24 November 2020

News Flash

फ्रेंच रिव्हीएराची भटकंती

नीस शहराच्या बाहेर पडल्यानंतर आल्प्स्चा हा डोंगर ओलांडून गेल्यानंतर मोनॅको हा चिमुकला देश लागतो.

अच्युत बन

फ्रेंच रिव्हिएराचे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेले मोनॅका हे शहर कॅसिनो तसंच निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. मोनॅकोचा अर्थ आहे ‘माऊंट चार्ल्स्!’

सकाळी जाग आली तेव्हा मला माझ्या नांदेड येथील घरातीलच पलंगावरच आहे असा भास झाला. मग लगेच डोक्यात प्रकाश पडला ‘आपण टुरवर आहोत, आणि नीस शहरातील हॉटेल रूममध्ये झोपलो होतो.’ लगेच आळस झटकून कपडे बदलून मी आणि निमा बाहेर पडलो. सकाळचे सहादेखील वाजले नव्हते. रस्ता पार करून आम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो.

किनाऱ्यावर फारशी वर्दळ सुरू नव्हती झालेली. एक म्हातारा दाढीवाला फ्रेंचमन पाण्यात गळ टाकून निवांत बसला होता. गळाला मासे लागेपर्यंतचा अवधी ही मंडळी कशी काढतात हा मला पडलेला प्रश्न! खूप वेळ वाट बघितल्यानंतर गळाची हालचाल झाली की मासा गळाला लागला हे समजून गळ पाण्याबाहेर काढायचा! आम्ही त्याच्या जवळ पोहोचलो तेव्हा त्याच्या पोतडीत १२-१५ मासे गावलेले दिसले! आज दिवसभराची त्याच्या कुटुंबाची बेगमी झालेली होती!

आता किनाऱ्यावर पक्षीविहार सुरू झालेला होता. इतक्यात पूर्व दिशेला सूर्योदयाची चाहूल लागली. भूमध्यसागराच्या किनाऱ्यावर, आल्प्स्च्या बसक्या रांगांमागून प्रथम अरुणाने आपले प्रकाशमान मुखमंडळ दाखविले आणि त्या पाठोपाठ सूर्यबिंब आस्ते आस्ते वर क्षितिजावर झळकू लागले. परदेशात घेतलेला असाच एक अनुभव मला आठवतो. ऑस्ट्रेलियाच्या टूरवर असताना गोल्डकोस्ट शहराच्या सान्निध्यात असलेला ‘बायरन बे’ हा समुद्री टापूचा सूर्योदय आम्ही अनुभवला होता. खरे म्हणजे हा एक केपचा प्रकार होता. जगप्रसिद्ध ‘केप ऑफ गुड होप’देखील दक्षिण आफ्रिकेच्या सहलीत बघण्यात आलेला. देशोदेशीचे सूर्योदय आणि सूर्यास्त बघून माझ्या स्मृती आणि माझी दृष्टी तृप्त झालेली आहे. सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी विविध देशांत आणि विविध कोनांतून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा साक्षात्कार घडवीत असते. त्या साक्षात्काराचा साक्षीदार होणे हे मोठे भाग्यच!

आजची पहाट तसाच साक्षात्कार प्रदान करून गेली. सूर्योदयाची विविध रूपे बघत असताना आम्ही दोघेही भान विसरून गेलेलो. पहाटेचे ते दीड-दोन तास स्वर्गीय अनुभूती प्रदान करणारे आणि चिरकाल स्मृतीत घर करून राहणारे ठरले! सूर्याची किरणे त्या विशाल जलाशयावर सोनेरी आभा निर्माण करीत संपूर्ण आसमंत जागा करीत होती. बाजूचा रेखीव मरीन ड्राइव्ह अर्थात ‘प्रोमोनेड डेस अँग्लेस’ आता पूर्ण जागा होऊन धावायला लागला होता. मावळता चंद्र दिसेनासा झाला आणि आमची पावले किनाऱ्याची वाळू तुडवीत हॉटेलकडे वळली. सकाळचे सात वाजत आलेले होते. हॉटेलच्या तळमजल्यावर सकाळचा नाश्ता सुरू झालेला दिसला. आम्ही थेट नाश्त्यासाठी  रेस्टॉरंटमध्ये घुसलो. ही जागादेखील खूप कल्पकतेने विकसित केलेली दिसली. थेट समोर वाहणारा रस्ता आणि पुढे फेसाळणाऱ्या लाटांचा खेळ! निसर्ग अगदी तुमच्या जवळ!

टेबलाजवळ बघितले तर कबुतरासारखे काही पक्षी इकडून तिकडे विहार करीत होते. टेबलावर एक सूचना कम आवाहन करणारा छोटासा फलक दिसला. ‘हे पक्षी तुमच्या अन्नावर डल्ला मारतील, तेव्हा सावध असा!’ परंतु फ्रान्स देशाच्या कायद्यानुसार या पक्ष्यांना तुम्ही ‘इजा’ करू शकत नाही. पक्ष्यांना इजा करण्याचा आमचाही स्वभाव नाहीच मुळी. पाश्चिमात्य जगात व्यक्तिस्वातंत्र्यासोबतच निसर्गातील पशू-पक्षी-वनस्पतींची काळजी घेणारे कडक कायदे आहेत. निसर्गाची विस्कटलेली घडी आणि पर्यावरणाचा झालेला विनाश ठीक करण्यासाठी हे कायदे खूप महत्त्वाचे ठरताहेत!

सगळी मंडळी जमली आणि आम्ही माँटेकालरेच्या दिशेने निघालो.  माइकवरून सॅम्युअलची कॉमेंट्री सुरू झाली. ‘‘गुड मॉर्निग फ्रेंड्स! नाऊ वुई आर गोइंग टु मोनॅको, दी प्रिन्सिपलिटी स्टेट, माँटेकॉलरे अँड मेडिव्हियल कोस्टल व्हिलेज इज’ त्याने आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगून टाकली.

नीस शहराच्या बाहेर पडल्यानंतर आल्प्स्चा हा डोंगर ओलांडून गेल्यानंतर मोनॅको हा चिमुकला देश लागतो. पूर्वी मोनॅकोला जाण्यासाठी सोपा मार्ग उपलब्ध नव्हता. परंतु आता नीसहून मोनॅकोला जाण्यासाठी तीन सुंदर मार्ग बांधण्यात आलेले आहेत. डोंगरातून काढलेल्या रस्त्याला ‘कॉर्निश’ असे म्हणतात. जगातील अनेक कॉर्निशमधून हे मोनॅकोला जाणारे तीन कॉर्निश विशेष प्रसिद्ध आहेत. मला सॅम्युअलचे काही शब्द समजत नव्हते. त्या वेळी मी सॅम्युअलपुढे माझी डायरी ठेवून त्यात तो शब्द कॅपिटल लेटर्समध्ये लिहिण्यासाठी विनंती करायचो. यातून मला अनेक गोष्टींची उकल झाली. कॉर्निश या शब्दाच्या अर्थासाठी मला तोच आटापिटा करावा लागला. ‘कार्निश’मध्ये ‘रोड ऑन व लेज’ हा फ्रेंच शब्द आहे. कॉर्निश म्हणजे समुद्रकिनाऱ्यालगत जाणारा आणि बाजूच्या पर्वतकडय़ावर निर्माण करण्यात आलेला रस्ता असा आहे. अमेरिकेतील न्यू यॉर्क स्टेट रूट -९७ हा डेलावर नदीच्या काठाने निर्माण केलेला जगप्रसिद्ध ‘कॉर्निश’ आहे. आम्ही ज्या पर्वतीय रस्त्याने मोनॅको देशाला पोहोचलो, तेथे तीन कॉर्निश बांधलेले आहेत.

सर्वात वरचा पर्वतीय मार्ग म्हणजे ‘ग्रँड कॉर्निश’. हा पर्वतीय रस्ता डोंगरमाथ्यावरून जातो. मधला रस्ता म्हणजे ‘मोयनी कॉर्निश’ आणि तिसरा पायथ्याने जातो तो ‘बेसी कॉर्निश’ किंवा ‘कॉर्निशे इन्फेरिअर!’ हा खालचा कॉर्निश भूमध्यसागराशी सलगी करीत जातो. प्रत्येक मार्गाचे एक आगळेवेगळे सौंदर्य आहे. आम्ही मधल्या आणि खालच्या कॉर्निशवरून भटकंती केली. जगातील काही निसर्गाने नटलेल्या मार्गावरून प्रवास करण्याची संधी मला मिळाली. त्यांपैकी ही एक  म्हणायला हरकत नाही.

आभाळ गच्च भरून आलेलं होतं. पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता. आम्ही आमच्या फोल्िंडग छत्र्या छोटय़ा बॅगेत घेतलेल्या आहेत याची पुन्हा एकदा खात्री करून घेतली. गाइड सॅम्युअलने माइकवरून माँर्टेकालरेचा इतिहास सांगण्यास सुरुवात केली. मी अगदी पहिल्या रांगेतील सीटवर विराजमान होतो. या सीटला समोर टेबलासारखे पॅड असते. त्यावर पाण्याची बाटली ठेवण्याची सोय होती. शिवाय डायरी त्यावर ठेवून चालत्या गाडीत लिहिता यायचे. तेव्हा मी आवर्जून त्या सीटवर बसण्याचा आटापिटा करीत असे.

आमचा कोच नीसचे दोनही चौक ओलांडून मधल्या पर्वतीय कॉर्निशवर प्रवेश करता झाला. हा पर्वतीय रस्ता देवदार वृक्षांनी नटलेल्या निसर्गसुंदर आल्पस् पर्वताला छेदून जातो. उजवीकडे भूमध्यसागराचा निळा जलसाठा तर अलीकडे उंच कडय़ापर्यंत वनराजीने नटलेला आल्पस् पर्वत. हा स्वर्गीय अनुभव शब्दात वर्णन करणे जरा कठीणच! परंतु मनातून स्वत:ला भाग्यवान म्हटले आणि डोळ्यात प्राण ओतून अवतीभवतीचे सौंदर्य टिपू लागतो. मी कोचच्या डाव्या रांगेत बसलो होतो. भूमध्य सागराचा देखावा उजव्या दिशेला होता. तेव्हा मला ते नजरेने टिपणे थोडे अवघड जात होते. परंतु परतीच्या प्रवासात मला ती सागराची साथ मिळेल या आशेवर समाधान पावलो. एव्हाना आकाशात काळ्या ढगांनी मस्ती सुरू केलेली होती. पंरतु मोनॅकोची हद्द लागली तेव्हा ते आकाशात इतस्तत: परागंदा झालेले बघून हायसे वाटले.

मोनॅको :

मोनॅकोला जाणारा पहिला रस्ता अथवा कॉर्निश सन १८६४ साली बांधण्यात आल्याचे सॅम्युअलने सांगितले. म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी हा अवघड रस्ता बांधण्यात आला. मोनॅकोचा कॅसिनोदेखील याच वर्षी सुरू झालेला. परंतु मोनॅकोची आर्थिक सुधारणा जेमतेमच होती. परंतु पुढे १९३० साली मेडिअम कॉर्निश म्हणजे आम्ही प्रवास करीत होतो तो पर्वतीय रस्ता बांधण्यात आला आणि फ्रेंच रिव्हीएराला पर्यटकांनी मोठी गर्दी सुरू केली. पुढे पुढे ते ‘मास टुरिझम डेस्टिनेशन’ बनले. ग्रेस कॅबी या अमेरिकन नटीचे मोनॅकोच्या राजपुत्राशी लग्न झाले. आणि तिने सन २००५ सालापर्यंत म्हणजे जवळपास ५९ वर्षे मोनॅकोची राणी म्हणून मिरवले! या घटनेमुळेदेखील मोनॅकोचे महत्त्व वाढीस लागले.

माँटेकॉलरे हे सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे मोनॅको राज्याची प्रमुख प्रशासकीय नगरी! जगभरातील हौशी पर्यटकांना भुरळ पाडणारी ही नगरी आता आमच्या दृष्टिक्षेपात यायला लागली होती.

मोनॅकोचा शब्दश: अर्थ आहे ‘माऊंट चार्ल्स्!’ हे टुमदार शहर वसले आहे, समुद्राशी सलगी करणाऱ्या आल्पस्च्या एका पर्वतीय क्षेत्राच्या पायथ्याला! फ्रेंच रिव्हिएराचे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेले हे शहर येथील कॅसिनो आणि विविध आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे मान्यता पावले आहे. यात प्रामुख्याने फॉम्र्युला वन या कारच्या शर्यती खूप प्रसिद्ध आहेत. जगभरातील श्रीमंतांच्या उधळपट्टीचे हे शहर एक कुतूहल म्हणून आम्ही बघत होतो. आमचा कोच मोनॅकोच्या प्रभागात कधी घुसला हे समजले नाही. वळणदार चकचकीत रस्ते, अनेक भुयारी पूल पार करीत आम्ही पाìकग लॉटपर्यंत पोहोचलो. हे बसचे पार्किंगदेखील भुयारातच होते. जमिनीच्या खाली दोन मजले केवळ पार्किंगसाठी बनवले होते. मायनस वन, मायनस टू अशी त्यांची नावे! आम्ही मायनस वनला बसमधून उतरून आता आमची मोनॅकोची भटकंती सुरू झाली. मोनॅको तसे पाहू जाता एक स्वतंत्र राष्ट्रच! परंतु काही तासांत अथवा एक दिवसात हे राष्ट्र पायी फिरूनदेखील बघता येते. त्याच्या एका दिशेला फ्रान्सचे ‘बिसोवे’ नावाचे एक शहर असून त्या शहराला ‘माँटेकालरे सुपेरियर’ असे म्हणतात. मोनॅकोच्या पूर्व दिशेला केवळ आठ किलोमीटर अंतरावर इटलीच्या सीमा लागतात. जगात अशी अनेक चिटुकली राष्ट्रे आहेत. त्यांपैकी मी व्हेटिकन सिटी आणि आणि लिक्टेन्स्टाईन ही युरोपीय राष्ट्रे बघितली आहेत. खंडप्राय भारतात अनेक विशाल राज्ये आहेत. त्यासोबतच काही चिमुकले केंद्रशासित प्रवेश आहेत. चंदीगड, पाँडेचरी, दीव-दमण, अंदमान, लक्षद्वीप वगैरे. त्यातील लक्षद्वीप हे अत्यंत चिमुकले बेट एक केंद्रशासित प्रदेश आहे. परंतु तोदेखील मोनॅको या राष्ट्रापेक्षा मोठा आहे. या गोष्टी सहज आठवल्या म्हणून सांगितल्या.

मोनॅकोचे क्षेत्रफळ केवळ ०.६१ वर्ग किलोमीटर इतके असून त्याची एकूण लोकसंख्या १५२०० इतकी भरते. या चिमुकल्या शहरी भागाचे एकूण दहा वॉर्ड करण्यात आले असून त्यांतील मॉन्टेकालरे हा सर्वात मोठा आणि गजबजलेला वॉर्ड म्हणता येईल.

फॉम्र्युला-वन कार रेस

सर्वात महत्त्वाचा टापू म्हणजे जगप्रसिद्ध मोनॅको ग्रँड प्रिक्सचा ट्रॅक! वरच्या व्ह्य़ू पॉइंटवरून सॅम्युअल तो झाडीत लपलेला सुरुवातीचा ट्रॅक अंगुलिनिर्देष करीत दाखवीत होता. ‘‘सी द पार्ट ऑफ दी रोड टू द लेफ्ट साइड ऑफ ट्रीज, दिस इज द, पॉइट ऑफ स्टार्ट.’’ ‘कोणता? कोणता?’ असे करत एकमेकांना मागे ढकलत मंडळी सॅम्युअलजवळ येऊ लागली. शेवटी मला तो झाडीत लपलेला रोडचा हिस्सा दिसला! मोनॅको ग्रँड प्रिक्स ही जगप्रसिद्ध फॉम्र्युला-वन कार रेस येथील ‘सर्किट डी मोनॅको’ या वळणावर रस्त्यावर भरते. ही अद्भुत कार शर्यत १९२९ सालापासून सुरू झाली. ‘मोनॅको ग्रँड प्रिक्स’, ‘इंडियाना पोलीस ५००’ आणि ‘२४ अवर्स ऑफ ले मॅन्स्’ या तीन स्पर्धा जो जिंकतो त्याला ‘ट्रिपल क्राऊन ऑफ मोटारस्पोर्ट’ ही आंतरराष्ट्रीय पदवी मिळते. टेनिसमध्ये ‘ग्रँड स्लॅम’चा सन्मान असतो, तसंच. गत दोन-तीन वर्षांपासून आपल्या भारतातही अशी स्पर्धा एनसीआर टापूत भरते आहे. अति श्रीमंत आणि हौशी लोकांचा प्रांत आहे. फॉम्र्युला वन रेस कारच्या किमती ऐकूनच सामान्य माणसाला भोवळ येईल! हे कार रेसचे सर्किट भयानक आहे. याची एकूण लांबी सव्वा तीन कि.मी. असून एकूण रेसचे अंतर २६० कि.मी. असते. त्या तुफान वेगाने धावणाऱ्या गाडय़ा बघून मला खूप अचंबा वाटतो. खाली बसमधून आम्ही त्या ‘सर्किट डी मोनॅको’वर विहार केला. त्या रस्त्यावरील एका लांब बोगद्यातून प्रवास करताना एक वेगळीच मजा अनुभवली. बोगदा सुरू होण्याआधी एक ग्रँड हॉटेल लागते. या वैशिष्टय़पूर्ण रस्त्यावर दोन चाकांवर धावणाऱ्या कार्स कधी कधी इतक्या कलतात की कधी अपघात होईल अशी मनात भीती दाटून येते.

मोनॅको या शब्दाचा इटालियन अर्थ ‘मंक’ असा होतो. ग्रीक पुराणकथेनुसार मोनॅकोची निर्मिती हक्र्यूलीसने केली, अशी मान्यता आहे, असे सॅम्युअल सांगत होता.  मोनॅकोवर ग्रिमाल्डी नावाच्या राजघराण्याची सत्ता होती. आजही मोनॅकोचे राजपुत्र येथील प्रिन्सेस पॅलेसमध्ये निवासाला असतात. आम्ही त्या पॅलेसच्या विस्तीर्ण अंगणात पोहोचलो तेव्हा, ‘चेंज ऑफ गार्ड्स’ची कवायत चालू होती. हा राजवाडा उंच पर्वतावर असून फ्रेंच स्थापत्याचा नमुना वाटला. या पॅलेसच्या तटबंदीवरून भूमध्यसागराचे विहंगम दृश्य नजरेस पडते. दुसऱ्या बाजूला माँन्टेकालरे, ‘सर्किट डी मोनॅको’ दिसतात. माँटेकालरे कॅसिनो इतर वस्तूंच्या आड दडलेला असल्याने मला तो स्पष्टपणे दिसत नव्हता. ‘चेंज ऑफ गार्डस्’ बघण्यासाठी शेकडो पर्यटकांनी तोबा गर्दी केलेली होती. बहुधा मोनॅकोचे राजपुत्र तेव्हा त्या राजवाडय़ात वास्तव्याला असावेत. चेंज ऑफ गार्डस्चा नाटकी नमुना युरोपीय राजवाडय़ावर आजतागायत चालू आहे. लंडनच्या बकिंगहम पॅलेसपासून डेन्मार्क, स्वीडन ते मोनॅको अशा अनेक राष्ट्रांत नावाला राजेशाही चालू असून राजवाडय़ाचा डामडौल आजतागायत सांभाळला जातो. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भडक पोषाखातील बंदूकधारी गार्ड आपली डय़ुटी करताना संचलन करतात. तो देखावा एखाद्या चलचित्रात बघावा तसा भासतो. येथील राजवाडय़ावर तो देखावा बघण्यात आमचा अर्धा तास संपला. तेथून आम्ही मोनॅकोच्या सेंट चार्लस् चर्चच्या आवारात चालत चालत पोहोचलो. सोबत गाइड सॅम्युअल कॉमेंट्री देत चालत होता. चर्चमध्ये प्रवेश करण्यासाठी आमच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. चर्चचा ‘फसाद’ खूप आकर्षक होता. आमचा गाइड सॅम्युअल प्रत्येक ऐतिहासिक इमारतीचे वर्णन करताना फसाद हा शब्द सतत वापरायचा. मी त्याला त्याचा अर्थ विचारला. तो म्हणाला, ‘धिस इस अबाऊट फ्रंट ऑफ द बिल्डिंग.’ मी नेटवरून त्या शब्दाची उत्पत्ती आणि इतर माहिती बघितली असता तो शब्द फ्रेंच भाषेत इमारतीच्या बाहेरील बाजूसाठी वापरण्यात येतो हे कळले. ही बाहेरील बाजू समोरची असेल असे काही नाही. भारतीय वळणाची इंग्रजी शिकलेला इसम त्या स्पेलिंगचा उच्चार ‘फॅकेड’ असाही करू शकतो. आमचा गाइड होता फ्रेंचमन आणि तो माहिती देत होता इंग्रजीत. एक तर फ्रेंचांना इंग्रजी भाषेचे मोठे वावडे असते. इथे पोटापाण्याचा प्रश्न असल्यामुळे आणि समोर भारतीय मंडळी असल्यामुळे सॅम्युअलला फ्रेंच वळणाची का होईना इंग्रजी बोलणे भाग होते. मी त्याला पुन्हा पुन्हा एखादी माहिती विचारून भंडावून सोडत होतो. प्रसंगी तो शब्द त्याला माझ्या वहीवर कॅपिलट लेटर्समध्ये लिहिण्यास सांगत होतो. यामुळे मला पर्यटनस्थळाचा इतिहास आणि भूगोल सोयीस्करपणे उमगायला मदत झाली.

आम्ही बघत असलेल्या चर्चचा ‘फसाद’ खूप आकर्षक होता. समोर फुलांचे रेखीव वाफे जोपासले होते. परंतु आत जाण्याचे टाळून आम्ही मोनॅकोच्या इतर स्थळांच्या भटकंतीवर निघालो.

सभोवतीचा भूभाग बघताना एखादा देश एक-दोन तासांत खरोखर बघून संपवता येतो, याचे मला नवल वाटत होते. आल्प्स् पर्वताची टेकडी, तिचा पायथा आणि भूमध्यसमुद्राचा छोटासा किनारा एवढीच भूमी व्यापलेला हा इवलासा देश आपले वैशिष्टय़ टिकवून जगभराच्या पर्यटकांना भुरळ घालतो. यात येथील राज्यकर्त्यांचे कौशल्य दिसून येते. सन १८५० मध्ये येथील राज्यकर्त्यांचे जवळपास दिवाळे निघाले होते. त्या काळी अजून दोन छोटी शहरे यांच्या अखत्यारीत होती. ती त्यांच्या ताब्यातून गेली. त्यामुळे लिंबू, संत्र आणि ऑलिव्ह या फळांचे उत्पन्न कमी झाले. या फळांच्या व्यापारातून मिळणारे उत्पन्न  हाच तेव्हा एकमेव स्रोत होता. तेव्हाचे मोनॅकोचे राजे चार्ल्स तिसरा यांनी मोनॅकोमध्ये कॅसिनो बांधण्याची परवानगी दिली. सुरुवातीला हा जुगाराचा धंदा फारसा चालला नसला तरी काही वर्षांनंतर तो जोरात चालायला लागला. आज मोनॅकोमध्ये दोन विकसित बंदरे आहेत. स्मॉल पोर्ट आणि लार्ज पोर्ट अशी त्या बंदरांची नावे! आमचे दुपारचे भोजन स्मॉल पोर्टच्या सान्निध्यात असलेल्या टुमदार रेस्टॉरंटमध्ये झाले. त्याआधी आम्ही काही व्ह्य़ू पॉइंटवरून मोनॅकोचे मनोहारी अवलोकन केले. दिवाळखोरीत गेलेला देश ते जुगारातून संपन्न झालेला देश या प्रवासाचा शेवटपर्यंत अचंबा वाटत राहिला.

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2018 1:18 am

Web Title: the best of french riviera tour
Next Stories
1 टिकलीएवढा लिश्टनश्टाइन
2 फॅमिली बॉण्डिंगसाठी
3 सुशेगात..!
Just Now!
X