचा प्रवेश. काही फिक्स तर काही फ्लोटिंग अशा आर्चेसच्या आत-बाहेर स्थानिक शिल्पे आहेत. गार्डनमध्ये मोसमानुसार रंग बदलणाऱ्या झाडांनी शोभा आणली आहे. ओशनोग्राफिक हे युरोपमधले सर्वात मोठे मत्स्यालय आहे. इथल्या २६ मी. रुंदी असलेल्या काचेमागे जगातील वेगवेगळ्या तापमानातील जलचरांसाठी वेगळे विभाग आहेत. करमणूक, शैक्षणिक व संशोधन ह्य हेतूने बांधलेले मत्स्यालय लोकप्रिय आहे. पाण्याखाली असलेल्या रेस्टॉरंटमध्ये बसून अवतीभवती फिरणाऱ्या माशाच्या सान्निध्यात चहापानाची मजा वेगळीच, पण हे सर्व तिकीट काढूनच.
ल् हेमिस्फिरीक हे बाहेरून मानवी डोळ्यांप्रमाणे दिसणारे नभांगण. वारा नसताना संथ पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे मानवी डोळाच. असं म्हणतात की आतील बाजूस असलेल्या एका खांबाकडून बोलल्यास ध्वनी परावíतत होऊन समोर अगदी जवळ बोलल्यासारखे वाटते. फिलीप सायन्स म्युझियम हा व्हेल माशाच्या जबडय़ासारखा दिसतो तर ल् अगोरा ही अंडाकृती सिरॅमिक टाइल्स व धातूने बांधलेली इमारत आहे. संकन पार्क हे सर्व वयोगटातील नागरिकांचा विचार करून अतिशय कलात्मकरीत्या बांधलेली जागा. येथे लहान मुलांसाठी पार्क, वृद्धांना आरामासाठी बेंचेस, तरुण वर्गासाठी बॅडमिंटन व टेनिस कोर्ट, स्वििमग पूल आहे. एक पूल नुसता फुलांनी भरलेला आहे.
इथली प्रसिद्ध कॅथ्रिडलस्, व फ्लेमिंगो डान्स, तसेच बुल फाइट अनुभवण्यासाठी परत स्पेनमध्ये येण्याचा विचार आहे.