-
आपल्या सहज-सुंदर अभिनयाने आणि विनोदी शैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणून भाऊ कदम यांना ओळखलं जातं. सुरुवातीच्या काळात संघर्ष करून भाऊंनी आज एवढं मोठं यश मिळवलं आहे. या प्रवासात भाऊ कदम यांना त्यांच्या पत्नीने खंबीर साथ दिली.
-
भाऊ कदम व्हॅलेंटाईन्स डे, लग्नाच्या वाढदिवशी पत्नीबरोबरचे गोड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
-
नुकतेच हे दोघंही मनाली येथे फिरायला गेले आहेत. या दोघांचे मनालीतील सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पहाडी लूक करून भाऊ अन् ममता यांनी रोमँटिक फोटोशूट केलं आहे.
-
भाऊ कदम यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांची लव्हस्टोरी सांगितली होती. या दोघांची भेट ममता यांच्या घरी, त्यांच्या बहिणीमुळे ( भाऊ कदम यांची मेहुणी ) झाली होती.
-
भाऊ कदम सांगतात, “आमचं लव्हमॅरेज आहे. जी माझी मेहुणी आहे…म्हणजेच माझ्या बायकोची बहीण ती आमच्या एकांकिकेत काम करायची. आमचा संपूर्ण ग्रुप एकदा त्यांच्या घरी गेला होता…मी सुद्धा त्यांच्याबरोबर गेलो होतो. हळुहळू जाणं-येणं वाढलं. ममताची ( पत्नी ) आणि माझी ओळख तिथेच झाली, ममता तिच्या घरात भावंडांमध्ये सर्वात मोठी आहे.”
-
भाऊ कदम पुढे म्हणाले, “आमची एकमेकांशी ओळख झाल्यावर मध्ये अनेक महिने गेले…आमचं छान जुळलं. आम्ही एकमेकांना ओळखून घेतलं, समजून घेतलं.”
-
“त्यानंतर मग एकेदिवशी मी मनातल्या भावना कबूल करायचं ठरवलं. ‘हो’ म्हटली तर चांगलंच आहे…असा विचार माझ्या मनात होता, आणि खरंच ती ‘हो’ म्हणाली.”
-
“त्यावेळी तिने माझं घर वगैरे काहीच पाहिलं नव्हतं. त्याआधीच तिने होकार दिला. मग, आमचं लग्न झालं.” असं भाऊ कदम यांनी सांगितलं.
-
दरम्यान, ‘फू बाई फू’, ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी कार्यक्रमांमुळे भाऊ कदम यांना घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. अलीकडेच ते ‘प्रेमाची गोष्ट २’ या सिनेमात झळकले होते. याशिवाय भाऊ सध्या ‘सिरियल किलर’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. लवकरच भाऊ कदम आणि निलेश साबळे एका सिनेमात सुद्धा एकत्र झळकणार आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : भाऊ कदम इन्स्टाग्राम )
आमिर खान करतोय तिसरं लग्न; ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार त्याच्या दोन्ही एक्स पत्नींचा उल्लेख करत म्हणाल्या….