-
दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक हा अनेकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. प्रतीकच्या जन्मानंतर काही दिवसांतच स्मिता पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर प्रतीक हा त्याच्या आजोळी म्हणजेच स्मिता पाटील यांच्या आई-वडिलांबरोबर राहिला. आजी-आजोबांनी त्याचे पालनपोषण केले, तर राज बब्बर हे स्मिता पाटील यांच्या निधनानंतर पुन्हा त्यांच्या पहिल्या पत्नीबरोबर राहू लागले.
-
गेल्या काही वर्षांत प्रतीकने अनेकदा त्याच्या कुटुंबाबद्दल, त्याचे वडील राज बब्बर यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. तसेच, जेव्हा त्याने लग्न केले त्यावेळी त्याने त्याच्या वडिलांना बोलावले नव्हते, त्यामुळेदेखील तो चर्चेत आला होता. आता प्रतीक पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. प्रतीक नेमकं काय म्हणाला आहे, हे जाणून घेऊ…
-
प्रतीक आणि त्याची पत्नी प्रिया बॅनर्जी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की, जेव्हा त्यांनी लग्नात राज बब्बर यांना न बोलावण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांना ट्रोल करण्यात आले होते. यावर त्यांनी सांगितले की, आम्ही आमच्या कामात इतके व्यग्र होतो की आम्ही ट्रोलिंगकडे लक्ष दिले नाही; तर प्रतीक म्हणाला की, ज्यांनी ट्रोल केले त्यांना सत्य माहीत नाही.
-
तो म्हणाला, “लोकांना सत्य माहीत नाही. इंडस्ट्रीमधील काहींना खरे काय आहे ते माहीत आहे. सामान्य लोकांना आणि इंडस्ट्रीतील काहींना ते सत्य माहीत नाही. एक दिवस असा येईल, ज्या दिवशी ते सत्य सर्वांना समजेल. एखाद्या गोष्टीमधून, पुस्तकातून, एखाद्या मुलाखतीतून किंवा चित्रपटातून सर्वांना सत्य समजेल.”
-
प्रतीकची पत्नी प्रिया म्हणाली, “आमचे लग्न होण्याआधी आयुष्याने आमची खूप परीक्षा घेतली. पण, आम्ही कायमच एकत्र राहिलो. आमच्या वाटेत जी काही समस्या आली, त्यावेळी आम्ही असा कधीच विचार केला नाही की आता काय होईल? आम्ही त्याला एकत्र सामोरे गेलो.”
-
वरिंदर चावलाला दिलेल्या मुलाखतीत प्रिया आणि प्रतीक यांनी लग्नसंस्थेवर वक्तव्य केले. प्रिया म्हणाली, “बॉलीवूडमधील ९० टक्के लग्ने ही दिखाऊ असतात, हे मला माहीत आहे कारण मी या इंडस्ट्रीचाच एक भाग आहे.”
-
त्यानंतर प्रतीकने ट्विंकल खन्नाने केलेल्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोमध्ये ‘रात गई बात गई’चा उल्लेख केला. तो म्हणाला की, “जर लग्न झालेली लोकं रात गई बात गई म्हणत असतील, तर काय परिस्थिती आहे हे समजते.”
-
प्रिया कॅनडामध्ये वाढली आणि ती कॅनेडियन म्हणून ओळखली जाते. ती म्हणाली, “जर वर्षानुवर्षे काम करत असलेले कलाकार हे असे म्हणत असतील तर मी त्यांना जज करते. एक कॅनेडियन म्हणून मी तुम्हाला जज करते, कारण तुम्ही भारतीय आहात, तुम्ही जे वागता ते तुमच्या संस्कृतीत आहे असा त्याचा अर्थ होतो; कारण हे लोक अनेक वर्षांच्या लग्नानंतर असे वक्तव्य करतात, त्यापेक्षा तुम्ही लग्न करू नका. तुमचे करिअर करा, अफेअर करा, लोकांबरोबर प्रामाणिक राहा.”
-
प्रिया असेही म्हणाली, “आमची संस्कृती बॉलीवूड आणि भारतापेक्षा अधिक चांगली आहे. इथे लोक लग्नाला विनोद म्हणून बघतात.” प्रतीक पत्नीच्या वक्तव्यावर सहमती दर्शवत म्हणाला, “मला वाटते की फसवणूक, अनेक पार्टनर असणे, धोका देणे चुकीचे आहे. एकाच वेळी पत्नी आणि गर्लफ्रेंड असणे चुकीचे आहे.” (सर्व फोटो सौजन्य: प्रतीक स्मिता पाटील इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…