-
हॅशटॅग मी टू चळवळ, कास्टिंग काऊच हे शब्द कलाक्षेत्रामध्ये काही नवीन नाहीत. चित्रपटात काम मिळवण्यासाठी लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो असं काही अभिनेत्रींनी बऱ्याचदा स्पष्टपणे सांगितलं आहे.
-
कास्टिंग काऊच हा प्रकार आता बंद आहे असं कितीही कोणीही ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला तरी वास्तव बदललेले नाही. कास्टिंग काऊचची अनेक प्रकरणं बॉलीवूडमध्ये वेळोवेळी उघडकीस आली आहेत.
-
२०१९ साली ‘मिशन मंगल’ या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री विद्या बालनने कास्टिंग काउचबाबत धक्कादायक खुलासा केला होता. ही घटना ऐकून सगळेच थक्क झाले होते.
-
विद्या चेन्नईला असताना एका दिग्दर्शकाने तिच्याबरोबर गैरवर्तन केले होते. ती म्हणाली, “एक दिग्दर्शक माझ्याकडे आला आणि म्हणाला की मला तुमच्याशी बोलायचे आहे. मी म्हणाले ठीक आहे. कॉफी शॉपमध्ये जाऊ आणि तिथे बोलू. पण तो म्हणाला नाही, आपण खोलीत बसून बोलू.”
-
“मी त्याला सोबत घेऊन माझ्या खोलीत आले आणि दरवाजा अर्धा उघडा सोडला. तो माझ्या मागे आला आणि त्याने मला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने तो तिथून निघून गेला पण या घटनेनंतर मी पूर्णपणे हादरले. अशा घटनांमुळे तुमचा आत्मविश्वास तुटतो.”
-
बॉलिवूडची क्वीन मानली जाणारी अभिनेत्री कंगना रानौतनेही याबाबत खुलासा केला आहे. तिच्यामते, बॉलिवूडमध्ये यशस्वी होणे आणि आपल्या स्थानावर टिकून राहणे खूपच कठीण आहे.
-
एका मुलाखतीदरम्यान तिने आपला अनुभव सांगितला. ती म्हणाली, ‘तनु वेड्स मनूचे ऑडिशन संपल्यानंतर चित्रपटाच्या युनिटमधील एका सदस्याने चित्रपट मिळवण्यासाठी त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी माझ्याकडे केली.’
-
मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेलाही या भयानक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. एका दाक्षिणात्य दिग्दर्शकासह तिला हा अनुभव आला होता.
-
बॉलिवूडमध्ये काम मिळवून देतो असे सांगून एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिचे शारीरिक शोषण केले. ती म्हणते, “याचा विचार करून आजही माझ्या अंगावर शहारे येतात. त्यातून बाहेर पडणे माझ्यासाठी खूप कठीण होते.”
-
एकेकाळची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या बिपाशा बासूलाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. एका टॉपच्या निर्मात्याने तिला काही मेसेज केले होते. मात्र, बिपाशाने अतिशय हुशारीने या घटनेचा सामना केला होता.
-
बिपाशा म्हणते, “मी माझ्या एका मित्राला मेसेज केला आणि या मेसेजमध्ये त्या निर्मात्याबद्दल अनेक अपशब्द वापरले. काही वेळाने मी निर्मात्यालाही ‘चुकून’ हाच मेसेज पाठवला.” बिपाशाची ही युक्ती कामी आली आणि त्यानंतर निर्मात्याने तिला कधीही असे मेसेज पाठवले नाहीत.
-
स्वरा भास्करने अनेकदा आपल्याबरोबर झालेल्या लैंगिक छळाबद्दल आवाज उठवला आहे. एका दिग्दर्शकाविषयी बोलताना ती म्हणाली, “चित्रपटातील दृश्यांवर चर्चा करण्याच्या बहाण्याने तो मला त्याच्या हॉटेलमध्ये बोलवायचा. मी तिथे पोहोचल्यावर तो दारूच्या नशेत मला ‘तडजोड’ करायला सांगायचा.”
-
स्वराच्या म्हणण्यानुसार, यामुळे तिला अनेक चित्रपट गमवावे लागले. ती म्हणते, जर तुमच्यात टॅलेंट असेल तर आज ना उद्या तुम्हाला कोणतीही तडजोड न करता काम मिळेल.
-
शमा सिकंदरने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, काही प्रसिद्ध निर्मात्यांना तिच्याशी मैत्री करायची होती. कामाच्या बदल्यात लैंगिक संबंध ठेवण्याची मागणीही तिच्याकडे अनेकांनी केली आहे.
-
सर्व फोटो : इन्स्टाग्राम

“माझं मत आहे की त्यानं…”, सत्यजीत तांबेंना अजित पवारांनी दिला ‘हा’ सल्ला; पुढील वाटचालीबाबत म्हणाले…!