-
पावसाळ्यातील शांत सरींचे संगीत, मातीची नशा आणणारा सुगंध आणि हिरव्या निसर्गाचं मनमोहक रूप, अशा वातावरणात आपल्या खास व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची मजाच काही और असते!
भारतामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत, जी पावसाळ्यात एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी भासतात.
जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत खास क्षण घालवायचे असतील, तर खाली दिलेली चार ठिकाणं तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. (छायाचित्र: फ्रीपिक) -
कूर्ग, कर्नाटक : दक्षिणेचं रोमँटिक काश्मीर
पावसाच्या सरींसोबत गरम कॉफीच्या सुगंधाने आणि बोचऱ्या वाऱ्यांमुळे हातात हात घालून फिरण्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर कूर्गपेक्षा परफेक्ट ठिकाण दुसरं नाही!
दक्षिण भारताचं काश्मीर म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण हिरव्या कॉफीच्या बागा, धुक्याने वेढलेल्या पर्वतरांगा आणि थंड हवामान यासाठी प्रसिद्ध आहे.
मान्सूनमध्ये ताडियांडमोलसारखे ट्रेक्स अधिकच नयनरम्य होतात, तर अॅबे फॉल्ससारखे धबधबे तुम्हाला निसर्गाच्या प्रेमात पाडतात.
पावसात भिजताना आणि निसर्गाच्या कुशीत हरवताना जोडीदारासोबतचे क्षण कायमचे लक्षात राहतात. (छायाचित्र: सोशल मीडिया) -
मुन्नार, केरळ : धुक्याच्या कवेतलं हिरवंगार स्वप्न
पावसाच्या सरींनी भिजलेलं मुन्नार हे जणू निसर्गाच्या कॅनव्हासवर रंगवलेलं एक जिवंत चित्रच वाटतं. केरळच्या पश्चिम घाटात वसलेलं हे ठिकाण पावसाळ्यात धुक्याच्या सौम्य कवेत हरवून जातं आणि त्या पार्श्वभूमीवर चहाच्या मखमली बागा अक्षरशः स्वर्गासारख्या भासतात.
अडक्कल आणि लक्कम झऱ्यांचे संथपणे वाहणारे पाण्याचे प्रवाह पाहत असताना वेळ तिथे थांबून गेल्यासारखा वाटतो.
मुन्नारचे चांगले रस्ते आणि तुलनेने कमी भूस्खलनाचा धोका हे प्रवास अधिक सुखद आणि सुरक्षित करतात.
पावसात चहा प्यायचा, हिरवळीवर भिजायचं आणि त्या शांततेत जोडीदारासोबत हरवून जायचं, हे मुन्नारमध्ये शक्य होतं. (छायाचित्र: सोशल मीडिया) -
उदयपूर, राजस्थान : पावसात न्हालेलं तलावांचं शाही स्वप्न
राजस्थान म्हणजे केवळ वाळवंट नव्हे, पावसाळ्यात त्याच प्रदेशातील उदयपूर आपल्याला नवा चेहराच दाखवतो!
तलावांचं शहर म्हणून ओळखलं जाणारं उदयपूर पावसाळ्यानंतर एखाद्या रोमँटिक कथेसारखं वाटतं.
पिचोल तलावाच्या काठावर हातात हात घालून बसणं, संथ बोटिंग करत दूरवर पसरलेली महालांची प्रतिबिंब पाहणं आणि सज्जनगडाच्या माथ्यावरून धुक्यात हरवलेलं शहर न्याहाळणं हे सगळं तुम्हाला काळाच्या पलीकडे घेऊन जातं.
हिरवळ वाढलेली, हवेत गारवा आणि गर्दी कमी असल्यामुळे उदयपूर हे पावसात जोडीदारासोबत शांत, देखणं आणि राजेशाही अनुभव देणारं ठिकाण ठरतं. (छायाचित्र: सोशल मीडिया) -
लोणावळा-खंडाळा, महाराष्ट्र : ढगांमध्ये हरवलेलं प्रेम
पावसाळा सुरू झाला की लोणावळा-खंडाळाची आठवण आल्यावाचून राहत नाही!
मुंबईच्या जीवनाला थोडीशी विश्रांती देणारं हे लोकप्रिय वीकेंड डेस्टिनेशन, हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याची चादर, संथ सरी आणि थंडगार वाऱ्यांनी भरलेलं असतं.
पावसात कोसळणारे धबधबे, घाटातून दिसणारे वळणदार रस्ते आणि मनाला स्पर्श करणारी निसर्गाची शांतता हे सगळं तुमच्या जोडीदारासोबत घालवण्यासाठी परफेक्ट वातावरण तयार करतं.
रस्ता आणि रेल्वेने सहजपणे जोडलेलं असल्यामुळे, लोणावळा-खंडाळा हे शहरवासीयांचं एक नेहमीचं आणि मनाजवळचं ठिकाण ठरतं. (छायाचित्र: सोशल मीडिया)

Mumbra Train Accident : मुंब्रा स्थानकाजवळ अपघात कसा झाला? रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं नेमकं कारण