-
७९ व्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये मराठी भाषेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी आणि अंकिता वालावलकर हे कलाकार फ्रान्सला पोहोचले आहेत.
-
या चौघांनी कान्सच्या रेड कार्पेटवर मराठमोळ्या पारंपरिक अंदाजात एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अशोक सराफ यांनी रेड कार्पेटवर येताच उपस्थित सर्वांना नमस्कार करून अभिवादन केलं.
-
तर, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी रेड कार्पेटवर खास पिस्ता कलरची पैठणी साडी नेसून एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं. पैठणी साडी, साडीला कॉन्ट्रास मॅच होईल अशी पर्स, नाकात नथ, केसात गजरा, गळ्यात मंगळसूत्र अन् सुंदर हार या लूकमध्ये निवेदिता सराफ खूपच सुंदर दिसत आहेत.
-
प्रेक्षकांच्या लाडक्या प्राजक्ता माळीने मोरपिशी रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसून रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली होती.
-
नऊवारी साडी, अस्सल पारंपरिक नथ, गळ्यात ठुशी, कानात झुमके, हातात तोडे अन् कमरपट्टा असा पारंपरिक मराठमोळा साज करून प्राजक्ता माळी कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली होती. तिचा रुबाबदार अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
-
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने सुद्धा कान्सच्या रेड कार्पेटवर बेबी पिंक रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली होती.
-
यावर तिने खास मोत्याचे दागिने परिधान केले होते. अंकिताचे फोटो सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत.
-
अंकिताच्या साडीवरच्या पदरावर एक खास डिझाइन पाहायला मिळाली. नारळाची झाडं, उडणारे पक्षी या डिझाइनमध्ये पाहायला मिळत आहेत. यामध्ये अंकिताने आपल्या ‘कोस्टल कोकण’ची झलक ‘कान्स’च्या रेड कार्पेट लूकद्वारे सर्वांना दाखवली आहे.
-
तर, जयंती वाघधरे आणि ‘अभिजात मराठी ओटीटी’चे संस्थापक केदार जोशी यांच्या लूकची सुद्धा सर्वत्र चर्चा होत आहे. जयंतीने रेड कार्पेटवर पैठणीचा सुंदर असा घेरदार गाऊन परिधान केला होता. हातात हिरव्या बांगड्या, माथ्यावर चंद्रकोर आणि नाकात नथ या लूकमध्ये ती सुद्धा खूपच सुंदर दिसत होती. ( सर्व फोटो सौजन्य : अभिजात मराठी ओटीटी इन्स्टाग्राम )
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारला! सरकारने पदावनती केल्याची मुंढेची भावना; दीड महिना ठेवलेले प्रतीक्षेत