-
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आज ५८ वर्षांचा झाला आहे. त्याच्या चित्रपट कारकिर्दीलाही ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. वयाच्या ८ व्या वर्षी ‘यादों की बारात’ या चित्रपटातून त्याने अभिनयाची कारकीर्द सुरू केली जी आजतागायत सुरू आहे.
-
गेल्यावर्षी आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाला मिळालेल्या अपयशामुळे आता काही काळ आमिर अभिनयापासून फारकत घेणार असल्याचं त्यानेच स्पष्ट केलं आहे.
-
आज आपण आमिर खानच्या आयुष्यातील आणि त्याच्या फिल्मी कारकीर्दीतील काही अज्ञात गोष्टी जाणून घेणार आहोत.
-
आमिर खानचे वडील ताहिर हुसैन हे इंडस्ट्रीतील नावाजलेले निर्माते होते, पण त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट राहिली. एका मुलाखतीमध्ये आमिर खानने त्याच्या वाडिलांच्या दिवाळखोरीमधील दिवसांबद्दल खुलासा केला आहे. आमिरच्या वडिलांचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर न चालल्याने त्यांच्यावर ही वेळ आली होती.
-
आमिर खानला ‘फिल्म एंड टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया’ मध्ये जाऊन दिग्दर्शन शिकायचं होतं, पण वडिलांनी नकार दिला आणि शिक्षणावर लक्षकेंद्रित करायला सांगितलं, तरी आमिरने मित्र आदित्य भट्टाचार्यच्या एका मुकपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरू केलं, यासाठी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनी आमिरला काही पैसेदेखील दिले होते.
-
आमिरचे काका नासिर हुसैनसुद्धा एक लोकप्रिय निर्माते होते. १९८५ साली आलेल्या त्यांच्या ‘जबरदस्त’ या चित्रपटात अमरिश पुरी काम करत होते आणि यावेळी आमिर सहाय्यक म्हणून काम करत होता.
-
या चित्रपटातील एका अॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान आमिरमुळे बरंच लक्ष विचलित झाल्याने अमरिश पुरी यांनी आमिरला चांगलंच सुनावलं होतं, त्यावेळी त्यांना आमिर नेमका कोणाचा मुलगा आहे ते माहीत नव्हतं.
-
जेव्हा निर्माते नासिर हुसैन यांनी आमिर हे सगळं तुमची कंटीन्यूटी कायम राहावी यासाठी करत आहे असं अमरिश पुरी यांना सांगितलं तेव्हा त्यांना फार वाईट वाटलं, अमरिश पुरी यांनी आमिर खानची माफी मागितली.
-
आमिरच्या लव्ह लाईफबद्दल तर आपल्याला माहिती आहेच, पण तरुणपणी आमिर एका मुलीच्या आकंठ प्रेमात बुडाला होता, पण तिने आमिरला नकार दिला आणि ही गोष्ट आमिरच्या मनाला खूप लागली.
-
या नादात त्याने संपूर्ण टक्कल केलं होतं, सीम्मी गरेवालच्या एका मुलाखतीमध्ये खुद्द आमिरने हा किस्सा सांगितला होता.
-
आमिरचा पहिला चित्रपट ‘कयामत से कयामत तक’साठी त्याला महिन्याला १००० रुपये असं मानधन मिळालं होतं, शिवाय प्रदर्शनाच्या आधी खुद्द आमिरने रस्त्यावर उतरून ठीकठिकाणी पोस्टर्स लावली होती.
-
आमिरचा गुलाम हा चित्रपट चांगलाच गाजला. त्यातील रेल्वेसमोर धावतानाच्या एका सीनमध्ये आमिर ट्रेनच्या खूप जवळ पोहोचला होता आणि मग त्याने बाजूला उडी मारली. यावेळी चित्रपटाच्या सेटवरील सगळेच जण टेंशनमध्ये होते.
-
‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटातील करिश्मा कपूरबरोबरच्या सर्वात मोठ्या किसिंग सीनसाठी ४७ रिटेक लागले होते. आमिर यावेळी चांगलाच अस्वस्थ होता असं करिश्माने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं.
-
‘मंगल पांडे’ या चित्रपटापासून आमिर खानची दुसरी इनिंग सुरू झाली आणि मग त्याने एकापाठोपाठ एक सरस चित्रपट केले.
-
जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या ५ भारतीय चित्रपटांपैकी ३ चित्रपट हे आमिर खानचे आहेत. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
