-
धर्मेंद्र व हेमा मालिनी यांचे नाते कायमच चर्चेत राहिले. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न हे प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. त्यांना मुले होती. त्यानंतर ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले, त्यांनी १९८० ला लग्न केले.
-
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याबरोबर जरी लग्न केले तरी त्यांनी त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर व त्यांची मुले यांच्याबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला. ते वेगळे राहत असले तरी हेमा मालिनी यांनी नेहमीच त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल समाधानी असल्याचे वक्तव्य केले आहे.
-
हेमा मालिनी यांनी लेहरेनला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत लग्नानंतर धर्मेंद्र व त्या एकत्र राहत नाहीत, याबद्दल वक्तव्य केले होते. त्या म्हणालेल्या, “मला त्याबद्दल वाईट वाटत नाही आणि रागही येत नाही. मला दोन मुली आहेत, मी त्यांना उत्तम पद्धतीने मोठे केले आहे. धर्मेंद्र कायमच आमच्याबरोबर होते आणि आहेत.”
-
पुढे त्या म्हणालेल्या, “कोणालाही आपल्या पती किंवा पत्नीपासून दूर राहायला आवडणार नाही. पण, अनेकदा आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात, ज्यावेळी तुम्हाला परिस्थिती स्वीकारावी लागते. प्रत्येक स्त्रीला असे वाटत असते संपूर्ण कुटुंब एकत्र असावे. पण, कधीकधी परिस्थिती अशी असते की गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडतात.”
-
धर्मेंद्र व हेमा मालिनी यांना ईशा व अहाना या दोन मुली आहेत. ईशाने बॉलीवूडमध्ये काम केले आहे. ‘कोई मेरे दिल से पूँछे’, ‘कुछ तो है’, ‘आँखे’ अशा चित्रपटांत ती दिसली आहे. ईशा देओलदेखील तिच्या खासगी आयुष्यामुळे मोठी चर्चेत होती. तर ईशाची बहीण अहाना ही प्रसिद्धीझोतापासून दूर असल्याचे पाहायला मिळते.
-
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘अलीबाबा और ४० चोर’, ‘अंधा कानून’, ‘छोटी सी बात’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘बगावत’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी एकत्र काम केले आहे. त्यांच्या ऑन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.
-
धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी त्यांच्या ६५ वर्षांच्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांत काम केले. त्यांना बॉलीवूडचे ही-मॅन म्हणून ओळख मिळाली. त्यांनी त्यांच्या वयाच्या उत्तरार्धातदेखील काम केले.
-
वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात काम केले होते. इतकेच नाही, तर त्यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘इक्कीस’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटात अगस्त्य नंदा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अगस्त्य नंदा हा अमिताभ बच्चन यांचा नातू आहे. धर्मेंद्र यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले. (सर्व फोटो सौजन्य: हेमा मालिनी इन्स्टाग्राम)
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष