24 November 2020

News Flash

सेंट थॉमस बेटावर…

आम्ही राहतो ते ठिकाण न्यूयॉर्क राज्याची राजधानी आल्बनी जवळ आहे.

अमेरिकेच्या उत्तर-पूर्व भागातील हिवाळा दीर्घकाल तसाच कडाक्याच्या थंडीचा असतो. डिसेंबरच्या सुरुवातीपासून ते मार्च अखेपर्यंत मधूनमधून बर्फाची वादळे होत असतात. आम्ही राहतो ते ठिकाण न्यूयॉर्क राज्याची राजधानी आल्बनी जवळ आहे. २०१५ च्या फेब्रुवारीत दुपारचे तापमान फक्त दोन दिवस ३२० फॅ.च्या थोडे वर गेले होते. यावरून इथल्या भागातील प्रचंड गारठय़ाची कल्पना येईल. आमच्या नातवंडांना ईस्टर नंतरच्या- एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात शाळेला सुट्टी होती. त्यामुळे एखाद्या गरम हवेच्या ठिकाणी जाण्याचा बेत केला. सेंट थॉमस बेटाची, जिथे समुद्र तसेच हॉटेलमधील पूलमध्ये मनसोक्त डुंबता येईल, म्हणून निवड केली.

कॅरिबियन समुद्रात, पोटरे रिकोच्या पूर्वेला, अनेक बेटांचे समूह आहेत. त्यातील युनायटेड स्टेट्सची व्हर्जनि आयलंड्स (Virgin Islands) प्रसिद्ध आहेत. त्यातील एकंदर चार मोठी बेटे. सेंट थॉमस, सेंट जॉन, सेंट क्रॉय व वॉटर आयलंड – आहेत. (याखेरीज ब्रिटनच्या ताब्यातील बेटे ब्रिटिश व्हर्जिन आइसलॅण्ड्स म्हणून ओळखली जातात.) ख्रिस्तोफर कोलंबसने आपल्या दुसऱ्या सफरीत (सन १४९३) मध्ये या बेटसमूहाला सध्याचे नाव दिले.

त्यानंतरच्या २०० वर्षांत अनेक युरोपीय – स्पेन, ब्रिटन, हॉलंड, फ्रान्स, व डेन्मार्क – देशांच्या ताब्यात ही बेटे आळीपाळीने होती. सन १७५४ मध्ये डेन्मार्कने वरील चार बेटांचा कब्जा घेतला. सेंट जॉनमध्ये उसाची लागवड करण्यात आली व त्यासाठी आफ्रिकेतून काळे गुलाम १८ व १९व्या शतकात आणण्यात आले. त्याशिवाय मूळ रहिवासी, करिब व आरावाक, या रेड इंडियन्सच्या जमातींनाही वेठीस लावून उसाच्या मळ्यात कामाला जुंपले. गुलामगिरीच्या पद्धतीला ३ जुल १८४८ मध्ये कायद्याने बंदी घालण्यात आली. सध्याचे रहिवासी (लोकसंख्या सुमारे सव्वा लाख) हे गुलामांचे वंशज आहेत, मात्र रेड इंडियन औषधालाही सापडणार नाहीत!

पहिल्या महायुद्धकाळात पाणबुडय़ांच्या तळासाठी जर्मनी ही बेटे काबीज करतील, अशी भीती अमेरिकनांना वाटत होती. दक्षिणेला असलेल्या पनामा कालव्याच्या सुरक्षतेचा विचार करून सन १९१७ मध्ये डेन्मार्ककडून अमेरिकेने ही बेटे विकत घेतली. तेव्हापासून ही बेटे युनायटेड स्टेट्सचा एक प्रदेश (Territory) बनली – राज्य नाही! इथले रहिवासी अमेरिकन नागरिक आहेत. त्यांना काँग्रेसमध्ये प्रतिनिधित्व नाही तसेच अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत भाग घेता येत नाही.

शाल्रेट अमालिया (Charlotte Amalie) ही बेटांची राजधानी असून तिथे मोठा विमानतळही आहे. तिथून जवळच्या कार रेंटल कंपनीकडून आम्ही सहा जण व आमचे सामान मावू शकेल अशी व्हॅन आठवडय़ासाठी भाडय़ाने घेतली. हा अमेरिकेचा प्रदेश असला तरी वाहतुकीचे नियम ब्रिटन (किंवा भारत) सारखे – डावीकडून चालवणे पण चालक बसतो उजवीकडे आणि गमतीची गोष्ट म्हणजे बहुतांशी वाहने अमेरिकेहून आयात करतात, त्यामुळे चालकाची जागा डावीकडे! विमानतळावरून आमच्या रिझॉर्ट हॉटेलमध्ये जाताना रस्त्याच्या एका बाजूला छोटे डोंगर व दुसऱ्या बाजूला समुद्र – हवाई बेटांसारखे! तसेच या बेटावरही नारळ, ताड (Palm), आंबा व केळी यासारखी झाडेही पाहायला मिळाली. गावातील बंदराच्या बाजूला दोन मोठय़ा क्रूझ शिप नांगरलेल्या दिसल्या. बंदरातील पाण्याच्या खोलीमुळे अशा प्रवासी बोटी इथे दिवसभर मुक्काम ठोकतात. बोटीमधील प्रवासी सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत बोटीबाहेर पडून सेंट थॉमस किंवा सेंट जॉनमधील बीचवर पोहायला जातात. काही लोक डाऊन टाऊनमध्ये शॉिपग करतात किंवा बेटावरील ऐतिहासिक स्थळे बघण्यासाठी फिरतात. वर्षांमध्ये वीस लाख पर्यटक बेटांना भेट देतात आणि त्यापकी बहुसंख्य हे क्रूझ शिपवरील प्रवासी असतात.

26-lp-st-thomas-island

हॉटेलच्या खोलीतून दिसणारे दृश्य अप्रतिम होते. वर फिकट निळे आकाश त्यात पांढऱ्या ढगांचे पुंजके, तर समोर निळाशार कॅरिबियन समुद्र. खोलीच्या बाहेर व्हरांडा, तिथून दहा पावले चालल्यावर पांढरीशुभ्र वाळू व त्यापलीकडे दूपर्यंत पसरलेले समुद्राचे पाणी. किनाऱ्यावरील माडाची झाडे वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलत होती तर लाटांचे मधुर संगीत चालूच होते. हे दृश्य पाहून आमचा विमान प्रवासाचा शीण कुठेच पळाला.

आमची फ्लाइट बॉस्टनपासून असल्यामुळे घरातून पहाटे निघून सेंट थॉमसच्या हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत एकंदर प्रवास बारा तासांचा झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी विश्रांती घेण्याचे ठरवून फक्त हॉटेलच्या पूलमध्ये डुंबत राहिलो – तेथील स्विम-अप बारमधील रमपंच िड्रकचा आस्वाद घेत!

सेंट थॉमसवर अनेक बीचेस आहेत परंतु त्यातील मेगन्स बे (Magens Bay) फार प्रसिद्ध आहे. तिसऱ्या दिवशी या अर्धचंद्र आकाराच्या आणि एक मल लांबीच्या सफेद वाळूच्या बीचवर गेलो. काँडे नेस्ट आणि नॅशनल जिऑग्राफिक या दोन्ही मासिकांनी याला जगातील एक अप्रतिम बीच असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. किनाऱ्यापासून समुद्रापर्यंतचा उतार सौम्य (Gentle) असल्याने लाटा आणि प्रवाह संथ आहेत. पाण्यात पोहून दमल्यावर उन्हं खात वाळूत पहुडा किंवा किनाऱ्यावरील झाडांच्या सावलीत विश्रांती घ्या! मात्र दक्षिण आणि उत्तरेच्या बाजूला खडक असल्याने स्नॉरकेिलगसाठी उत्तम जागा. आणि त्याचा फायदा घेत असलेले अनेक पर्यटक दिसले.

आमच्या हॉटेलमध्ये स्नॉरकेिलग, कायाकिंग व सेिलग यासारख्या वॉटर-स्पोर्ट्सच्या सोयी होत्या. तसेच पॅडल बोर्ड (ज्यावर बसून किंवा उभे राहून समुद्रात वल्हवणे), पाण्यावरील गोल हॅमॉक (त्यावर पहडून पाण्यावर तरंगणे), फ्लोटिंग मॅट (यावर उताणे पडून समुद्रात दोन्ही हातांचा वल्हय़ासारखा उपयोग करणे) व अ‍ॅॅक्वासायकल (ही मोठी तीनचाकी बाईक समुद्राचे पाणी कापत जाते) अशा प्रकारची काही पाण्यातील ‘खेळणी’ही (Toys) इथे होती. त्यातील सेिलगचा फायदा घेण्याचे चौथ्या दिवशी ठरवले.

एका सेल बोटीत जावई, मुलगी व नात बसले तर दुसऱ्यात मी, माझी पत्नी, नातू  आणि सेिलगचे तंत्र शिकवण्यासाठी तिथला शिक्षक (instructor) होता. सेल बोटीमध्ये बसण्यासाठी बाके नसतात. बोटीत ताडपत्री पसरलेली असते. त्यावर पाय ठेवायचे व बोटीच्या बाजूच्या दोराला धरून बसायचे. पाठीला आधार नसल्यामुळे चांगलेच अवघडत बसावे लागते. भर समुद्रात बोट गेली तेव्हा लाटांमुळे सर्व अंग भिजून गेले. लाटांवर तरंगत, वाऱ्याच्या जोरावर बोट पुढे जात असते. मात्र शीड ठरावीक कोनात राहण्यासाठी किंवा ते नियंत्रित करण्यासाठी प्रशिक्षणाची जरुरी असते. आमच्याबरोबर शिक्षक असल्याने आमच्या बोटीला परतताना त्रास झाला नाही. आमचा सेिलगचा पहिलाच अनुभव स्मरणीय ठरला.

आमच्या नातवाचा १६  वा वाढदिवस साजरा करण्यासाठी पाचव्या दिवशी जवळच्या सेंट जॉन बेटावर जाण्याचे योजले. सकाळी रेंटल कारने जवळच्या रेड हूक बंदरावर गेलो. तिथे सेंट जॉनला जाणारी कार-फेरी घेतली. यात साधारणपणे २० कार व त्यातील प्रवासी मावतात. २० मिनिटांचा प्रवास तुम्ही कारमध्ये किंवा डेकवर बसून करू शकता. सेंट जॉनमधील ट्रंक (Trunk) बे प्रख्यात आहे. इथे पांढऱ्या शुभ्र वाळूशिवाय पूर्वेकडील खडकांना लागून पाण्याखाली स्नॉरकेिलग ट्रेल आहे. मी व पत्नी वगळता बाकीचे चौघे स्नॉरकेिलग गिअर घालून तो छोटासा ट्रेल बघून आले.

समुद्राच्या तळावरील पोवळी (coral) व वनस्पतींच्या माहितीचे शिलालेख ट्रेलवरील खडकांवर कोरलेले आहेत. मात्र आतापर्यंत बऱ्याच पर्यटकांनी या ट्रेलचा उपयोग केल्याने अनेक पोवळ्यांना इजा पोहोचली आहे. हा बीचही कॉण्डे नेस्ट व नॅशनल जिओग्राफी मासिकांनी जगातील उत्तमात समाविष्ट केलेला आहे. रात्री रेड हूक गावातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करून वाढदिवस साजरा केला.

फेरी बोटीच्या परतीच्या प्रवासात सेंट जॉनमध्ये राहणाऱ्या व बोटीवर काम करणाऱ्या एका युवकाशी बोलण्याची संधी मिळाली. तो तेथील युनिव्हर्सटिीत बिझिनेस डिग्रीसाठी शिकत होता. उसापासून रम बनवण्याच्या भट्टय़ा (Distillery) हा प्रमुख उद्योग बेट समूहात आहे. त्यामुळे रम तिथे स्वस्तात मिळते. परंतु येथील तरुणाचा गांजासारखाा ड्रगाआहे. इतर मोठे उद्योगधंदे (पर्यटनाशिवाय) नसल्याने तरुणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर बेकारी आढळते. इथले जीवन संथ वाटले. (Easy Going) बहुधा गरम हवेचा परिणाम असावा. सेंट क्रॉय बेटावरील तेल रिफायनरी २०१२ मध्ये बंद झाली . त्यामुळे पेट्रोल यू.एस्.च्या मुख्य भूमीतून आणावे लागते. इथे शेती फारशी नसल्यामुळे धान्य व किराणामालाचीही आयात करणे भाग पडते. पेट्रोल व किराणामालाच्या चढय़ा (जवळजवळ तिप्पट) किमतीही पर्यटकांना जाणवतात. (उदाहरणार्थ, एक ब्रेडचा लोफ इथे आठ डॉलरला, जो आमच्या गावात अडीचला मिळतो.)

सहाव्या दिवशी सकाळी हॉटेलसमोरील समुद्रात पाण्यातील ‘खेळण्यांचा’ उपयोग करण्याचे ठरवले. गोल हॅमॉकवर पडून, ऊन खात, वरच्या निरभ्र आकाशाकडे बघत स्वस्थ पडण्याची मजा उपभोगली. तसेच तरंगणाऱ्या मॅटवर उताणे पडून दोन्ही हाताने पाण्यात वल्हवण्याचा आनंदही लुटता आला. छोटय़ा होडीतून कायाकिंगचा अनुभवही घेतला. लंचनंतर थोडी विश्रांती घेऊन डाऊनटाऊन चारलेट अमालिया आणि शहरातील ऐतिहासिक वास्तू बघण्यासाठी आम्ही बाहेर पडलो.

चारलेट अमालिया हे डॅनिशांनी, त्यांच्या एका राणीच्या सन्मानार्थ, सन १६९१ मध्ये स्थापन केले. सोळाव्या शतकात स्पेनने मेक्सिको, पेरू वगरे दक्षिण अमेरिकेतील देश पादाक्रांत करून आपल्या साम्राज्यात सामावून घेतले. नंतरच्या दोन शतकात त्यांनी त्या देशांतील लुटलेली संपत्ती (मुख्यत: सोने व चांदी) स्पेनला जलमाग्रे नेली. तो जलमार्ग कॅरिबियन बेटांजवळून जात होता. इंग्लंड, स्पेनचा शत्रू असल्याने, त्यांनी ही जहाजे लुटण्यासाठी ब्रिटिश नाविकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे या भागात चाचेगिरीची सुरुवात झाली. त्यातील अठराव्या शतकातील एक चाचा – एडवर्ड टीच ऊर्फ ब्लॅकबिअर्ड कुप्रसिद्ध होता. त्याच्या क्रूरतेच्या अनेक आख्यायिका आहेत. त्यातील एक म्हणजे शत्रूला घाबरवण्यासाठी तो आपल्या लांब दाढीमध्ये जळते कापडाचे बोळे घालत असे. त्याचा पुतळा व महाल (Castle) बंदरासमोरील डोंगरावर आहेत. तिथे जाताना वाटेत पायऱ्या चढाव्या लागतात. त्या ९९ पायऱ्या म्हणून ओळखल्या जातात. पायऱ्या जहाजावरील बॅलास्टच्या विटांनी बनवलेल्या आहेत. (बॅलास्ट म्हणजे जहाजाच्या स्थर्यासाठी खडीचा उपयोग करण्यात येतो.)

तिथल्या मेन स्ट्रीटवर जवाहिरे (हिरे, सोने यांचे व्यवहार करणारे), कपडे, डय़ूटी फ्री लिकर वगरेंची दुकाने आहेत. सकाळी आठपासून संध्याकाळी पाचवाजेपर्यंत फक्त ती उघडी असतात. त्याचे मुख्य कारण एकदा क्रूझ शिप संध्याकाळी समोरच्या बंदरातून निघाली की गिऱ्हाईकांची वानवा. तसेच संध्याकाळी डाऊनटाऊन एवढे सुरक्षित नसते. तिथले जवाहिरे (Jewellers) विक्रेते बहुसंख्येने भारतीय वंशाचे आणि त्यात बहुतांशी सिंधी आहेत. फार क्वचित एखादा गुजराती भेटेल. ते साईभक्त असून त्यांनी साईमंदिरही स्थापन केल्याची माहिती मिळाली. ते भारतातून आल्यामुळे आमच्यासारख्या देशी माणसांशी बोलताना मोकळे किंवा मित्रत्वाच्या नात्याने बोलणारे वाटले.

शेवटच्या- सातव्या दिवशी सेंट थॉमस बेटावरील कोकी (Coki) बीचला भेट दिली. इथले पाणी हिरव्या-निळ्या किंवा पिरोजा (Turquoise) रंगासाठी प्रसिद्ध आहे. तिथे जवळच कोरल वर्ल्ड आहे. इथे पाण्यात न जाता तुम्ही सागरी जीवन बघू शकतात. त्यानंतर िलडक्विस्ट बीचवरील शांत निळ्याशार पाण्यात पोहोण्याचा आनंद लुटला. तिथे भाडय़ाने मिळणाऱ्या लाऊज चेअरवर पडून थोडी विश्रांतीही घेतली. संध्याकाळी साफायर (Sapphire) बीच दुरूनच बघितला. याची खासियत म्हणजे इथे िवडसìफगची उत्तम सोय आहे. वारे समुद्रातून जमिनीकडे वाहत असल्याने बीचवर परत येण्यास त्रास पडत नाही.

सेंट थॉमसहून परतीच्या विमान प्रवासात आता पुढच्या वर्षीच्या एप्रिलच्या सुटीत नातवंडांना कुठल्या गरम हवेच्या ठिकाणी घेऊन जायचे याचा विचार सुरू झाला!
सुधीर कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2016 1:04 am

Web Title: on the st thomas island
Next Stories
1 विलोभनीय कामचाट्का
2 एल्क आयलँड नॅशनल पार्क
3 विरळ वस्तीचा देश!
Just Now!
X