
ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास सध्या प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे.

प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे अनेक पोस्टर, टिझर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो चांगलाच चर्चेत आहे.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या “धर्मवीर मुक्काम पोस्ट – ठाणे” हा चित्रपट महाराष्ट्रातील ४०० हून अधिक स्क्रिन्स आणि १० हजारहून अधिक मोठ्या पडद्यांवर झळकताना पाहायला मिळत आहे.

धर्मवीर या चित्रपटाची प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे.

धर्मवीर या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २.५ कोटींची कमाई करत विक्रमी सुरुवात केली होती.

त्यानंतर तीन दिवसात या चित्रपटाने ९.५९ कोटींचा गल्ला जमावला होता.

यानंतर पहिल्याच आठवड्यात ‘धर्मवीर’ चित्रपटाने १३.८७ कोटींची कमाई केली आहे.

तर दहा दिवसात या चित्रपटाने १८.०३ कोटींची गल्ला जमवला आहे.

या चित्रपटाच्या निर्मितासाठी ८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.