
धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास सांगणारा ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट १३ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
या चित्रपटाचा खास शो काल (१५ मे) रोजी नरिमन पॉईंट येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्स मध्ये पार पडला.
या शोकरिता शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी चित्रपट पाहिल्यावर चित्रपटाचे मनापासून कौतुक केले.
चित्रपटात धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका साकारणारे अभिनेते प्रसाद ओक यांची भूमिकाही त्यांना फारच आवडली.
धर्मवीर आनंद दिघेंची व्यक्तीरेखेला योग्य न्याय दिल्याबद्दल त्यांनी प्रसाद यांचं कौतुकही केलं.
आनंद दिघे यांनी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी कसं संघर्षमय आयुष्य जगलं याची गाथा या चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय उत्तमरित्या साकारल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाच्या कलाकार, तंत्रज्ञ आणि सर्व टीमचे कौतुक करत अभिनंदन केले.
मात्र या सिनेमाचा शेवट फार दुःखदायक असल्याने तो पाहणे त्यांनी टाळले.
धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू झाला तेव्हा मला अतीव दुःख झाले होते. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब देखील अत्यंत भावुक झाले होते असेही त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी शिवसेनेचे मंत्रीगण, खासदार, आमदार देखील आवर्जून उपस्थित होते.
यावेळी या सिनेमाच्या संपूर्ण टीमचा देखील उद्धव ठाकरेंच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार महेश शिंदे, आमदार डॉ.बालाजी किणीकर उपस्थित होते.
अभिनेते प्रसाद ओक यांनी हुबेहूब धर्मवीर आनंद दिघे साकारले असल्याने त्यांना प्रेक्षकांची वाहवाही मिळत आहे.
‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रविण तरडे यांनी केले आहे. (सर्व फोटो सौजन्य : एकनाथ शिंदे / फेसबुक)