-
प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपे आहे. विविध चित्रपट, नाटक आणि वेब सीरिज या माध्यमांतून ते प्रेक्षकांच्या भेटीला येतात. नुकतेच ते ‘हे काय नवीन’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. zee 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच प्रिया व उमेश ‘जर तरची गोष्ट’ या नाटकातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. त्यांच्या नाटकाचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते.
-
हे दोन्ही कलाकार सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. त्यांचे विविध फोटो-व्हिडीओंना प्रेक्षक भरपूर प्रतिसाद देतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या ट्रान्स्फॉर्मेशनचे काही फोटो शेअर केले होते. त्यांचा फिटनेस पाहून अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.
-
आता ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रिया आणि उमेश यांनी त्यांच्या आहारात काय असते, त्यांना कोणते पदार्थ जास्त आवडतात आणि आहाराच्या बाबतीत ते एकमेकांसारखेच आहेत की एकमेकांच्या विरुद्ध आहेत यावर वक्तव्य केले आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते जाणून घेऊ…
-
प्रिया बापट व उमेश कामतला विचारले गेले की, तुम्ही दोघं फूडी आहात का? त्यावर उमेशने फूडी असल्याचे सांगितले; तर प्रियाने मी फूडी नाही, असे सांगितले. उमेश म्हणाला, “मी सगळ्यातलं सगळं खातो. मी वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळं, वेगवेगळ्या देशांतलं वेगवेगळं खात असतो.”
-
प्रिया म्हणाली, “मी नाश्ता करतच नाही. एखादं फळ आणि अंडं एवढंच खाते; पण मला जेवण वेळेत लागतं.” पुढे उदाहरण देत प्रिया म्हणाली, “घरी तोंडलीची भाजी केली होती. उमेशला फक्त मी भात करायला सांगितला. तर थोडासा भात, तोंडलीची भाजी, मेतकूट, तूप आणि मीठ एवढं साधं जेवले.”
-
उमेश म्हणाला, “मला खायला आवडतं. मला असं वाटतं की, माणसानं खाण्यासाठीच जगावं आणि मी खूपदा सांगतो की, मी जर काही व्यायाम करत असेन ना, तर तो यासाठी करतो की, मला सगळं खाता आलं पाहिजे. आमचे सरही तेच सांगतात की, आयुष्यभर व्यवस्थित खाता आलं पाहिजे म्हणून व्यायाम करायचा.”
-
“त्याला मनापासून खायला आवडतं. मला कधी कधी कौतुक वाटतं की, मी पोट भरायला जेवते. म्हणजे भुकेनं मला अॅसिडीटी होऊ नये आणि त्रास होऊ नये म्हणून मी जेवते. तो मनापासून जेवतो. म्हणजे खूप मनापासून मी फक्त वरण-भात खाऊ शकते”, असे म्हणत प्रियाने खाण्याच्या बाबतीत त्या दोघांमध्ये फरक असल्याचे सांगितले.
-
तसेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्या फिटनेस आणि डाएटबद्दल विचारले होते. त्यावेळी ती म्हणालेली, “माझ्या डाएटबद्दल विचारणाऱ्या सगळ्यांसाठी सांगते की, डाएट हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं. जे माझ्यासाठी उपयोगी ठरतं, ते तुमच्यासाठीसुद्धा ठरेलच, असं नाही. प्रत्येकाचं शरीर वेगळ्या पद्धतीने काम करतं. घरचं, पारंपरिक आणि सकस अन्न खा. साखर, मैदा आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जपासून शक्य तितकं दूर राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही.”
-
दरम्यान, त्यांच्या हे काय नवीन या वेब सीरिजनंतर ते कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (फोटो सौजन्य: प्रिया बापट इन्स्टाग्राम)
व्वा व्वा! ताई काय नाचलीस…, ‘झुमका गिरा रे’वर धरला जबरदस्त ठेका, VIDEO VIRAL