24 November 2020

News Flash

चलो, रिओ डी जेनेरो…

ब्राझिलमधल्या रिओ डी जेनेरोला एक धावती भेट...

यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धा जिथे होऊ घातल्या आहेत, त्या ब्राझिलमधल्या रिओ डी जेनेरोला एक धावती भेट…

दक्षिण अमेरिका हा दक्षिण गोलार्धातील एक खंडच आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. एक तर पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, कॅरेबिअन महासागर अशा सागरी हद्दी इथे आहेत. शिवाय जगप्रसिद्ध अशा अ‍ॅमेझॉन नदीचे खोरे इथे आहे. त्यामुळे वर्षांवने (रेन फॉरेस्ट), अँडीज पर्वतरांगा, अ‍ॅटकामा वाळवंट अशी विविध आकर्षणे या परिसरात आहेत. वर्षां वनांमध्ये (रेन फॉरेस्ट) असलेलं ‘प्राण्यांचं’ वैविध्य आणि इथे असलेले मायन संस्कृतीचे अवशेष  यामुळे हा परिसर पर्यटकांच्या आवडीचा आहे. या भागात ब्राझील, व्हेनेझुएला, कोलंबिआ, चिली, अर्जेटिना, पेरू, उरुग्वे असे वेगवेगळे देश आहेत. १५ ते १८व्या शतकाच्या कालावधीत मसाल्याच्या पदार्थासाठी चढाओढ असताना स्पेन व पोर्तुगीज या भागात येऊन थडकले होते. त्यामुळे दक्षिण अमेरिकेत या दोन देशांच्या राजवटी होऊन गेल्या आहेत. परिणामी तेथे काही भागांत स्पॅनिश किंवा पोर्तुगीज भाषा बोलल्या जातात. त्यांचे मूळ लॅटीन भाषेत असल्याने या देशांना लॅटीन अमेरिकन देश म्हणतात.

ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश. आम्ही ब्राझीलच्या, जगातील सर्वात मोठी नदी असलेल्या अ‍ॅमेझॉनच्या इलाक्यातील पांतानालमधे, जागुआर हा, अंगावर काळे ठिपके असलेला वाघोबा पाहण्यासाठी तिथल्या अभयारण्यात गेलो होतो. हा सगळा भाग म्हणजे मैलोन् मैल पसरलेले वर्षां वन (रेन फॉरेस्ट), बराच सपाट भाग.. त्याबरोबरच इथे आहे, अटलांटिक महासागराचा सात हजार ५०० कि.मी. लांबीचा अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा. शिवाय चिली, इक्वाडोर हे देश वगळता सर्व लॅटीन अमेरिकन देशांबरोबर हद्द असलेला हा भाग किती मोठा असेल याची कल्पना आलीच असेल.

फार पूर्वी या किनाऱ्यावर लाल रंगाची झाडे होती. त्यापासून लाल रंगाचा डाय बनवला जात असे.  पोर्तुगीज सत्ता आल्यावर त्यांनी रंगीत झाडांमुळे या भागाला ब्राझील हे नाव दिले. येथील वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक रचनेमुळे इथे टेकडय़ा, पठारे, डोंगर, खुरटी झुडपे अशी विविधता आहे. तसेच काही ठिकाणी समुद्र आत आल्याने कोपा कबाना, बोटोफोगा, फ्लेमिंगो असे बीच तयार झाले आहेत. याचे स्थान दक्षिण गोलार्धात विषुववृत्ताच्या जवळ असल्याने इथे कटिबंधीय तपमान आहे. इथे उन्हाळ्यात पारा ३५ ते ४०अंश सेल्सिअसपर्यंत चढतो तर हिवाळ्यात तो पाच अंश सेल्सिअसच्या खाली उतरत नाही. यामुळे इथे वर्षभर आल्हाददायक हवा असते आणि त्यामुळे वर्षभर पर्यटकांचा ओघ असतो.

ब्राझीलला भेट द्यायची तर माझ्या मते बघितलीच पाहिजेत अशी दोन ठिकाणे म्हणजे रिओ डी जेनेरो आणि पांतानाल अभयारण्य. सर्वप्रथम रिओ येथील व्हाइट क्राइस्ट पाहायला गेलो. इथला हा ख्रिस्तो रेडेंतोरचा पुतळा लोकप्रिय आहे. येथील समुद्रात भूगर्भातील रचनेमुळे लहान-मोठय़ा टेकडय़ा, डोंगर तयार झाले आहेत. पोर्तुगीज भाषेत मानेवरील किंवा पाठीवरील कुबडाला काकरेवादो म्हणतात. अशाच एका टेकडीवर क्राइस्ट असल्याने त्याला काकरेवादो ख्रिस्तो रेडोंतोर म्हणतात. समुद्रसपाटीपासून सात हजार २१० फूट उंचीवर, आठ मी. उंचीच्या चबुतऱ्यावर ३०मी. उंच, २८मी. पसरलेल्या बाहूंची रुंदी, असलेला ६५०टन वजनाचा पुतळा आहे. हा अखंड नसून तुकडय़ांमधून रेल्वेने तिजुका फॉरेस्टच्या डोंगर माथ्यावर आणून जोडला गेला. डोंगराच्या पायथ्याशी आल्यावर लिफ्टने वर जाण्याची सोय आहे. जाताना मुळापासून लगडलेल्या फणसांची झाडे दिसतात. येथून रिओचा चौफेर नजारा न्याहाळता येतो. अटलांटिक समुद्र रिओ येथे थोडा आत आल्याने कोपा कबाना, बोतो फोगो, फ्लेमिंगोसारखे बीच तयार झाले आहेत. आपल्या चौपाटी, मरीन ड्राइव्हप्रमाणे लांबच लांब किनारे नाहीत. पण इथली स्वच्छता, पर्यटकांच्या सोयी, वॉटर स्पोर्टस, या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत.

ब्राझीलमधे प्रथम पासूनच मका, साखर, वेगवेगळ्या प्रकारचे बटाटे यांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होते.  साखरेची निर्यातही मोठय़ा प्रमाणावर होई. शंखाकृती कोन करून साखर साठवली जात असे. काकरेवादो येथून समुद्रातील ग्रॅनाइटचे एकसंध मोठाले उंच खडक नजरेस पडतात. त्यांचा आकार शंखाकृती असल्याने त्यांना शुगर लोफ माऊंटन म्हणतात. येथे जाताना लिफ्टची सोय आहे. दोन थांब्यांवर थांबून जावे लागते. २०व्या शतकाच्या सुरुवातीला लिफ्टने  फक्त २० लोकच जाऊ शकत. पण पुढे तंत्रज्ञान विकसित होऊन आता एका वेळी १०० जण जाऊ शकतात. पूर्वी वापरली जाणारी लिफ्ट तिथे आठवण म्हणून ठेवली आहे.

१८व्या शतकापासून सुरू झालेले रिओ कार्निव्हल पाहण्यासाठी जगभरातून लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. ख्रिश्चन धर्मीय लेंट हा महिनाभराचा उपवास करतात. येशूला मरणापूर्वी अन्नावाचून राहावे लागले होते, हे या उपवासामागचे कारण आहे.  त्यामुळे गुडफ्रायडेअगोदर एक महिना लेंट असतो. आता एक महिना मौजमजेशिवाय राहायचे तर आधी एन्जॉय केलेच पाहिजे. जसे आपल्याकडे श्रावणमासापूर्वी मोठय़ा प्रमाणात गटारी, कांदेनवमी साजरी केली जाते, तसेच. तर ईस्टरअगोदर आठवडाभर त्यांचा सोहळा असतो त्याला कार्निव्हल म्हणतात. या कार्निव्हलसाठी १९८२ मध्ये ऑस्कर नेमियार याने ८०० मीटर लांब, ५० मीटर रुंद स्टेडियमसारखी व्यवस्था केली आहे. तीही जागा पुरत नाही. त्यामुळे शहरात बीचेसवर, मोठय़ा मैदानांमध्ये तसंच मोठय़ा मॉल्समध्ये लोक कार्निव्हल साजरे करतात. कार्निव्हलसाठी स्त्री, पुरुष, लहान मुले वेगवेगळे पेहराव करतात. विविध संगीत वाद्यांच्या माध्यमातून कर्णकर्कश संगीत वाजवले जाते. त्या तालावर सगळेच नाचत असतात. सकाळी ११ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत कार्यक्रम सुरू असतो.

फुटबॉल हा इथला अत्यंत लोकप्रिय खेळ. १९५० सालचा हा फुटबॉल जगज्जेता देश आता ऑगस्ट २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी सज्ज होतोय. ब्राझीलच्या रूपाने दक्षिण अमेरिकन देशाला प्रथमच ऑलिम्पिक आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. पोर्तुगीज भाषा बोलणाऱ्या देशांत प्रथमच हे खेळ होणार आहेत.  खेळांच्या बऱ्याच प्रकारांच्या स्पर्धा रिओ डी जेनेरो व जवळच्या बारा तिजुका, येथे होणार आहेत. सुरुवात व समारोप हा रिओ येथील मारकाना स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियमवर दीड ते दोन लाख प्रेक्षक बसण्याची व्यवस्था आहे. १९६५ मध्ये उरुग्वेने ब्राझीलला फुटबॉलमध्ये हरवले होते. तो सल अजूनही त्यांच्या मनात आहे. आता या वेळी सुवर्ण पदक मिळवण्याची जोरदार आस आहे. त्यामुळे ब्राझिलवासी प्रत्येक पर्यटकाला ‘आमच्यासाठी प्रार्थना करा’ अशी विनंती करतात. मिळू दे बापडय़ांना यश असे म्हणू या.

बारा तिजुका हा रिओच्या जवळचा इलाका अर्धशतकापूर्वीपासूनच अत्याधुनिक सोयी, उच्चभ्रू वस्तीने नटलेला आहे. आता या ठिकाणी ऑलिम्पिक व्हिलेज थाटले गेले आहे. हे ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात मोठे व भव्य असेल असे म्हटले जाते. काही ठिकाणी अटलांटिक महासागराचा किनारा आत आल्याने लगून्स तयार झाले आहेत. इथे त्यांचे रोइंग, कनुइंगसारखे खेळ होणार आहेत.

रिओमध्ये कोपा कबाना, फ्लेमिंगो, बोतो फोगा अशा बीचवर संध्याकाळी फेरा मारलाच पाहिजे. कोपा कबाना दिवेलागणीला आपल्या क्वीन्स नेकलेसची आठवण करून देते. जोडीला तिथले आल्हाददायक वातावरण, वेगवेगळ्या प्रकारची मासळी व खाद्य पदार्थाचे ठेले यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे.
गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2016 1:12 am

Web Title: rio
Next Stories
1 एकतारीनबर्ग ते इरकुत्सक
2 वारसा जपणारं इंडोनेशिया
3 बालीपलीकडचा इंडोनेशिया
Just Now!
X