24 November 2020

News Flash

पातागोनिया..

अर्जेटिना आणि चिले या दोन्ही देशांच्या दरम्यान या पर्वतरांगेचा दक्षिण भाग पसरलेला आहे.

राधिका टिपरे response.lokprabha@expressindia.com

पातागोनिया हा अतिशय आगळेवेगळे हवामान असलेला, जगातील सर्वात कमी लोकवस्ती असलेला आणि भौगोलिकदृष्टय़ा ‘ना धड वाळवंट, ना धड जंगल’ असा काहीसा वेगळा भूप्रदेश आहे..!

एक नयनरम्य भूप्रदेश असे ‘पातागोनिया’चे वर्णन पूर्णपणे योग्य आहे असे म्हणता येणार नाही खरेतर..! कारण पातागोनिया फक्त सुंदर नसून दक्षिण गोलार्धातील  रौद्रभयानक, अवाढव्य भूप्रदेशही आहे. अंटार्क्टिकाला जायचे ठरले तेव्हा उश्वाया या दक्षिण अमेरिका खंडाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गावात पोहोचायचे होते. तेथूनच आमच्या अंटार्क्टिकाच्या समुद्र प्रवासाला निघायचे होते. इतक्या दूर अर्जेटिनात जायचेच आहे तर मग तो देशही पाहून घ्यावा असे मनात आले. त्यानुसार आम्ही अर्जेटिनामध्ये १५ दिवसांच्या भटकंतीचे आयोजन केले. तसे तर पाहण्यासारखे या देशात खूप काही आहे. पण ब्युनो आयर्स आणि इग्वाझू धबधबा यानंतर, पातागोनियामधील काही भाग पाहण्याचे ठरवले होते. त्यानुसार आम्ही ब्युनो आयर्स पाहून झाल्यानंतर ‘अल् कलाफते’ या ठिकाणी विमानाने पोहोचलो. या लहानशा गावातून दक्षिण पातागोनियातील जगप्रसिद्ध ‘लॉस नॅशनल पार्क’ पाहायला जायचे होते. खरे तर हे पातागोनिया म्हणजे काय प्रकरण आहे हे तोपर्यंत ठाऊकच नव्हते. हा अतिशय आगळेवेगळे हवामान असलेला, जगातील सर्वात कमी लोकवस्ती असलेला आणि भौगोलिकदृष्टय़ा ‘ना धड वाळवंट, ना धड जंगल’ असा काहीसा वेगळा भूप्रदेश आहे..! पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील, दक्षिण अमेरिका खंडातील दक्षिण टोकाकडील बहुतांशी भूभाग व्यापून टाकणारा हा प्रदेश..!  दक्षिण अमेरिका खंडातील, अर्जेटिना देशाच्या दक्षिणेकडील या भूप्रदेशात, अ‍ॅण्डीज पर्वतमालेतून उगम पावणाऱ्या कोलोरॅडो आणि बॅरंकस या दोन नद्या पुढे अटलांटिक महासागराला मिळतात. या नद्यांच्या दक्षिणेकडील भागास अर्जेटाईन ‘पातागोनिया’ असे म्हटले जाते. चिले देशामध्ये सामावलेल्या पातागोनियाची सुरुवात रिलोनकावी नदीच्या मुखापासून होते. पातागोनिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागामध्ये अ‍ॅण्डीज पर्वतशृंखलेचा दक्षिण भाग, वाळवंट, पम्पास हा गवताळ प्रदेश, स्टेप्पे हा अर्जेटिनामधील गवताळ प्रदेश, तसेच शेवटाकडे असलेला लहान लहान बेटांचा ‘टेरा दी फ्युगो’ समूह या भागांचा समावेश आहे. चिले आणि अर्जेटिना या दोन्ही देशांचा दक्षिणेकडील भूभागाचा ‘पातागोनिया’मध्ये समावेश होतो. मात्र पातागोनियाचा ९० टक्के भूप्रदेश अर्जेटिना देशांतर्गत असून फक्त उर्वरित दहा टक्के पातागोनिया चिले देशाकडे आहे. पातागोनियाच्या काही भागास, पश्चिम बाजूला, पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे तर पूर्वेस अटलांटिक महासागराचा किनारा आहे. या प्रदेशाला पातागोनिया हे नाव मिळाले ते मेजालन नावाच्या साहसी स्पॅनिश दर्यावर्दी माणसामुळे. १५२० साली मेजालन याने दक्षिण अमेरिका खंडाच्या, दक्षिणेकडील टोकाला वळसा घालून टेरा दी फ्युगो या टोकाकडच्या बेटाची जगाला ओळख करून दिली. त्यावेळी या भागातील मूळ रहिवाशांना पाहून त्याने त्यांना पातागॉन असे नाव दिले.. पातागॉन या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ होतो राक्षस किंवा दांडगट आकाराचे..! या भागातील मूळ आदिवासी उंचीने अधिक असल्यामुळे त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना ते राक्षसासारखे वाटले, म्हणून त्यांना ‘पातागॉन’ असे संबोधले गेले. असे म्हणतात की पातागॉन हे काळातील एका प्रसिद्ध कादंबरीतील नायकाचे नाव होते. त्याचाच उपयोग मेजालनने मूळ रहिवाशांना पाहून केला होता असा निष्कर्ष काढला जातो. असो..

पातागोनियाच्या जगावेगळ्या भौगोलिक परिस्थितीला कारण आहे ‘अ‍ॅण्डीज’ ही जगातील सर्वात लांब पर्वतशृंखला. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर टोकापासून ते दक्षिण टोकापर्यंत पसरलेल्या या जगातील सर्वात लांब पर्वतशृंखलेचे या भागातील अस्तित्वच पातागोनियाच्या या विचित्र वाळवंटी भौगोलिक परिस्थितीचे कारण आहे. ‘अ‍ॅण्डीज’ किंवा अ‍ॅण्डीयन पर्वतशृंखला म्हणून ओळखली जाणारी ही खंडीय पर्वत रांग सात हजार कि. मी. लांबीची असून दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर, उत्तर टोकापासून अगदी दक्षिण टोकापर्यंत पसरलेली आहे. आशिया खंडातील हिमालय पर्वत रांगेच्या खालोखाल, जगातील दुसरी सर्वात उंच पर्वतमाला आहे. या पर्वतमालेची सर्वसाधारण रुंदी काही ठिकाणी २०० कि. मी. ते ७०० कि. मी. इतकी आहे तसेच सर्वसाधारण सरासरी उंची चार हजार मीटर म्हणजे १३ हजार फूट इतकी आहे. अ‍ॅण्डीज या पर्वतशृंखलेत अनेक लहान-मोठय़ा पर्वतरांगा सामावलेल्या असूनही संपूर्ण पर्वतशृंखला दक्षिण अमेरिका खंडातील एकूण सात देशांत पसरलेली आहे. व्हेनेझुएला, कोलंबिया, इक्व्ॉडोर, पेरू, बोलिव्हिया, चिले आणि अर्जेटिना हे ते सात देश आहेत. या पर्वतशृंखलेची लांबी इतकी जास्त आहे की हवामानाच्या दृष्टिकोनातून तिचे उष्णकटिबंधीय, कोरडे आणि ओलसर अशा तीन भागांत विभाजन केले जाते. अतिशय लांब आणि रुंद अशा या पर्वतशृंखलेदरम्यान अनेक उंच शिखरे आहेत, अनेक मोठमोठाली पठारं आहेत, ज्यामध्ये जगातील अनेक सुंदर शहरं वसलेली आहेत. ‘अल्टीप्लॅनो’ नावाचे पठार हे तिबेटच्या खालोखाल, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंचावर असलेले विस्तिर्ण पठार आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची, सर्वात उंच पर्वतमाला असलेल्या अ‍ॅण्डीजमध्ये अनेक उंच शिखरं आहेतच, मात्र ‘अंकोकागुवा’ हे सर्वोच्च शिखर असून ते अर्जेटिना देशाच्या हद्दीत येते. (२२८३८ फूट) अ‍ॅण्डीज पर्वतमालेतील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर इक्व्ॉडोर देशात आहे. चिंबोराझा (२२६१५ फूट) या नावाने प्रसिद्ध असलेले हे शिखर विषुववृत्तावर असल्यामुळे, पृथ्वीच्या मध्य िबदूपासून मोजणी केली तर जगातील सर्वात उंच शिखर आहे असे मानले जाते. अगदी एव्हरेस्टपेक्षाही जास्त उंच. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अ‍ॅण्डीयन पर्वतशृंखला ही कॅनडाच्या उत्तर भागातून सुरू होऊन अमेरिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचणाऱ्या रॉकी पर्वतशृंखलेला जोडलेली आहे. हा उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिका खंडांना जोडणाऱ्या ‘कॉर्डीलेरा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भूगर्भीय साखळीचा भाग असून, उत्तर, दक्षिण आणि मध्य अमेरिका खंड तसेच अंटार्क्टिका खंड यांना जोडणारा कणा आहे असे मानले जाते. अ‍ॅण्डीजमध्ये अनेक जागृत ज्वालामुखी आहेत. अ‍ॅण्डीज पर्वतशृंखलेचे, उत्तर, मध्य आणि दक्षिण अ‍ॅण्डीज असे भौगोलिक विभाग असून या पर्वतशृंखलेचा दक्षिण भाग अर्जेटिना आणि चिले या देशात सामावलेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही देशांत येणाऱ्या अ‍ॅण्डीज पर्वतशृंखलेच्या रांगांचे पुन्हा हवामानाच्या दृष्टीने दोन विभाग पडलेले आहेत. एक कोरडे हवामान असलेला अ‍ॅण्डीज पर्वत तर दुसरा ओलसर हवामान असलेला अ‍ॅण्डीज.

अर्जेटिना आणि चिले या दोन्ही देशांच्या दरम्यान या पर्वतरांगेचा दक्षिण भाग पसरलेला आहे. अ‍ॅण्डीजच्या पश्चिम बाजूला, चिले हे राष्ट्र असून या देशाची संपूर्ण पश्चिम बाजू पॅसिफिक महासागराला लागून आहे. तर अ‍ॅण्डीज पर्वतरांगेच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच पूर्वेला अर्जेटिना देश पसरलेला असून त्याला अटलांटिक महासागराचा किनारा लाभलेला आहे. पश्चिमेकडील भूप्रदेशात, म्हणजे चिलेच्या बाजूला भरपूर पाऊस पडतो, मात्र पूर्वेकडील भूप्रदेश रेनश्ॉडो क्षेत्रात येतो. हा रेनश्ॉडोमध्ये येणारा भूप्रदेश म्हणजेच पातागोनिया. याच प्रदेशादरम्यान येणाऱ्या अ‍ॅण्डीजच्या दक्षिणेकडील पर्वतरांगांमध्ये अनेक उंच शिखरे आहेत. या उंच उंच शिखरांदरम्यान बरेच अंतर आहे. मात्र या चार उंच शिखरांदरम्यान येणाऱ्या दऱ्याखोऱ्यात, झाडेझुडपे नसून संपूर्ण दऱ्या आणि खोरी बर्फाने भरलेली आहेत. याला कारण हा भाग दक्षिण गोलार्धातील टोकाकडे आहे व अंटाक्र्टिक खंडापासून जवळ आहे. हजारो वर्षांपासून जमा झालेले हे बर्फ ‘पातागोनियन आइस फिल्ड’ म्हणून ओळखले जाते. या भागात प्रचंड प्रमाणात बर्फ असून दऱ्याखोऱ्यातून जमा झालेल्या बर्फाच्या अनेक हिमनद्या म्हणजेच ग्लेशियर्स आहेत. या अगणित हिमनद्या विविध नावाने प्रसिद्ध आहेत. समुद्रसपाटीपासून केवळ काही मीटर उंचावर असणाऱ्या या हिमनद्या आपल्याला अगदी जवळून पाहता येतात, कारण त्यासाठी पर्वतारोहण करावयाची गरज पडत नाही. असे म्हणतात की अंटाक्र्टिका खंडातील बर्फाच्या साठय़ानंतर पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकाचा गोडय़ा पाण्याचा साठा, या आइस फिल्डच्या रूपाने अर्जेटिना आणि चिले या दोन देशांमधील पातोगोनिया या भागात साठवलेला आहे. या दोन्ही देशांदरम्यान असलेल्या अ‍ॅण्डीज पर्वतशृंखलेमध्ये अगणित लहान-मोठय़ा हिमनद्या आहेत. त्यातील काही प्रचंड आकाराच्या असून त्या पुढे पुढे सरकत राहतात. चिले देशाच्या बाजूला असणाऱ्या हिमनद्यांतून निघणारे पाण्याचे प्रवाह नद्यांच्या रूपात पॅसिफिक महासागराला मिळतात. अर्जेटिना देशाच्या बाजूला असणाऱ्या हिमनद्यांमुळे प्रचंड आकाराचे जलाशय निर्माण झालेले असून त्यातून उगम पावणाऱ्या नद्यांच्या रूपाने हे पाणी अटलांटिक समुद्राला जाऊन मिळते.

पातागोनियाच्या भटकंतीदरम्यान आपल्याला हे प्रचंड आकाराचे ग्लेशियर म्हणजेच हिमनद्या पाहण्याचा योग येतो. अर्जेटिना देशादरम्यान पसरलेल्या अ‍ॅण्डीज पर्वतशृंखलेतील काही डोंगरवाटांमधून भटकंती करण्याची संधीही मिळते. गंमत म्हणजे या सगळ्या डोंगरवाटा शेवटी कुठल्या ना कुठल्या तळ्याजवळ पोहोचतात आणि त्या तळ्याच्या पलीकडे हिमनदी असते. कारण अ‍ॅण्डीयन पर्वतशृंखलेत या भागातील दऱ्याखोऱ्यातच हे आइसफिल्ड पसरलेले आहे. चिले देशाचा व्हिसा घेतलेला असेल तर चिले देशाच्या हद्दीत राष्ट्रीय उद्यान पाहायला जाता येते. या प्रदेशातही हिमनद्या आणि उंच पर्वत शिखरे आहेत, तलाव आहेत, नद्या आणि खळखळ वाहणारे धबधबे आहेत. कारण पातागोनिया हा आगळावेगळा भूप्रदेश या दोन्ही देशादरम्यान पसरलेला आहे.

अल् कलाफतेच्या विमानतळावर उतरतानाच ‘लेक अर्जेटिनो’ या विशाल तलावाचे मनोरम दर्शन घडते. त्याचा चमचम करणारा गडद निळाभोर, मोरपिशी रंग पाहून अक्षरश: नजरेचे पारणे फिटते. या तलावाच्या काठावर अल् कलाफते हे अतिशय लहानसे गाव वसलेले आहे. पातागोनियामधे वस्ती अत्यंत विरळ आहे हे यापूर्वीच सांगितले आहे.

हॉटेल छानच होते. मात्र भयानक थंडी होती.. भणभण करणारे बोचरे वारे होते. पॅसिफिक महासागरावरून येणारे पाण्याने ओथंबलेले थंडगार वारे अ‍ॅण्डीज पर्वतशृंखलेवर चढतात, चिलेच्या बाजूला प्रचंड पाऊस पाडतात. (वर्षांकाठी जवळजवळ सात हजार मि.मी.) आणि अ‍ॅण्डीज ओलांडून हेच वारे पुढे पातागोनियाच्या सपाट भागात येतात. या वाऱ्यांमुळेच पातागोनिया येथील हवामान रखरखीत आणि कोरडे होते.

हॉटेलमध्ये संध्याकाळी काहीतरी गरमागरम खावे असे वाटत होते, पण शाकाहारी काहीही मिळणे शक्य नाही हे लक्षात आले. शेवटी उकडलेल्या शेवया म्हणजेच स्पॅगेती आणि सॅलड घेतले आणि घरून नेलेल्या लसणाच्या चटणीबरोबर खाल्ले. सकाळी मनसोक्त ब्रेकफास्ट व्हायचा. केक, टोस्ट, कुकीज, चीज, फळांचे रस, अंडी वगैरे. मात्र इतर वेळेसाठी ब्रेड आणि बटर जवळ ठेवणे हाच एकमेव पर्याय असायचा. दुसरे दिवशी अतिशय आरामदायी अशा मोठय़ा बसमधून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. ‘पेरितो मोरेनो’ हा ग्लेशियर पाहायला जायचे होते. अर्जेटिना देशातील पातागोनियामध्ये, सांताक्रूझ प्रोव्हिन्समध्ये (राज्यात) अतिशय विस्तीर्ण परिसरात ‘लॉस ग्लेशियर नॅशनल पार्क’ सामावलेले आहे. अ‍ॅण्डीज पर्वतशृंखलेच्या दऱ्याखोऱ्यांत सामावलेल्या आइस फिल्डमधून बाहेर पडणारे अनेक लहान-मोठे ग्लेशियर्स या पार्कमध्ये समाविष्ट केलेले आहेत. या उद्यानाचे ३० टक्के क्षेत्र आइस फिल्डने व्यापलेले असून उर्वरीत भागात दोन मोठे तलाव आहेत. दक्षिण दिशेला ‘लेक अर्जेटिनो’ हा अर्जेटिनामधील सर्वात मोठा तलाव आहे. दुसरा तलाव आहे उत्तरेकडील ‘लेक विद्मा’. या दोन्ही तलावातून वाहणारे पाणी पुढे एकत्रितपणे सांताक्रूझ नदीच्या रूपाने अटलांटिक महासागराला मिळते. अ‍ॅण्डीज आइस फिल्डमधून बाहेर पडणारा ‘पेरितो मोरेनो’ हा प्रचंड आकाराचा ग्लेशियर, तसेच ‘उपसाला’ ग्लेशियर आणि ‘स्पेगाझिनी’ ग्लेशियर या तीन हिमनद्यांमधील बर्फाचे वितळलेले पाणी अर्जेटिनो या विशाल तलावात पोहोचते. या तीनही हिमनद्यांची तोंडे अर्जेटिनो तलावात येऊन पोहोचतात. विद्मा ग्लेशियरचे पाणी विद्मा तलावात पोहोचते, तर असा हा पेरीतो मोरेनो ग्लेशियरला पाहायला निघालो. अल् कलाफतेपासून ७८ कि.मी. अंतरावरील पेरितो मोरेनो ग्लेशियरच्या आवारात पोहोचण्यासाठी दोन तास लागले. वाटेत सदैव अर्जेटिनो तलाव उजव्या हाताला दिसत होता. त्याचा ‘फिरोझी’ निळा रंग अक्षरश: मोहात पाडीत होता. वाटेत एका ठिकाणी काही मिनिटांसाठी थांबलो. त्या ठिकाणी एक सुंदरसा तलाव होता. थोडेफार सूचीपर्णी वृक्ष होते. कंडोर नावाचा जगातील सर्वात मोठय़ा आकाराचा पक्षी पातागोनियात आढळतो. ही गिधाडाची एक जात असून सहजासहजी दृष्टीस पडत नाही. वाटेत एका जागेवरून आपल्याला पूर्ण ग्लेशियर आणि अर्जेटिनो तलावाची सुरुवात जेथून होते ते ग्लेशियरचे स्नाऊट किंवा मुख आणि निळ्या पाण्याचा तो सुंदर जलाशय पाहायला मिळतो. काही वेळाने अर्जेटिनो तलावाजवळ पोहोचल्यानंतर मात्र निसर्गाचा चमत्कार पाहून तोंडात बोट घालण्याची वेळ आली.. पाच किलोमीटर रुंदीचा तो निळ्या रंगाचा बर्फाचा उंच कडा आणि त्याच्या पुढे पसरलेला निळ्या रंगाचा अर्जेटिनो तलाव ‘याची देही याची डोळा’ पाहणे हा अनुभव केवळ अद्वितीय होता. आयुष्यात कधीही न विसरता येणारा..! सुरुवातीला मोठय़ा आकाराच्या पांढऱ्याशुभ्र क्रूझमधून आम्हाला अर्जेटिनो तलावातील सफरीसाठी नेण्यात आले. त्यामुळे आम्हाला पेरितो मोरेनो ग्लेशियर अगदी जवळून पाहता आला. बोटीने आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे जवळ घेऊन जातात. प्रचंड थंडी होती. थंडगार वाऱ्यामुळे अक्षरश: हाडं गोठल्यासारखे वाटत होते. पण समोरच्या निळ्या रंगाचा तो प्रचंड ग्लेशियर पाहून डोळे दिपून गेले. निळ्या रंगाच्या बर्फाचे वेगवेगळे आकार पाहून किती फोटो घेऊ अशी अवस्था झाली होती. मनसोक्त हिमनदी दर्शन झाल्यानंतर बोट तलावाच्या एका किनाऱ्याला लागली. या जागी आम्ही सर्व जण खाली उतरलो. त्यानंतर आम्हाला वेळ देण्यात आला होता.

या ठिकाणी ‘वॉक वे’ बांधण्यात आलेले आहेत. त्यावरून चालत आपण या रौद्रभीषण तरीही अप्रतिम सुंदर अशा प्रचंड हिमनदीला वेगवेगळ्या बाजूंनी, वेगवेगळ्या कोनातून मनसोक्त न्याहाळू शकतो. पेरितो ग्लेशियर पाहण्यासाठी भरपूर वेळ दिला होता. बरोबर नेलेले पदार्थ खाऊन ठरल्या वेळी आम्ही बसथांब्याजवळ परतलो. दुसरे दिवशी दोन ग्लेशियर पाहायचे होते. त्यासाठी जय्यत तयारीनिशी गेलो.. कारण प्रचंड थंडी, थंडगार वारे यांच्याशी दोस्ती करावयाची होती.. अर्जेटिनो तलावाच्या दुसऱ्या बाजूने या क्रूझसाठी निघालो. खरोखर इतकी थंडी होती की विचारू नका. त्यात कॅमेरा हाताळायचा म्हणजे कठीणच होत होते. काही वेळातच तलावाच्या पाण्यामध्ये मोठमोठाले हिमनग तरंगताना दिसायला लागले. त्यांचे आकार बघून मन वेडावले. या क्रूझ सफरी दरम्यान आपण हिमनदीच्या खूप जवळ जातो. निसर्गाचे ते आगळेवेगळे वैभव डोळ्यांनी पाहायला मिळणे म्हणजे सुदैवच. खरेतर हे सारे शब्दातून मांडणे थोडे कठीणच आहे. प्रत्यक्ष अनुभव घेणे ही फार वेगळीच गोष्ट आहे. त्या दिवसभराच्या क्रूझदरम्यान आम्ही ‘उपसाला’ आणि ‘स्पेगाझिनी’ या हिमनद्या अगदी जवळून पाहिल्या. बर्फाच्या वेगवेगळ्या आकारात तयार झालेल्या त्यांच्या आकृती पाहून मन अक्षरश: संमोहित झाले होते. तरंगणाऱ्या हिमनगांचे आकारही असेच चमत्कृतीपूर्ण असायचे. हे सर्व काही इतके वेगळे होते की पाहून मनात आले, हे पाहायला मिळते आहे हे केवढं भाग्य म्हणायचे! त्या दिवशी थंडीने अगदी काकडून गेलो होतो. परत आल्यानंतर खाऊन पटकन अंथरुणात शिरलो. तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा बाहेर पडलो. चिले देशातील ‘टोरे दी पायने’ या नावाचे राष्ट्रीय उद्यान पाहायला जायचे होते. ‘टॉवर्स ऑफ पायने’ अर्थात पायने मसीफची शिखरं पाहायला जायचे होते. पातागोनिया हा भाग चिले आणि अर्जेटिना या दोन्ही देशांत समाविष्ट आहे हे खरे असले तरी चिलेमध्ये केवळ दहा टक्के आणि अर्जेटिनामध्ये ९० टक्के  अशी पातागोनियाची विभागणी झालेली आहे. पासपोर्ट आणि व्हिसा आठवणीने बरोबर ठेवले होते. त्यामुळे चिलेमध्ये प्रवेश करताना कुठलीही अडचण आली नाही. सोबत असलेला गाईडही छान होता. प्रवास जवळपास पाच ते साडेपाच तासांचा होता, पण वेळ कसा गेला ते कळाले नाही. बस खूपच आरामशीर होती. अ‍ॅण्डीज पर्वतशृंखलेचे मनोरम दर्शन प्रवासभर होत होते. सुरुवातीला ‘अमरगा’ नावाच्या तलावाकाठी थांबून फोटो वगैरे घेतले.. पायने या नावाच्या शिखरांचा समूह सतत नजरेसमोर होता.. अगदी मनाला भुलवा पाडीत होता. पुढे ‘सरमियांटो’ या नावाचा सुंदर तलाव पाहण्यासाठी थांबलो. अर्जेटिना आणि चिलेमध्ये असणाऱ्या ‘मोनॅको’ या प्राण्यांचा कळप दिसताच फोटो काढण्यासाठी सर्व जण खाली उतरलो. हे प्राणी हरणांप्रमाणे दिसतात. नंतर एका सुंदर जागी जेवणासाठी खाली उतरलो. स्फटीकजल घेऊन वाहणारी पायने नदी, निळ्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर उठून दिसणारी अ‍ॅण्डीजच्या रांगेमधील अप्रतिम सुंदरपायने शिखरांची मांदियाळी..! हे सगळे इतके सुंदर होते की, तेथून उठू नये असे वाटत होते. सर्वाना लंच बॉक्समधून जेवण दिले गेले. पण मुख्य जेवण नॉनव्हेज असल्यामुळे खाता आले नाही.. केक वगैरे खाऊन वेळ निभावून नेली. ‘पायने मसीफ’ हा शिखरांचा अतिशय सुंदर समूह त्याच्या आकारामुळे प्रसिद्ध आहे. पुढे काही अंतर गेल्यानंतर आम्हाला सर्वानाच बसमधून खाली उतरावे लागले. तेथून पुढे काही अंतर चालत गेल्यानंतर, पायने नदीवरचा अतिशय सुंदर धबधबा पाहायला मिळाला. त्यापुढे तासाभराचे चालणे होते. पायने शिखरांच्या पायथ्याजवळ जाण्यासाठीची ही पायवाट ‘नॉर्डेनस्कोल्ड’ तलावाच्या काठाने होती. हवेत प्रचंड गारठा होता. बोचरे वारे होतेच. हा लहानसा ट्रेक नॉर्डेनस्कोल्ड तलाव जेथे सुरू होतो त्या टोकापर्यंत होता. त्या जागी पायने   शिखरावरून येणाऱ्या पायने हिमनदीमधून वितळलेल्या बर्फाचे पाणी तलावात येऊन सांडत होते. नजरेसमोर पायने शिखरांचा समूह होता. त्यातील काही शिखरांवर बर्फ होते तर काही अगदी कोरडी ठक्क होती. बर्फामुळे होणारी झीज आणि त्यामुळे तयार झालेले कातळांचे वैशिष्टय़पूर्ण आकार पाहताना भोवंडून गेल्यासारखं होत होते.

अ‍ॅण्डीज पर्वतशृंखलेतील शिखरांना इतक्या जवळून पाहायला मिळत होते हे माझे केवढे भाग्य.. नॉर्डेनस्कोल तलावाचे रंग बघून मन थक्क होऊन गेलं होतं.. गाईड खूप काही समजावून सांगत होता.. खरंतर पायने नदीचा उगम त्या तलावातूनच होत होता.. अ‍ॅण्डीज पर्वतमालेतील एका नदीच्या उगमापर्यंत मी पोहोचले होते.. हिमालयात ट्रेकिंग करताना कितीतरी नद्यांच्या उगमापर्यंत जाऊन आले होते. आता हिमालयाच्या पाठच्या भावाच्या परिसरात तेच सौख्य अनुभवत होते. ‘टोरे दी पायने आणि क्युर्नो दी पायने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पायने शिखराची तीन कातळ शिखरे किंवा ‘पायने टॉवर्स’ आणि झीज झाल्यामुळे शिंगाच्या आकाराप्रमाणे दिसणारे ‘पायने हॉर्न’ पाहण्यासाठी परतीच्या वाटेवर पुन्हा एका उंच टेकाडावर आम्हाला खाली उतरवले. नजरेत आणि कॅमेऱ्यात पायनेला साठवून घेता घेता मन भरून पावले! चिले देशाच्या हद्दीतील या राष्ट्रीय उद्यानात काही सुंदर हिमनद्या आहेत. त्यामधे ‘ग्रे’ नावाचा महत्त्वाचा ग्लेशियर आहे. अर्थात तो पाहायला जाण्यासाठी वेगळ्या वाटेने पुढे जावे लागते. असो, पायने शिखरांना पाहून आम्ही पुन्हा आल्या वाटेने पाच तासांचा प्रवास करून परतलो. दुसरे दिवशी सकाळी आठ वाजता बसने आम्हाला ‘अल् चाल्टन’ या एका लहानशा पण अत्यंत सुंदर गावात पोहोचायचे होते. अल् कलाफतेपासून तीन तासांच्या अंतरावर असणारे हे गाव उत्तरेला आहे. लॉस ग्लेशियर नॅशनल पार्कच्या उत्तर भागात जाण्यासाठी ‘अल् चाल्टन’ येथे जावे लागते. विद्मा ग्लेशियरचे मुख ज्या विद्मा तलावात उतरते त्या तलावातील क्रूझ घेण्यासाठी येथूनच जावे लागते. थोडे उंचावर असणारे ‘अल् चाल्टन’ खेडं अ‍ॅण्डीज पर्वतशृंखलेतील ‘फीट्झरॉय’ या नावाच्या प्रसिद्ध शिखराच्या पायथ्याशी वसलेले आहे. त्यामुळे तीन त्रिकाळ हे भव्य शिखर अल् चाल्टन गावातून नजरेला भुलवण घालत राहते. मात्र बऱ्याच वेळा ते ढगात नाहीतर धुक्यात हरवलेलं असतं. एका लहानशा हॉटेलमध्ये आमचे आरक्षण होते. स्वच्छ, नीटनेटके, फारसे महाग नसलेले हे हॉटेल मला आवडले. हे गावच मुळी टुमदार आणि छोटंसं आहे. पण कमालीचे सुंदर! डोंगरांनी वेढलेले! हॉटेलच्या खिडकीतून फिट्झरॉय अगदी ठळक दिसत होते.. पण फोटो घेऊ घेऊ म्हणता म्हणता पटकन ढगात अदृश्य झाले ते परत नजरेला पडलेच नाही. खोलीत सामान टाकून कॅमेरा घेऊन बाहेर पडलो. माहिती केंद्रात गेलो. प्रत्यक्ष अल् चाल्टनमध्ये पाहण्यासारखे काहीच नाही. परंतु अल् चाल्टन वास्तवात पदभ्रमणासाठी येणाऱ्यांचा बेस कॅम्प असल्याप्रमाणे आहे. ‘लॉस ग्लेशियर नॅशनल पार्क’च्या उत्तरेकडील भागात पदभ्रमणासाठीच्या अनेक पायवाटा आहेत. त्यांची सुरुवात अल् चाल्टन येथूनच होते. या सर्व पदभ्रमण वाटा पातागोनियातील अ‍ॅण्डीज पर्वत रांगांमधील अनेक लहान लहान हिमनद्यांच्या मुखापर्यंत पोहोचतात आणि तेथे संपतात. पदभ्रमण करणाऱ्या वेडय़ा भटक्यांसाठी अल् चाल्टन हे गाव म्हणजे पंढरी आहे. जगभरातील भटके या जागी भटकंतीच्या अवघड आणि मळलेल्या वाटा धुंडाळण्यासाठी, जय्यत तयारीनिशी येतात. अ‍ॅण्डीयन पर्वताच्या दऱ्याखोऱ्यातून भटकंती करणं सोपं नाहीय. अर्थातच आमच्यासाठी हा पर्याय त्या क्षणी उपलब्ध नव्हता. कारण आम्ही तेथे फक्त एका दिवसासाठी राहणार होतो. त्यामुळे मिराडोर कंडोर या पहाडावर जाऊन अल् चाल्टनचे विहंगम रूप पाहून आम्ही हॉटेलवर परतलो. तो दिवस होता २४ डिसेंबरचा.. संध्याकाळी हॉटेलमध्ये ख्रिसमस इव्ह निमित्त श्ॉम्पेन, केक वगैरेची पार्टी होती. ती जमेल तशी एन्जॉय करून झोपी गेलो. दुसरे दिवशी तीन-चार कि.मी.चा एक छोटा ट्रेक करून हॉटेलवर परतलो. सहाच्या बसने अल् कलाफतेला परत जाण्यासाठी निघायचे होते. पुढे पातागोनियाच्या दक्षिण टोकावर असलेल्या ‘उश्वाया’ गावात पोहोचायचे होते. उश्वाया हे पातागोनियाचे शेवटचे गाव. जगाचे शेवटचे टोक. तिथून आम्हाला अंटाक्र्टिकाच्या प्रवासाला निघायचे होते. पण हातात एक संपूर्ण दिवस मोकळा होता. तो अख्खा दिवस ‘टेरा दी फ्युगो नॅशनल पार्क’ पाहण्यात घालवला. या उद्यानात एक लहानशी ट्रेन आहे. या ट्रेनचे नावच आहे, ‘ट्रेन टू द एण्ड ऑफ द वर्ल्ड’ अर्जेटाईन पातागोनियाचे शेवटचे टोक म्हणजे ‘टेरा दी फ्युगो’ हे बेट. या नावाचा अर्थ ‘लॅण्ड ऑफ फायर’ असा आहे. या बेटाचा काही भाग चिले देशात सामावलेला आहे, मात्र उरलेल्या बेटावरील भाग अप्रतिम निसर्गसौंदर्यानं नटलेला आहे. ‘टेरा दी फ्युगो नॅशनल पार्क’ पाहून पातागोनियाचेच नाही तर जगाचे दक्षिणेकडील शेवटचे टोक पाहिल्याच्या समाधानात आमचा पातागोनिया या आगळ्यावेगळ्या भूप्रदेशाचा प्रवास संपला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2018 1:05 am

Web Title: patagonia tourism best tourist attractions in patagonia
Next Stories
1 रमणीय यमाई
2 कलासक्त राजे लुडविग
3 फ्रेंच रिव्हीएराची भटकंती
Just Now!
X