24 November 2020

News Flash

एकतारीनबर्ग ते इरकुत्सक

एकतारीनबर्ग हे रशियामधील चौथ्या क्रमांकाचं मोठं शहर!

एकतारीनबर्ग ते इरकुत्सक हा प्रवास म्हणजे मानवी संस्कृती, निसर्ग यांच्या मिलाफाचा तसंच वेगवेगळ्या अनुभवांचा एक कोलाज म्हणता येईल..

एकतारीनबर्ग हे रशियामधील चौथ्या क्रमांकाचं मोठं शहर! हे युरोप आशिया भूखंडाच्या सीमेवर युरोपियन भूखंडांच्या मध्यभागी वसलेले उरल जिल्ह्यतील एक मोठे औद्योगिक आणि सांस्कृतिक शहर आहे! औद्योगिक भरभराटीमुळे त्याची ‘विंडो ऑफ एशिया’ अशी ओळख आहे. हे शहर आयसेट नदीकिनारी आहे. ऑक्टोबर ते एप्रिल इथे हिवाळा असतो, तेव्हा इथलं सर्वात कमी तापमान उणे ४५ अंश सेल्सिअस असतं. तर उन्हाळा फक्त ६५ ते ७० दिवस असतो. तेव्हाचं सर्वसाधारण तापमान १८अंश सेल्सिअस असतं.

‘कॉन्टय़ाटिन’ हा आमचा ेस्थानिक गाइड स्वागताला हजर होता. ‘गोविंदा’ नावाच्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये थंडगार, गुळमट गुळचट रशियन पद्धतीचा नाश्ता करून आम्ही युरोप-आशिया सीमेला भेट द्यायला निघालो. ‘कॉन्टय़ाटिन’,  सुदैवाने स्पष्ट, चांगले इंग्रजी बोलत होता. वाटेत ‘बुलाक स्मारक’ या युद्धस्मारकाच्या ठिकाणी (Bullock memorial) थांबलो. रशियन क्रांतीच्या काळात स्टॅलिनने १८ हजार क्रांतिकारकांची हत्या केली आणि त्यांना या ठिकाणी पुरले. सभोवतालच्या भिंतीवर सैनिकांची नावे कोरून ठेवली आहेत. त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून आम्ही पुढे निघालो. एकतारीनबर्गपासून १७ किमीवर पश्चिमेला ही युरोप व आशिया भूखंडांची सीमा आहे. हजारो वर्षांपूर्वी युरोप आणि आशिया भूखंड वेगळे होते, पण भूकंपामुळे होणाऱ्या हालचालीमुळे हे दोन्ही खंड जवळ आले ती ही सीमारेषा! इथे इंग्रजी ‘ए’ आणि ‘ई’ ही अक्षरे गुंफून एक स्मरणचिन्ह उभे केले आहे आणि सीमारेषा आखली आहे. त्या चौथऱ्यावर एक पाय युरोप व दुसरा आशियात ठेवून उभे राहता येते. स्थानिक लोक इथे विवाह समारंभ करतात आणि भेट देणाऱ्या पर्यटकांनाही सहभागी करून घेतात. झाडांना निरनिराळ्या रंगांच्या रिबिनी बांधतात, तसेच ‘श्ॉम्पेन’ची बाटली उघडून तिचे प्राशन करून ती भेट, तो क्षण साजरा करतात. आमच्या गाइडनेही दोन श्ॉम्पेनच्या बाटल्या पिशवीतून काढून आम्हा सर्वाना सुखद धक्का दिला. याच ठिकाणी  चीन-सैबेरियन मैत्रीचे प्रतीक म्हणून स्टीलचे क्रोमियमचे आवरण असलेले एक भव्य फूल आहे. या जागेपासून निरनिराळ्या देशांच्या राजधान्या किती अंतरावर आहेत ते फलक लावले आहेत. दिल्ली येथून तीन हजार ३९९ कि.मी.वर आहे. या सीमेला भेट दिल्याबद्दल आम्हा सर्वाना एक ‘स्मरण मानपत्र’ दिले.

पुढची भेट होती ‘रोमानोव्ह मोन्यास्ट्री’ला. १७ जुलै १९१६ रोजी बोल्शेविक सैनिकांनी झार निकोलस दुसरा आणि त्याची पत्नी तसेच पाच मुलांची इपाटिव्ह हाऊस येथे हत्या केली आणि त्यांचे मृतदेह ‘गनिया यामा’ या नऊ फूट खोल खड्डय़ात जाळून टाकले. ही जागा एकतारीनबर्गपासून १५ किमीवर आहे. या ठिकाणी नंतर त्यांच्या स्मरणार्थ सात चर्चेस बांधली, पण ती आगीत भस्मसात झाली. २०१० साली यांची पुनर्बाधणी केली. ही सर्व चर्चेस लाकडांची बांधली आहेत. तसे पाच मुलांचे पुतळेही इथे आहेत. आजूबाजूच्या दाट झाडीमध्ये ही सात हिरव्या रंगाची चर्चेस उठून दिसतात. इथे आमचा मुक्काम एका सुंदर, आरामशीर अशा ‘पार्क इन बाय रॅडीसन’मध्ये होता. संध्याकाळी सात वाजता जेवणासाठी ‘कोरियन’ रेस्टॉरंटमध्ये जायचे होते. दुपारच्या ‘गोविंदा’पेक्षा ‘कोरियन’ जेवण चांगले होते.

आज २० जुलै २०१५. आज दुपारी बारा वाजता आमचा सर्वात लांबचा एकतारीनबर्ग ते इरकुस्तक हा तीन हजार ४६५ किमी, ५२ तासांचा रेल्वे प्रवास सुरू होणार होता. त्यामुळे बाकी तयारी, नाश्ता करून उरलेले एकतारीनबर्गचे स्थलदर्शन करायला बाहेर पडलो. आज ‘मरिया’ नावाची एक गोड, नाजूक, हसतमुख नार गाइड होती!  ती फारच सुंदर, स्वच्छ इंग्रजी बोलत होती. प्रथम आम्ही ‘सिटी स्क्वेअर’मध्ये आलो. ‘आयसेट’ नदीवर बांधलेल्या धरणातून कालवा काढला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला बाग केली आहे. एका बाजूला एकतारीनबर्ग हे औद्योगिक शहर म्हणून पूर्वीपासूनच प्रसिद्ध होतं याची एक झलक म्हणून मोठमोठी जुनी यंत्रं मांडून ठेवली आहेत. दुसऱ्या बाजूला बाजूच्या ‘उरल’ डोंगरात सापडणारे खनिजाचे अवाढव्य दगड मांडून ठेवले आहेत. धरणाच्या भिंतीवर एक सुंदर शिल्प आहे. त्यात त्या वेळचे कामगार अवजारासह दाखवले आहेत. एका ठिकाणी या शहराचा उदय, जडणघडण, औद्योगिक, सांस्कृतिक प्रगती, इ.ची माहिती असलेली एक कुपी (कॅप्सूल) जमिनीत पुरून ठेवली आहे. आणि तिचे मोठे लोखंडी झाकण २०२३ साली उघडणार असे कोरले आहे. कालवा ओलांडण्यासाठी बांधलेला पूल ‘प्रेमाच्या कुलुपांनी’ लगडलेला होता. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या कठडय़ांना प्रेमी युगुले आपले प्रेम चिरंतन राहावे म्हणून कुलूपबंद करून किल्ली कालव्यात टाकतात. समजा एखादे जोडपे विभक्त झाले तर कोळ्यांकडून किल्ली शोधतात आणि कुलूप उघडतात. नंतर आम्ही ‘कॅथ्रेडल ऑन ब्लड’ नावाच्या चर्चला भेट दिली. पूर्वी इथे एक इपटीव्ह हाऊस नावाचे घर होते आणि रक्तपात झाला म्हणून त्यांच्या स्मरणार्थ या घरच्या जागी हे ‘कॅथ्रेडल ऑन ब्लड’ बांधण्यात आले. चर्चच्या बाहेर निकोलस, त्याची पत्नी आणि पाच मुलांचा एक मोठा फोटो लावला आहे.  सात घुमटांचे हे चर्च उंचावर बांधल्याने उठून दिसते. पुढे लेनिन स्क्वेअरमध्ये लेनिनच्या पायथ्याशी फोटो सेशन, राष्ट्राध्यक्षांच्या निवासाची भव्य इमारत, एका खासगी ‘उरल’ खनिजांच्या दगडाच्या प्रदर्शनाला भेट देऊन, जेवण करून ५२ तासांच्या प्रवासासाठी स्टेशन गाठले.  १२.१० ला सुटलेली गाडी २२ जुलैच्या रात्री १०.२० ला ती इरकुत्सकला पोहोचणार होती. सलग ५२ तास हा एक वेळेचा लांबच लांब प्रवास होता. हा प्रवास गप्पा मारणे, खाणे पिणे, वाचणे, फोटो काढणे आणि झोपणे यात कसा संपला ते कळलेच नाही. वाटेत काही स्टेशनवर गाडी ३०-४० मिनिटे थांबे, तेव्हा खाली उतरून प्लॅटफॉर्मवर चकरा मारणे, छोटय़ा दुकानांचे, आइसक्रीम विकणाऱ्या गाडय़ांचे, स्थानिक लोकांचे फोटो काढणे यांत छान वेळ गेला.

इरकुत्सकला पोचलो. पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे आम्ही लगेच बसने ७५ किमीवर असलेल्या ‘लिस्टव्यांका’ला बसने जाणार होतो. पण सुनीलने ते बदलून ‘अंगारा’ हॉटेलमध्ये मुक्काम ठेवला. हॉटेलमध्ये गेल्यावर सामान खोलीत टाकून लगेच जेवायला गेलो. तीन दिवसानंतर स्नान करायला मिळाले. सकाळी लवकर नाश्ता करून ७० किमीवर असलेल्या लिस्टव्यांकाला जायचे होते. लिस्टव्यांकाला एक रात्र बैकाल सरोवराच्या काठी काढायची होती. एक दिवसाचे कपडे सोबत घेऊन मोठी बॅग हॉटेलच्या क्लॉकरूममध्ये ठेवायची होती. लिस्टव्यांका हे सैबेरियाच्या प्रसिद्ध बैकाल सरोवराच्या काठावर वसलेले एक १८०० ते २५०० लोकवस्तीचे गाव. येथे पर्यटकांची राहण्याची, खानपानाची सोय आहे. लाकूड मुबलक प्रमाणांत उपलब्ध असल्याने बहुतेक सर्व इमारती लाकडांच्या आहेत. आमचे ‘ओझोरा’ हे एकमजली हॉटेल संपूर्ण लाकडाचे होते. इरकुत्सक ते लिस्टव्यांका हा सरळसोट रस्ता ‘अंगारा’ नदीच्या किनाऱ्याने जात होता. मध्येच पाईन वृक्षांचे घनदाट जंगल लागे. त्याला ‘तैगा’ म्हणतात. ‘सफेद’ आणि ‘तपकिरी’ या दोन रंगांच्या उंचच्या उंच आणि घनदाट झाडांचे जंगल आहे. काही भागात सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ शकत नाही. बैकाल सरोवर हे ‘सैबेरियाचा मोती’ म्हणून ओळखले जाते. अंदाजे तीन कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या सरोवराचा शोध १६४३ मध्ये लागला. जगातील गोड पाण्याचे हे सर्वात खोल सरोवर ६३६ किमी लांब व ७९ कि.मी. रुंद आहे. त्याची खोली २ हजार ४४२ फूट ते दीड मैल आहे. याचे पाणी अतिशय चवदार व नितळ पारदर्शक आहे. जानेवारी ते मे या काळात संपूर्ण गोठते. अत्यंत पारदर्शक अशा बर्फातून तळ दिसतो. त्या वेळी या बर्फावर लोक चालतात, खेळतात, गाडय़ा फिरवू शकतात. या सरोवराचे पाणी ४०० मीटर खोलीवरून उपसून पिण्याकरिता वापरले जाते. सरोवराभोवती रेल्वेमार्ग बांधण्याआधी हिवाळय़ात तात्पुरता रेल्वेमार्ग टाकून त्यावरून गाडी जात असे. पण एकदा बर्फाच्या जाडीचा अंदाज न आल्याने गाडी सरोवरांत बुडाली. सरोवरांतील बर्फ वितळल्यावर इंजिन आणि डबे वर काढून पुनर्वापरात आणले. एरवी हे सरोवर ओलांडण्यासाठी एस. एस. बैकाल आणि एस. एस. अंगारा अशा वाफेवर चालणाऱ्या बोटी वापरल्या जात. त्यात एका वेळी एक इंजिन आणि २४ डबे नेले जात. एस. एस. बैकाल कालांतराने आगीत भस्मसात झाली. एस. एस. अंगारा आता राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करून कझान येथे ठेवली आहे. त्यात शासकीय कार्यालये व संग्रहालय आहे. या बोटी इंग्लंडमधून सुटे सुटे भाग करून आणल्या आणि त्यांची पुनर्बाधणी लिस्टव्यांकाच्या गोदीत केली आणि त्यांची वाफेची इंजिने सेंट पिर्ट्सबर्गहून आणली होती. या सरोवराच्या चहूबाजूला डोंगर आहेत आणि याचा मूळ स्रोत मंगोलियात उगम पावलेल्या ‘सेलागा’ नावाच्या नदीत आहे. तसेच बाजूच्या डोंगरातून ३३० लहान-मोठय़ा नद्यांमधून पाणी येते. समुद्रसपाटीपासून ५०० मी. उंचीवरील हा सर्वात मोठा पाण्याचा साठा आहे. या सरोवरातील ‘अमूर’ नावाचा मासा प्रसिद्ध आहे. तसेच येथे गोडय़ा पाण्यातील ‘सील’ मासेही आहेत. तसेच एक ‘गोलोम्यांका’ नावाचा (golomyauka) मासा आढळून येतो. विशेष म्हणजे या माशाची मादी अंडी घालण्याऐवजी एका वेळी हजारभर पिल्लांना जन्म देते. डासांच्या अळ्यांसारखी ही पिल्ले एका बाटलीत भरून ठेवलेली इथल्या संग्रहालयात पाहिली. या केळय़ाच्या आकाराच्या सरोवरातून ‘अंगारा’ नदी उगम पावते, ती इरकुत्सककडे जाते. गंमत म्हणजे बैकाल सरोवर संपूर्णपणे गोठते, पण ‘अंगारा’ गोठत नाही!!

लिस्टव्याकांला आल्या आल्या सरोवरांचा भव्य नजारा समोर दिसत होता. प्रथम बैकाल संग्रहालयात गेलो. इथे या सरोवरासंबंधी सर्व माहिती चित्र स्वरूपात होती. विशेष म्हणजे सरोवर संपूर्ण गोठल्यावर कसे दिसेल याची प्रतिकृती करून ठेवली होती. सरोवरांमधील जलचरांचे छोटेसे मत्स्यालय होते. जंगली जनावरांच्या पेंढा भरलेल्या प्रतिकृतीही होत्या. एस. एस. बैकाल अणि अंगारा या बोटींच्या प्रतिकृती ठेवल्या होत्या. आम्हा २५ भारतीयांच्या तुलनेत जपानी प्रवासी मोठय़ा संख्येने होते. बाहेर एक छोटी पाणबुडीही ठेवली होती. तिथून आम्ही चालतच एका ४०० मीटर उंचीच्या टेकडीच्या पायथ्याशी आलो. काही उत्साही मंडळी टेकडीवर चढून जात-येत होती. या टेकडीच्या शिखरावरून संपूर्ण सरोवराचे भव्य दृश्य दिसते. या टेकडीवर जाण्यासाठी ‘रोप वे’ होता. टेकडी हिरव्या गार वनराईने भरली होती आणि दुसऱ्या बाजूला सूचिपर्णी वृक्षांचे दाट जंगल होते. खाली हिरव्यागार गालिच्यावर अनेक रंगांची फुले फुलली होती. खूपच प्रसन्न वातावरण होतं. हळूहळू ढगाळ हवाही कमी होत होती. टेकडीवर पोहोचल्यावर शिखरापर्यंत चालत जाण्याचा मार्ग साधारण एक किमीचा होता आणि असंख्य रंगांच्या फुलांचे ताटवे बाजूला फुलले होते आणि तितकीच निरनिराळय़ा रंगांची फुलपाखरे त्यांच्यावर बागडत होती. टेकडीच्या शिखराकडे जाणारा रस्ता आधी सरळ आणि नंतर दगडांच्या पायऱ्यांचा होता. टोकावर एक झोपडीवजा मचाण बांधले होते, जेथून संपूर्ण सरोवराचा नयनरम्य परिसर दिसत होता. पुढे काही उंच दगडही होते. पण एका वेळी एकच व्यक्ती तिथे उभे राहून हे नजरबंदी करणारं दृश्य पाहू शकत होती. एका बाजूला पाण्याचा अथांग सागर तर दुसऱ्या बाजूला डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव आणि वळसे घेत जाणारी ‘सरकम बैकाल रेल्वे’ आणि सरोवरांतून उगम पावणाऱ्या ‘अंगारा’ नदीचे पात्र! हवा थोडी स्वच्छ झाल्याने पाण्याचा रंग निळसर दिसू लागला होता. कितीही फोटो काढले तरी समाधानच होत नव्हतं इतकी ही जागा सुंदर होती. एक तास कसा गेला कळलेच नाही. खरं म्हणजे भूक लागली होती, पण पाय निघत नव्हता. अनेकांचे फोटो सेशन चालू होते. रोप वे ने खाली येऊन जेवायला गेलो. संपूर्ण लाकडी रेस्टॉरंटमध्ये स्थानिक जेवणाची सोय होती. जेवण संपवून आम्ही आमच्या हॉटेलवर आलो. तेही संपूर्ण लाकडी हॉटेल! आमची खोली पहिल्या मजल्यावर आणि बाहेर गॅलरीत बसण्याची सोय! समोर अथांग पसरलेले सरोवर! भर पावसातही त्याचे सौंदर्य आगळेवेगळे दिसत होते! नजर ठरत नव्हती, पण विश्रांतीची आवश्यकता होती.

आमची येथील गाईडही मरियासारखीच गोड, हुशार आणि स्वच्छ इंग्रजी बोलणारी होती. तिचं नाव ‘एलीजा’. तिने सांगितलेली माहिती सहज समजत असे. साडेचार वाजता बोटीने फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. चालतच बोट उभी होती तिथे गेलो. आमच्यासाठी दोन मोटारबोटी होत्या, आम्ही विभागून दोन्ही बोटीवर चढलो. वर डेकवर एका टोकाला बसायची आच्छादन घातलेली जागा होती. बाकी डेक मोकळं होतं! अजूनही आकाश ढगाळ होतं त्यामुळे सरोवराचा रंग काळसर राखाडी होता. गुगलवर वाचले होते त्याप्रमाणे निळ्या रंगाच्या निरनिराळ्या छटा बघायला मिळणार नव्हत्या. अधूनमधून सूर्यदर्शन झालेच तर पाण्यावर कवडसे छान दिसत होते. जसे पाण्यावर आलो तसा वारा खूप सुटला आणि वातावरण गारेगार झाले. आमच्यातले मुंबईकर बोटीत मिळालेली ब्लँकेटस् पांघरून बसले होते. बाजूच्या डोंगराच्या पायथ्याशी काही उत्साही मंडळी तंबू ठोकून निसर्गाचा आस्वाद घेत होती. दूर लांबवर लिस्टव्यांकाचा किनारा दिसत होता. तासाभरात जमतील तसे आणि तेवढे फोटो काढले आणि किनाऱ्यावर परत आलो. अनेकांनी तर पाण्यात पाय बुडवून पाणी खरंच किती थंडगार आहे याचा अनुभव घेतला. पाणी ८ ते १० अंश सेल्सियस थंड होते! हॉटेलवर आलो. अधूनमधून पाऊस येत होता. हवा चांगलीच गार झाली होती. गॅलरीत बसून समोर सरोवराचा नजारा पाहण्यात मजा आली. रात्री जवळच एका हॉटेलमध्ये जेवण होतं. पाऊस पडत असल्याने जवळ असूनही बसने जेवायला गेलो आणि आलो!

दि. २४ जुलै २०१५

सकाळी नाश्ता करून लिस्टव्यांकाचा ‘मासळी बाजार’, ‘मीना बाजार’ अशी चालत चालत सैर होती. आम्हा भारतीयांचा एवढा मोठा समूह पाहून बरेच पर्यटक आमच्याबरोबर फोटो काढून घेत होते. मासळी बाजारात येथील प्रसिद्ध ‘अमूर’ माशासह अनेक जातीचे मासे होते. ज्यांना ‘माशां’मध्ये रस नव्हता त्यांनी ‘मीना बाजार’कडे मोर्चा वळवला. दुकानं अजून उघडत होती. इथल्या उरल पर्वतामध्ये मिळणाऱ्या ‘सेमिप्रेशियस स्टोन’पासून बनवलेले दागिने हारीने मांडले होते. शिवाय अनेक प्रकारच्या भेटवस्तू, स्मरणवस्तू खचाखच भरल्या होत्या. तिथे थोडीफार खरेदी झाली आणि आम्ही बैकाल सरोवराचा निरोप घेऊन निघालो. थोडं फार आकाश मोकळं झालं होतं, तिथून सूर्यकिरणे पाण्यावर येत होती, तेवढय़ा भागात पाणी निळे दिसत होतं. राखाडी आणि निळ्या अशा दोन छटा दिसत होत्या. इरकुत्सकच्या वाटेवर ‘टॅलट्सी’ नावाच्या छोटय़ा गावात थांबलो. इथे १६-१९ व्या शतकातील ‘बुरियत’ आणि ‘इव्हेंक’ जमातीची जीवनशैली दाखवणारी लाकडांची घरे आहेत. निरनिराळ्या खेडय़ांतून जुने लाकडी फर्निचर, शेतीची अवजारे, भांडीकुंडी आणून ठेवली आहेत. याला ‘म्युझियम ऑफ वुडन आर्किटेक्चर’ म्हणतात. एखादे खेडेगाव वसवावे अशी मांडणी आहे. किल्ला, चर्च, शाळा अशा निरनिराळ्या इमारती आहेत. त्याचप्रमाणे काचेचा शोध लागण्यापूर्वी खिडक्यांच्या तावदानाला अभ्रकाचे तुकडे लावत असत ते आवर्जून दाखवतात. शाळा आणि शिक्षिकेचे घर, तिच्या वापरातील वस्तू, कपडे जतन करून ठेवले आहेत. काचेचा शोध लागल्यावर काचेच्या कलात्मक वस्तू बनवायला सुरुवात केली. अशा काचेच्या सुंदर, सुबक कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन एका झोपडीत आहे ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याकाळी एकत्र कुटुंबपद्धती होती. एक असेच घर आम्ही बघितले. बाहेर शेतीची अवजारे, बर्फावर घसरत जाणारी गाडी (स्लेज), तसेच लाकडाचे निरनिराळ्या प्रकारचे सांधे होते. त्यांचा उपयोग घरबांधणीसाठी केला जाई. या घरात एक मोठे स्वयंपाक घर, एक मोठी भट्टी, एक हातमाग, जुनी भांडी, मागावर विणलेले कापड अशा गोष्टी ठेवलेल्या होत्या. थंडीपासून बचाव करण्यासाठी एकावर एक बंकबेडप्रमाणे बिछाने होते आणि उबेसाठी जाड पडदे. या पुनर्रचित खेडय़ांच्या आजूबाजूला दाट जंगल आहे. तिथून आम्ही बाहेर पडून अंगारा नदीच्या किनाऱ्याच्या कडेने ‘इरकुत्सक’ शहरात आलो. हे शहर ‘पॅरिस ऑफ सैबेरिया’ म्हणून ओळखले जाते. सैबेरियातील एक अत्यंत मोठे औद्योगिक केंद्र. ‘सुखोई’ विमानाचे उत्पादन येथे होते. १६५२ मध्ये ‘पारवोबॉन्ह’ने हे शहर स्थापन केले. सध्याची लोकसंख्या ५.७७ लाख आहे. तैगा प्रदेशातील ‘येनीसेची’ हा अंगारा नदीची उपनदी तसेच इरकुट नदीच्या काठावर बसले आहे. इरकुट नदीच्या नावावरून ‘इरकुत्सक’ नाव पडले आहे. बैकाल सरोवरापासून ते ४२ किमी अंतरावर आहे.

इरकुत्सकमध्ये आल्यावर प्रथम शहराच्या जुन्या भागात गेलो. इथे १८ व्या शतकातील जुन्या लाकडी इमारती जपून जतन करून ठेवल्या आहेत. लाकडांचा भरपूर वापर आणि दाराच्या चौकटी, खिडक्यांना लाकडी कोरीव महिरपी लावल्या आहेत. घरांचे रंगही निरनिराळे आहेत. येथील बस स्टॉप म्हणजे एका दुकानाचा बाहेर वाढीव भाग होता. हे दुकान एक छोटेखानी ‘प्रोव्हिजन स्टोअर’ होते. जाता-येता छोटी खरेदी करण्यासाठी अगदी योग्य! जेवणानंतर चालत चालत हिंडलो. वाटेत दोन चर्चेस बाहेरून पाहिले. नंतर ‘इरकुट’ नदीच्या काठाने हिंडलो. नदीला उत्तम प्रशस्त घाट बांधला आहे. मुख्य रस्त्यावरून उतरून खाली घाटावर आलो स्वच्छ मोठा घाट! घाटांवर नवविवाहितांचे फोटोशूट चालू होते. हा प्रकार कझान क्रेमलिनच्या हिरवळीवरसुद्धा पाहिला होता. इथेही एक ‘प्रेमपूल’ (छ५ी ु१्रॠिी) होता, अन् त्यालाही असंख्य कुलुपे लगडलेली होती. पूल उतरून खाली आलो तर समोर फुलांचा मोठा गालिचा होता. त्याच्यापुढे एक सैनिकांचे स्मारक होते. त्यात सतत एक ज्योत तेवत असते, या स्मारकाभोवतीही सुंदर फुलांचा बगिचा होता. तसेच काही शासकीय इमारतीही होत्या. बरीच तंगडतोड सकाळपासून झाली होती. त्यामुळे सरळ हॉटेल अंगाराकडे मोर्चा. लिस्टव्यांकाला जाताना मोठी बॅग हॉटेलच्या क्लोकरूममध्ये ठेवली होती. ती घेऊन खोलीवर आलो.

दि. २५ जुलै २०१५

सकाळी नाश्ता करून लवकर इरकुत्सक स्टेशन गाठले. आज नऊच्या गाडीने ‘उलान उडे’कडे जायचे होते. ट्रान्स सैबेरियन रेल्वेवरील अत्यंत सुंदर, रम्य प्रवास ‘सरकम बैकाल रेल्वे’ बैकाल सरोवराच्या काठाकाठाने डोंगरातून जाणारा होता. बैकाल सरोवराच्या जवळ टेकडीवरून घेतलेल्या फोटोमध्ये थोडा रेल्वेचा भाग दिसला होता, पण त्याचे संपूर्ण निसर्गरम्य प्रदर्शन पुढे दिसणार होतं, सरोवराच्या पाण्याचे निरनिराळे रंग, मोठा विस्तार डोळ्यांत आणि कॅमेरात बंद करून ठेवत होतो. वाटेत छोटी गावे, रस्त्याच्या कडेला छोटे तंबू ठोकून ‘पिकनिक’ करणाऱ्या व्यक्ती दिसत होत्या. तसेच या सरोवराला येऊन मिळणाऱ्या असंख्य नद्या आणि त्यांच्यावरचे पूल बघत वेळ कसा गेला कळले नाही. घाटांतून वळणे घेत डोंगर चढणाऱ्या गाडीचे फोटो काढण्यात गाडीत बसण्यापेक्षा उभे राहाण्यातच वेळ जास्त गेला. असा हा सुंदर रम्य प्रवास. मॉस्को वेळेप्रमाणे संध्याकाळचे साडेसात वाजता दहा तासांनी संपून ‘उलान उडे’ला पोहोचलो होतो. पण स्थानिक वेळेप्रमाणे रात्रीचे साडेनऊ वाजले होते. इरकुत्सक ते ‘उलान उडे’ हा मार्ग ४५८ किमीचा होता!
(क्रमश:)
डॉ. रमेश करकरे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2016 1:03 am

Web Title: yekaterinburg to irkutsk
Next Stories
1 वारसा जपणारं इंडोनेशिया
2 बालीपलीकडचा इंडोनेशिया
3 कोणार्कचे सूर्य मंदिर
Just Now!
X