
बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून आमिर खान हा चित्रपटांसह त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

आमिर खानने १९८७ मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं आणि २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

त्यानंतर आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. मात्र काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला. लग्नाच्या १५ वर्षानंतर ते दोघेही वेगळे झाले.

रिनापासून विभक्त झाल्यानंतर आमिर खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, “सलमान खानने त्याला यातून बाहेर येण्यास मदत केली होती.”

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय शोमध्ये आमिर खानने हजेरी लावली होती. यावेळी आमिर खान म्हणाला, ‘एकेकाळी मी सलमानपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करायचो.’

“मात्र त्यानंतर माझा रिनासोबत घटस्फोट झाला आणि माझ्या आयुष्यात सलमानची एंट्री झाली. त्याने मला यातून बाहेर पडण्यास मदत केली”, असे आमिर खानने म्हटले.

“अंदाज अपना अपना या चित्रपटात मी सलमान खानसोबत काम केले होते. मात्र त्यावेळी त्याच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव खूपच वाईट होता. मला तो अजिबात आवडायचा नाही”, असेही तो म्हणाला.

“तो मला प्रचंड रागीट आणि उद्धट वाटायचा. कामाचा अनुभव लक्षात घेऊन मला सलमानपासून अंतर ठेवायचे होते”, असे आमिर खान म्हणाला.


“माझा माझ्या पत्नीशी घटस्फोट झाला होता. त्यानंतर सलमानने माझ्याशी भेटण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मी त्याला भेटलो. यानंतर आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि ती वाढतच गेली”, असे आमिर खानने म्हटले.

दरम्यान आमिर खाननं पहिली पत्नी रिना दत्तापासून २००२ साली घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ३ वर्षांनी २००५ साली त्यानं किरण रावशी लग्न केलं.

आमिर आणि किरण यांची पहिली भेट ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. २०११ साली या दोघांचा मुलगा आझादचा जन्म झाला.

किरण राव आणि आमिर यांनी सरोगसीच्या मदतीने बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये या दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.