-
सिद्धार्थ जाधव(Siddharth Jadhav) हा त्याच्या चित्रपटांतील विविध भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘बकुळा नामदेव घोटाळे’ ते ‘दे धक्का’, तसेच ‘हुप्पा हुय्या’ अशा अनेक सिनेमांतील अभिनेत्याच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या.
-
सिद्धार्थ जाधवने नुकतीच कॅचअप या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले की, जेव्हा तुला ट्रोल केलं जातं, तेव्हा तू काय उत्तर देतोस? यावर सिद्धार्थ जाधव म्हणाला, “मी कोणाला जास्त काही उत्तरं देत नाही. जेव्हा ‘सिम्बा’ हा चित्रपट आला, तेव्हा लोकांना असं वाटलं की हा हवेत गेला.”
-
“एकाने मला म्हटलं होतं ३०० कोटी तुझ्यामुळे जमले नाहीत. तर ते खरं आहे, ३०० कोटी माझ्यामुळे जमले नाहीत. पण, मी त्या ३०० कोटींचा भाग असल्याचा मला आनंद आहे. आपण त्याचा आनंद नाही घ्यायचा तर कोणी घ्यायचा? मी तो आनंद घेत असतो, लोकं वेगळ्या पद्धतीने जज करतात. लोकं मला आताच जज करत नाहीयेत, पूर्वीपासून करतात.”
-
“पूर्वी मला सांगायचे की जरा नीट वाग. पूर्वी कसेही कपडे घातले तर म्हणायचे की, हे कसले कपडे घातलेत. आताही तसंच म्हणतात, त्यामुळे त्यांचं काही बदललेलं नाहीये. मला वाटतं की तुम्ही तिथेच असतात. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. माझं प्रामाणिक मत आहे की, लोकांना बरोबर करायला जाऊ नका, कारण ते त्यांच्या दृष्टिकोनातून बघत असतात.”
-
“काही मित्र, तुमच्या आयुष्यातील जवळची लोकं जेव्हा सांगतात तेव्हा ते बदल करायला पाहिजेत. म्हणजे आता महेश मांजरेकर सर म्हणतात, तुझ्याकडे प्रचंड ऊर्जा आहे, ती प्रवाहित केली पाहिजे. आता दिग्दर्शक म्हणून ती ते करतात, बाकी मी असाच आहे.”
-
पुढे सिद्धार्थ जाधव रणवीर सिंहची कॉपी करतो असे लोक म्हणतात त्याबाबत म्हणाला, “तो मुलगा कमालीचा चांगला अभिनेता आहे. तो लोकांना सरप्राईज करतो, ही मला त्याची गोष्ट आवडते. तो खरा गनिमी कावा करतो, असे मी म्हणेन. तो बाहेरच्या जगात कसा राहतो, तो तसा तुमच्यासमोर असतो.”
-
“जेव्हा तुम्ही त्याचं काम बघता तेव्हा वाटतं, हा काय कमाल अभिनेता आहे. ‘लुटेरा’, ‘सिम्बा’, ‘पद्मावत’ बघा, मला असं वाटतं की अभिनेता म्हणून तो सरप्राईज करतो.”
-
“अभिनेता म्हणून मलाही सरप्राईज करायला आवडेल . मी त्याच्या आधीपासून सरप्राईज करण्याचा प्रयत्न करतो. पण, त्याच्यामुळे मला एक आत्मविश्वास आला. त्याच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या. कोणालातरी शाहरूख म्हणतात, आणखी कोणाला इतर अभिनेत्याचं नाव देतात.”
-
“मला सर्वात जास्त काय आवडतं की लोक मला मराठी अभिनेता म्हणून संबोधतात. मी माझ्या मराठी इंडस्ट्रीचे प्रतिनिधित्व करतो. कितीतरी कलाकार आहेत, त्यात मला सौभाग्य मिळतं तर मला ते आवडतं.”
-
“सुपरस्टार सिनेमाचं मी जेव्हा शूट करत होतो, तेव्हा तिथेच सलमान खान बिग बॉसचं शूट करत होते. मी महेश सरांना फोन केला आणि त्यांना ते सांगितलं. महेश सरांनी मला सलमान खानला जाऊन भेट असं सांगितलं. बाजूला अतुल अग्निहोत्री होते, त्यांच्यासमोर माझं कौतुक केलं.
-
‘नच बलिये’च्या वेळेलादेखील सलमान खानने मला सांगितलं की, तू उत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेस. त्यांनी ते कौतुक केलं. ही कौतुकाची थाप कोणामुळे आहे, तर मराठी इंडस्ट्रीमुळे आहे. मराठी नाटक, सिनेमामुळे आहे. तर मला ते आवडतं.”
-
“बाकी जे लोक म्हणतात तू कसा आहेस, कसे तुझे दात आहेत, कसा दिसतोस, असे जे म्हणतात त्यांना थँक्यू म्हणून पुढे जाणं गरजेचं आहे.”
-
“आई-बहिणीवरून शिवी घातली तर वाईट वाटतं, त्याकडे मी लक्ष देत नाही. पण, जे लोक समजवतात की नीट वाग; तर नीट म्हणजे नेमकं कसं? मी ज्या झोपडपट्टीतून आलोय, तिथे आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, गणपती, दिवाळी, ख्रिसमस सगळं एकापाठोपाठ उत्साहाने साजरे करायचे.”
-
“एकांकिका स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा असं सगळं करूनच माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, मी तसाच आहे. अमेय वाघ किंवा इतर मित्रमंडळी भेटले तर मला त्यांना कडकडून भेटावं वाटतं.”
-
“मी सुपरस्टार नाही, मी कलाकार आहे, ज्याला वेगवेगळ्या पद्धतीची कामं करायला मिळतात. मी जसा आहे तसाच राहणार आहे.” (सर्व फोटो सौजन्य: सिद्धार्थ जाधव इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल