News Flash

नर्मदा परिक्रमा

नर्मदेच्या काठाकाठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा.

नर्मदेच्या काठाकाठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. ती धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीला अंतर्मुख होण्यापलीकडेही बरंच काही शिकवून जातो.

या भूतलावर नर्मदा परिक्रमा ही मोठी प्रदक्षिणा आहे. श्री काशी क्षेत्राची पंचकोस, तर अयोध्या-मथुरा यांची चौऱ्याऐंशी कोस. नैमिपारण्य- जनकपुरी या सर्वाहून मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची परिक्रमा- जवळजवळ तीन हजार ५०० कि.मी. (१७८० मैल) आहे. सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. कारण ती दक्षिण व उत्तर तटावरून गोलाकार वाहते. नदी जशी वाहते तशी तिच्या काठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा. प्रथम ही परिक्रमा श्री मरकडेय ऋषीमुनींनी अतिशय खडतर तप म्हणून पूर्ण केली. त्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे सांगितले जाते.

नर्मदा ही मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांतून वाहणारी प्रमुख नदी आहे. अमरकंटक शिखरातून तिचा उगम होतो. सातपुडय़ाच्या अमरकंटक या छोटय़ाशा गावातून निघून बराच मोठा प्रवास करून ती अरबी समुद्रास मिळते. तसेच नर्मदा नदीस उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषाही मानली जाते. नर्मदेचे धार्मिक महत्त्वही खूप मोठे आहे. महाभारत आणि रामायणात ती रेवा या नावाने ओळखली जाते. हिच्या महिमेचे वर्णन चारही वेदांत आहे.

अशी ही पवित्र परिक्रमा पूर्ण करण्याचे भाग्य मला मिळाले. मी व माझी मैत्रीण विजया चौधरी डोंबिवली येथून पंजाब मेलने खांडवा व नंतर ओंकारेश्वर येथे गेलो. तिथून सात नोव्हेंबर २०१४ ला पायी परिक्रमेचा संकल्प करून सुमारे १०५ दिवसांनी म्हणजे १९ फेब्रुवारी २०१५ रोजी तो तडीस नेला. वयाच्या ५२ व्या वर्षी अनेक अडचणींतून मार्ग काढत परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर जे अनुभवदर्शन झाले व त्यामुळे जो आनंद झाला, मानसिक समाधान मिळाले त्याने खरेच कृतकृत्य झाल्याचा भाव हृदयी विलसत आहे. ही परिक्रमा म्हणजे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक तप आहे.

वास्तविक स्त्रिया अगदी आठ दिवस घर सोडून कुठे बाहेर गेल्या तरी भावुक होतात. पण मी तर तब्बल चार महिने कुटुंबाला सोडून नर्मदामाईला भेटायला आले होते. इथे मानसिक कणखरपणा दाखवावाच लागतो. एकदा चालायला सुरुवात केल्यावर मागे वळून पाहायचेच नाही, असा निश्चयच केला होता. एक एक दिवस पुढे सरकत होता. परीक्षा सुरू झाली होती. सुरुवातीला तळपायाला फोड आल्याने सेप्टिक झाले. पण रोजचे २५ कि.मी. चालणे अपरिहार्यच होते. रात्रीची जागा मिळेल तिथे, अंधारात, मंदिरात, उघडय़ावर, पारावर शांत झोप लागणं यापेक्षा तिच्या आपल्यात असलेल्या अस्तित्वाचं वेगळं प्रमाण ते कोणतं?

परिक्रमेला निघण्यापूर्वी भारती ठाकुरांचे परिक्रमेवरील पुस्तक वाचले होते. त्यांचा लेपा येथील आदिवासी भागातील उपक्रम व त्यांचे काम पाहण्याचीही इच्छा होतीच. आदिवासी मुलांच्या शाळा व काही आदिवासी मुलं स्वत: शिस्तबद्ध रीतीने सांभाळणे व त्यांच्यातील गुण ओळखून त्यांना त्याचे शिक्षण देणे हे महत्त्वाचे कार्य त्या नि:स्वार्थीपणाने करीत आहेत.

हळूहळू येथील वातावरणाशी आम्ही समरस होत चाललो होतो. तेथील वातावरण इतकं ‘नर्मदे हर’ या शब्दांनी भारित झाले आहे की कोंबडय़ाची बांग, गाईचं हंबरणं, पक्ष्यांचा मंजूळ आवाज या सगळ्यातून आपल्याला ‘नर्मदे हर’ असेच ऐकावयास येते. त्याला आपण ‘नर्मदे हर’ या शब्दांनीच प्रतिसाद द्यायचा असतो.

नर्मदेने आपल्या आवाक्यातील सारा परिसर हराभरा आणि निसर्गसौंदर्याने समृद्ध केला आहे. काही ठिकाणी परिक्रमा मार्ग शेतातून व केळीच्या बागांमधून जातो. तेथील भरपूर निसर्गसौंदर्य, शेती, ताजी फळं, ताज्या भाज्या या सर्वाचा परिक्रमेदरम्यान आनंद घेता आला. उसाच्या शेताजवळून जाताना हवा तेवढा मनसोक्त ऊस खायला मिळत होता. वाटेत लागणाऱ्या लहान लहान खेडय़ांमध्ये विजेचा पत्ताच नव्हता.

प्रवासात कोरीव काम केलेली अनेक सुंदर सुंदर मंदिरे दिसली. मगरीवर स्वार नर्मदामातेची मूर्ती व छबी अतिशय मोहक वाटते. खूप सुंदर घाट, ठिकठिकाणी सुंदर आश्रम, धर्मशाळा असे सर्व लागत होते. कधी आश्रमात, कधी धर्मशाळेत राहणे, तिथे मिळेल ते खाणे हा रोजचा दिनक्रम झाला होता.

तुम्ही परिक्रमावासी म्हटल्यावर तुमच्याबद्दल अत्यंत आदराची भावना लहानथोर, गरीब, श्रीमंत अशा सर्व प्रकारच्या माणसांमध्ये दिसते. दोन वर्षांच्या मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण ‘नर्मदे हर’ म्हणून आदर व्यक्त करीत असतो.

परिक्रमेतील एक विलक्षण अनुभव म्हणजे पाच तासांचा समुद्रप्रवास. नर्मदा नदी जिथे अरबी समुद्राला मिळते, तिथे समुद्राच्या मध्यभागी, समुद्रात सामावून न जाता तिचे वेगळे अस्तित्व पाहायला मिळते. तिथे आपण परिक्रमेसाठी घेतलेले गोमुखातील अर्धे जल नर्मदा नदीला समर्पित करून तिथूनच अर्धे जल पुन्हा बाटली पूर्ण भरून नर्मदामैयाची ओटी समुद्रातील पाण्यात सोडायची असते. हा प्रवास समुद्राच्या भरतीनुसार १५ दिवस सकाळी व १५ दिवस रात्री असा असतो. आम्हाला तो सकाळी होता. कठपोर येथून हा प्रवास सुरू होतो.

‘नर्मदे हर, नर्मदे हर, रक्षो माम, नर्मदे हर, नर्मदे हर, प्राही मा मेजेच’ – म्हणजे- नर्मदे माते, आमचे रक्षण कर व तूच आम्हाला तार, अशा प्रकारचे प्रार्थनास्वरूपी नामस्मरण धर्मशाळेत तुमच्याकडून करून घेतले जाते. कारण आपण तिच्यापुढे समर्पित होऊन हा प्रवास करावयाचा असतो. समुद्राला भरती आल्यानंतर या बोटी समुद्रात उतरवता येतात. त्यामुळे सकाळी चार वाजल्यापासून जेव्हा भरती येईल त्या वेळेला ती बोट सुटते. भरपूर थंडी, अथांग समुद्र, वर निळेभोर आकाश, नावाडी आणि प्रवासी.. रात्रीच्या प्रवासात आजूबाजूला मिट्ट काळोख असतो. अवर्णनीय व रोमांचकारी असा हा प्रवास. दोन्ही तटांवर प्रचंड चिखल. त्यामुळे बोटीत चढताना व उतरताना प्रचंड त्रेधातिरपीट होते. पण खूप आनंदही वाटतो. त्यात नावेत भजन, आरती हेही चालू असतेच. नर्मदामैयाची आर्ततेने केलेली आरती व त्यामुळे ती आपल्याला सुखरूप पैलतीरी नेते अशी भक्तांची भावना असते.

आमची दोघींची चाल कमी-जास्त असल्यामुळे प्रवासात आमची दोन-तीन वेळा ताटातूट झाली. त्यामुळे काही दिवस मला एकटीला राहावे लागले. पण त्यामुळे माझी भीती पार निघून गेली. फक्त चुकल्यावर रस्ता मिळेल का ही भीती असायची. मंडलेश्वर, महेश्वर या ठिकाणी मी एकटीच होते. मध्येच काही दिवसांनी मैत्रीण भेटली. मग आम्ही बरोबर चालू लागलो. हळूहळू अवघड रस्ते पार करीत लक्कडकोट येथील घनदाट जंगल पार करण्याचा दिवस उजाडला. आम्ही या जंगलात फसलो. त्या दिवशी रस्ता सापडेपर्यंत बरीच चाल झाली.

नर्मदेचे नाभीस्थान म्हटले जाणारे नेमावर हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. शंकराचे खूप प्राचीन मंदिर तेथे आहे. येथेच नर्मदामातेचे सुंदर मंदिर आहे.

नंतर एक-दोन दिवसांत सात जणांच्या परिवारात माझा समावेश झाला. मग त्यांच्याप्रमाणे दिनक्रम सुरू झाला. तेथे प्रचंड थंडी. अशी थंडी आजपर्यंतच्या आयुष्यात मी कधीच अनुभवली नव्हती. प्रचंड धुकं आणि पाऊस. रोज पहाटे साडेचार वाजता उठून नर्मदेत किंवा हातपंपावर आंघोळ करणे, पूजा-आरती, नंतर साडेसहा वाजता चालायला सुरुवात.. असा दिनक्रम. दमून संध्याकाळी थांबू तिथे सर्वासाठी चूल पेटवून टिक्कड, जाड पोळी व भाजी-आमटी बनवणे यातही एक वेगळाच आनंद होता.

आम्ही परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यात आलो होतो. त्यामुळे आता नर्मदामैयाच्या उगमस्थानाची ओढ आम्हा सर्वाना लागली होती. मध्येच पाऊस पडल्यामुळे दोन दिवस फक्त दहा कि.मी. चालून थांबलो. आता रोज जास्त चालावे लागणार होते. कारण माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी नर्मदामातेचे उगमस्थान असलेल्या अमरकंटकला पोहोचायची मनीषा होती. त्याआधी संक्रांतीला ग्वारी घाट येथे मैयामध्ये स्नान करण्यासाठी राहिलो. पुढे बिलासपूरहून ४० कि.मी. चालून अमरकंटकला मृत्युंजय आश्रमात आलो. मध्ये घनदाट जंगल होते. ‘माई का बगीचा’मध्ये उगमस्थानी पुन्हा जल चढवून प्रसाद घेऊन डिजेरी मार्गावर निघालो. पुन्हा घनदाट जंगल.

२६ जानेवारीला नर्मदा जयंती प्रत्येक घाटावर साजरी केली जाते. आम्ही खेडेगावातील लहान मुलींना मिठाई वाटत पुढे चाललो होतो. दुपारी एक वाजता रामपूरला पोहोचलो. तिथे आधी चुकामूक झालेले चितळे दाम्पत्य भेटले. मग आम्ही चौघे देवगाव येथील बुढीमाई संगमावर पोहोचलो. नर्मदामैया व तिची आई इथे एकमेकींना भेटतात, म्हणून हा बुढीमाई संगम. हे संगमाचे ठिकाण अतिशय सुंदर आहे.

रोज ३५ कि.मी. चालून १९ तारखेला पोहोचायचे असा निश्चय झाला. त्याप्रमाणे सकाळी साडेसहा वाजताच निघालो. सकाळपासून मळभ होतंच. भर दुपारी बाराच्या सुमारास संपूर्ण काळोख दाटून आला व पावसाचे थेंब पडायला लागले. २० कि.मी. चालून झाले होते. पुढे जावे तर पाऊस गाठेल का, हा प्रश्न. नाही गेलो तर उद्या ३५ कि.मी.पेक्षा जास्त चालावे लागेल. पण निश्चय दृढ असल्यामुळे पुढे चालत राहिलो. काही वेळातच संपूर्ण आभाळ मागे फिरून लख्ख ऊन पडले व नंतर संध्याकाळपर्यंत पाऊस गायब. म्हणजे इच्छा आणि ठाम निश्चय असेल तर मार्ग निघतोच, याचीही अनुभूती आली.

हरदया येथे गोंदवलेकर महाराजांचे राममंदिर आहे. तिथे दर्शन घेऊन पुढे चालत राहिलो. परिक्रमेच्या पूर्ततेची ओढ लागली होती. त्यामुळे पाय ओढले जात होते. भराभर चालत होतो.. आणि १९ फेब्रुवारीला ठरवल्याप्रमाणे आम्ही आमच्या गन्तव्य स्थानी अखेर पोहोचलो. माझ्या स्वागताला भक्तनिवासमध्ये माझे गुरुस्थानी असलेले कुलसंगे दाम्पत्य व नाना पाटील आधीच येऊन थांबले होते. दुसऱ्या दिवशी दिल्लीहून माझे पती येणार होते.

माझी परिक्रमा नर्मदामैयाच्या ओढीने आणि तिच्यावरील श्रद्धेपोटीच पूर्ण झाली हे सत्यच, पण परिक्रमामार्गात प्रत्यक्ष मदत व सेवा करणाऱ्या सगळ्यांचे ऋण मान्य करायलाच हवेत.
ऊर्मिला सुजात मोडक – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2015 1:04 am

Web Title: narmada parikrama 3
टॅग : Paryatan
Next Stories
1 सिसिली, इटली
2 माद्रिद
3 व्हँकुव्हर
Just Now!
X