-
अभिनेत्री स्मिता शेवाळेने आजपर्यंत विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. काही दिवसांपूर्वी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
-
अभिनेत्री नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकतीच तिने ‘अभिजात मराठी फिल्मी’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या घटस्फोटाबद्दल वक्तव्य केले.
-
स्मिता शेवाळे म्हणाली, “जेव्हा माझा घटस्फोट झाला, तेव्हाचा काळ माझ्यासाठी अतिशय कठीण होता. जर मी त्यातून बाहेर आले नसते तर माझ्यातील एक कलाकार हरवला असता. मी काम करू शकले नसते, मी चांगली आई होऊ शकले नसते, मी स्वतंत्र स्त्री असू शकले नसते; आपण आयुष्य पुढे ढकलायचे म्हणून आयुष्य ढकलतो, तसे झाले असते.”
-
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी त्यावेळी शांत राहिले, कुठे व्यक्त झाले नाही. नंतरसुद्धा एका मुलाखतीत मला प्रश्न विचारला, त्यावेळी मी खूप संयमाने, शांतपणे त्या गोष्टींकडे बघितलं. पण, हेही खरं आहे की अनेकदा अशा प्रकारचं दु:ख येतं, जिथे तुम्हाला वाटतं की माझ्याबाबतीच हे दु:ख का? मीच का? मी कोणाचं काय वाईट केलं आहे, म्हणून माझ्या बाबतीत हे घडत आहे.”
-
“या सगळ्यात आपली चूक कुठे झाली आहे हे माहीत असेल तर त्याला सामोरे जाता येते. पण, ज्यावेळी हे माहीत असतं की आपली यामध्ये काहीच चूक नाही, त्याला कसे सामोरे जावे हे समजत नाही. पण, मला असं वाटतं की ते घडल्यामुळे मी बाऊन्स बॅक होऊन परत उभी राहिले.”
-
“त्यानंतरचा माझा हा सगळा प्रवास होता, तो सगळा प्रवास महत्त्वाचा होता; म्हणून घडलेल्या ज्या वाईट गोष्टी आहेत, त्यामागेसुद्धा काही कारणे असतात. हे मी जेव्हा आता मागे वळून पाहते तेव्हा कळते. तेव्हा ते घडलं म्हणून मी खूप ताकदीने काम करू शकले.”
-
ती पुढे म्हणाली, “आपण खूप सुरक्षित वातावरणात राहण्याचा प्रयत्न करतो आणि हे जेव्हा सगळं अचानकपणे काढून घेतलं जातं, तेव्हा आपण हादरून जातो. पण, तेव्हा जर आपण पाय रोवून उभं राहिलो की मग तुम्हाला कोणी हलवू शकत नाही.”
-
“मला असे वाटते की, कोणाच्याही आयुष्यात वाईट गोष्टी घडूच नयेत. पण, जर अशा घडल्याच तर मी कायम म्हणते की तुम्ही थकलात, संपलात. असं वाटलं की इथून पुढे माझ्या आयुष्यात काही घडू शकत नाही; असं ज्यावेळी वाटतं तेव्हा मोठा श्वास घ्या, थोडं थांबा.”
-
“तो पॉज खूप महत्त्वाचा असतो, तो गरजेचा असतो. त्यानंतर तुम्ही १०० मैल पळू शकता, इतकी ताकद तुमच्याकडे येईल. ही ताकद स्त्रीकडे तर आहेच आहे.” (फोटो सौजन्य: स्मिता शेवाळे इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…