24 November 2020

News Flash

फॅमिली बॉण्डिंगसाठी

आजच्या धावपळीच्या आयुष्यात कुटंबासाठी वेळ मिळणं कठीण होऊन बसलं आहे.

आजच्या धावपळीच्या आयुष्यात कुटंबासाठी वेळ मिळणं कठीण होऊन बसलं आहे. अशा वेळी फॅमिली बॉण्डिंगसाठी सगळ्यांनी मिळून असं कुठे तरी जाणं हा पर्याय अनेकांना हवाहवासा वाटू शकतो.

कोणे एके काळी पर्यटन म्हटलं की लोकांच्या डोळ्यांसमोर काशीयात्रा किंवा इतर तीर्थयात्रा यायच्या. म्हणजे खासगी कामांव्यतिरिक्त घराबाहेर पडायचं ते तीर्थाटनासाठीच असा समज होता. पण नंतर नंतर ही परिस्थिती बदलत गेली. केवळ पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लोक फिरायला लागले. आता अनेक देशांचा तर पर्यटन हा प्रमुख आर्थिक स्रोत झाला आहे. आपल्या देशात तर पर्यटनासाठी खूप मोठा वाव आहे. खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. लोक त्या पाहायला बाहेर पडतातच. त्याचबरोबर पर्यटनाचे ट्रेण्डही बदलले आहेत. पूर्वी फक्त देवदर्शनाला जाणारे लोक आता निसर्ग पाहायला, ऐतिहासिक वास्तू पाहायला, ट्रेकिंगला, निसर्गाची आश्र्चय पाहायला, नवनवी गावं पाहायला घराबाहेर पडतात. तसाच आणखी एक ट्रेण्ड म्हणजे आराम करण्यासाठी पर्यटन करायचं. म्हणजे रुटीनपासून बाहेर तर जायचं, पण हे बघ, ते बघ असं करत स्वत:ला अजिबात शिणवून मात्र घ्यायचं नाही. रोजची धावपळ करावीच लागते, पण वर्षांतले काही दिवस फक्त आराम करायला घराबाहेर पडायचं. घरापेक्षाही आराम मिळेल, अद्ययावत सेवा मिळतील, आपल्या माणसांच्या बरोबर निवांतपणे चार दिवस घालवता येतील, अशा पर्यायांची निवड करायला हल्ली लोकांना आवडतं. यासाठी ते वळतात रिसॉर्ट्सकडे.

अशा प्रकारच्या रिसॉर्ट्समध्ये  क्लब मिहंद्राची रिसॉर्ट्सही आहेत. महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर हथगड इथं त्यांचं नवं रिसॉर्ट सुरू झालं आहे. नाशिकपासून अवघ्या ७५ किलोमीटरवर, तर सूरतपासून फक्त १६५ किलोमीटर असलेलं हे रिसॉर्ट गुजरातच्या तसंच महाराष्ट्रातल्या त्या परिसरातल्या पर्यटकांच्या मागणीमुळे या भागात सुरू केल्याचं मिहंद्रा हॉलिडेजचे मुख्य मार्केटिंग अधिकारी गिरीधर सीताराम सांगतात. तिथून सापुतारा हे गुजरातमधलं हिल स्टेशन सहा किलोमीटरवर आहे. काही किलोमीटरवर आहे. तीन एकर जागेत असलेल्या या रिसॉर्ट्समध्ये ७५ अद्ययावत निवासस्थानं आहेत. त्यात ड्राय किचनसह स्टुडिओ अपार्टमेंट, वन बीएचके, टू बीएचके, थ्री बीएचके असे पर्याय आहेत. वेगवेगळ्या गरजा असणाऱ्यांसाठी हे वेगवेगळे पर्याय आहेत. काही जणांना स्टुडिओ अपार्टमेंट पुरेसं असतं तर काही जणांना आई-वडील, भावंडांचं कुटुंबं, मित्रमंडळी अशा सगळ्यांना घेऊन कुठे तरी निवांत जाऊन राहायची इच्छा असते. त्यांना हॉटेलमध्ये तेवढय़ा लोकांसाठी वेगवेगळ्या रूम्स घ्याव्या लागतात. त्यापेक्षा तीन बेडरूमचं युनिट घेऊन एकत्र राहता येऊ शकतं. क्लब महिंद्राच्या इतर रिसॉर्टप्रमाणे हथगडच्या या रिसॉर्टमध्ये कुटुंबातल्या सगळ्यांसाठी काही ना काही आहे. आई-वडिलांची स्पाची अपॉइंटमेंट असेल तर मुलांना गुंतवून ठेवणाऱ्या अ‍ॅक्टिव्हिटीज आहेत.

टिपिकिल मराठमोळं जेवण, गुजराती थाळी, कॉन्टिनेन्टल, दक्षिण भारतीय असं तुम्हाला हवं असेल ते वैविध्य तुम्हाला इथल्या मल्टिकुझीन रेस्तराँमध्ये मिळू शकतं. तुम्हाला आवडणाऱ्या फळाच्या किंवा भाजीच्या स्वादाचं ऑरगॅनिक वॉटर ही इथली आणखी एक खासियत आहे. परिसरातून येणाऱ्या एकदम ताज्या भाज्या, फळं, धान्य केमिकलरहित असेल याची काळजी घेतली जाते.

सणांनुसार किंवा दिवसाच्या वैशिष्टय़ानुसार वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. म्हणजे संक्रांतीच्या काळात देशभरात हा सण ज्या वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, त्याच पद्धतीने इथेही साजरा होतो. ख्रिसमसपासून पुढे नववर्षांपर्यंतचं सेलिब्रेशन रंगतं.

तुम्ही घरापासून दूर असलात तरी घराचा अनुभव द्यायचा ही आजच्या काळातली पर्यटन संकल्पना आहे. त्यामुळे रोज तुळशीला पाणी घालायची सवय असणाऱ्यांसाठी इथे तुळशीवृंदावन आहे. रोज जिम करणाऱ्यांसाठी मिनी जीम आहे. वाचू इच्छिणाऱ्यांसाठी लायब्ररी आहे. रिसॉर्टच्या आवारात कुटुंब क्रिकेट, बॅटमिंटन असे वेगवेगळे खेळ खेळू शकतं. सायकल चालवू शकतं. कंटाळा आला तर आसपास फिरायला सप्तशृंगी, शिर्डी अशी देवस्थानं आहेत.

हे काहीही नको असेल तर अगदी जवळच असलेलं सापुतारा गुजरात राज्याने हिल स्टेशन म्हणून विकसित करायला सुरुवात केली आहे. एखाद्या पिकनिक स्पॉटवर असायला हवं ते सगळं सापुतारामध्ये आहे. तिथे बोटिंगही करता येतं आणि स्काय डायव्हिंगही करता येतं. टेबल टॉपवर जाऊन तुम्ही सन सेट अनुभवू शकताच शिवाय वेळेच्या आधी तिथे जाऊन कॅमल राईड, हॉर्स रायडिंग, बाईक रायडिंग करू शकता. टेबल टॉपवर पोहोचण्याच्या आधी वाटेत सनसेट पॉइंट ते गव्‍‌र्हनर हिल यांना जोडणारा रोपवे आहे. रोझ गार्डन, स्टेप गार्डन या बागा छोटेखानी असल्या तरी तिथली फुलं पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं तिथे आपोआपच रेंगाळतात.  सापुतारा संग्रहालयालयात डांग जिल्ह्य़ातल्या आदिवासी जमाती, त्यांची आभूषणे, हत्यारे, वाद्ये, सणासुदीला वापरले जाणारे मुखवटे पहायला मिळतात. सापुतारामधली हिरवाई, घाटरस्ते मन मोहून घेतात.

यापेक्षा वेगळं काही हवं असेल तर शहरी वातावरणात वाढलेल्या मुलांना थेट शेतात नेऊन शेत कसं असतं, तिथं पीक कसं घेतलं जातं हे दाखवायला घेऊन जाता येतं. एकदम ताज्या, रसाळ स्ट्रॉबेरी शेतातच खुडून खाता येतात. नाशिकला असलेली वायनरी जाऊन अनुभवता येऊ शकते. जवळच्या हथगडचा ट्रेक करता येऊ शकतो.

अर्थात क्लब मिहंद्राच्या रिसॉर्टमध्ये राहून हे सगळं अनुभवायचं असेल तर त्यासाठी क्लब महिंद्राचं सदस्यत्व असणं आवश्यक असतं. एकदाच पैसे भरा आणि पुढची पंचवीस वर्षे तुमची सुट्टी बुक करा, अशा प्रकारचं हे सदस्यत्व असतं. म्हणजे एक प्रकारे पुढची पंचवीस वर्ष वर्षांतून सात दिवस कुटुंबाला सुट्टी आरामात, मजेत घालवता यावी याची तजवीज आजच करून ठेवायची. हे सदस्यत्व घेतल्यावर त्यांच्या देशभरातल्या तसंच देशाबाहेर कोलॅबरेशन असलेल्या कोणत्याही रिसॉर्टमध्ये वर्षांतून सात दिवस जाऊन राहता येतं. हॉलिडे क्लब रिसॉर्ट्स या फिनलंडमध्ये असणाऱ्या युरोपातील महत्त्वाच्या कंपनीमध्ये क्लब मिहंद्राने २०१५ मध्ये मोठी गुंतवणूक केली  आहे. त्यामुळे आता क्लब महिंद्राच्या सदस्यांना फिनलंड, स्वीडन तसंच स्पेनमधल्या ३१ रिसॉर्ट्समध्ये सुट्टी घालवता येऊ शकते.

आजच्या धावपळीच्या जीवनात एकाच घरात राहूनही कुटुंबातल्या लोकांना संवाद साधायला वेळ नसतो. अशा वेळी फॅमिली बॉण्डिंगसाठी सगळ्यांनी मिळून कुठे तरी जाणं हा पर्याय हवाहवासा वाटू शकतो. तो महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर उपलब्ध झाला आहे.

(ही टूर क्लब मिहंद्राने प्रायोजित केली होती. )
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2017 1:08 am

Web Title: tour for family bonding
Next Stories
1 सुशेगात..!
2 क्रोएशिअन आयलंड्स
3 सफर म्यानमारची
Just Now!
X