-
वारकरी संप्रदायात व हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेचे सर्वोच्च शिखर म्हणजे आषाढी एकादशी. यंदा ही पवित्र तिथी रविवार, ६ जुलै २०२५ रोजी साजरी होणार असून, संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात आजच्या दिवशी उपवास, नामस्मरण आणि विठ्ठलभक्तीचा महोत्सव होणार आहे. पंढरपूरची वारी आणि लाखो भक्तांची उपस्थिती यांमुळे या एकादशीस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
-
पहाटेपासूनच लाखो भाविक विठोबा-रखुमाईच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात. वर्षभर वाट पाहिलेल्या या दिवसासाठी अनेक भक्त आधीच पंढरपुरात दाखल झाले आहेत. देवळात टाळ-मृदंगांच्या गजरात हरिपाठ, भजन-कीर्तन, दिंड्या आणि हरिपाठ सुरू झाले आहेत. भक्तांच्या पुंडलिक वरदे हरी विठ्ठल या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला आहे.
-
धार्मिक ग्रंथांनुसार आषाढी एकादशीला ‘शयन एकादशी’, असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाला सुरुवात होते. या दिवशी व्रत व उपवास केल्यास विशेष पुण्य फळ प्राप्त होते, असे मानले जाते. त्यामुळे अनेक भक्त ही एकादशी अत्यंत निष्ठेने पाळतात. (फोटो सौजन्य : Pexels)
-
उपवासाची सुरुवात एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीपासून केली जाते. आजच्या दिवशी संध्याकाळी सात्त्विक अन्न ग्रहण करून, उपवासाचा संकल्प करावा. एकादशीच्या दिवशी कांदा, लसूण, तांदूळ, मीठ यांचा त्याग केला जातो. काही भक्त संपूर्ण दिवस उपवास करतात; तर काही फळाहार किंवा उपवासासाठी खास फराळी पदार्थ ग्रहण करतात. (फोटो सौजन्य : Pexels)
-
या दिवशी केवळ आहारावरच मर्यादा नसतात, तर मन, वाणी व वर्तनावरही संयम ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. राग, लोभ, द्वेष, असत्य बोलणे, चुगली करणे आणि इतर दूषित वृत्तींपासून दूर राहणे या बाबी उपवासाचे शुद्ध स्वरूप सिद्ध करतात. याच कारणामुळे उपवास हे आत्मिक शुद्धीचे एक माध्यम मानले जाते. (फोटो सौजन्य : Social Media)
-
उपवासासोबतच या दिवशी भगवान विष्णूच्या पूजा-अर्चना, हरिपाठ, विष्णु सहस्रनाम, गीता पारायण व रामकथा यांचे आयोजन घरी किंवा मंदिरात केले जाते. काही जण भजन-कीर्तनात सहभागी होतात; तर काही घरातच शांतपणे व्रतकथेचे वाचन करतात. व्रतकथेमध्ये या एकादशीचे महत्त्व, पौराणिक कथा आणि तिचे आध्यात्मिक परिणाम नमूद केलेले असतात.
-
एकादशी उपवासाचा समारोप द्वादशीच्या दिवशी सूर्योदयानंतर योग्य वेळ पाहून पारणे करून केला जातो. त्यामध्ये सात्त्विक अन्न (पालेभाज्या, फळे, गोडधोड) ग्रहण करून उपवास पूर्ण होतो. काही लोक मंदिरात अन्नदानही करतात. उपवास केल्यावर पारणे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. (फोटो सौजन्य : Pexels)
-
सध्या अनेक तरुण, शहरी जीवन जगणारे लोकही मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अशा उपवासांमध्ये सहभाग घेत आहेत. आहारातील शुद्धता, विचारांची शिस्त व श्रद्धेची गाठ ही आजच्या काळातही उपवासाला नवीन अर्थ देत आहे. त्यामुळे अशा धार्मिक व्रतांचे समाजातील स्थान अधिक दृढ झाले आहे. (फोटो सौजन्य : FreePik)
-
यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये चोखंदळ सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि स्वयंसेवकांची भरघोस मदत असल्यामुळे लाखो भाविकांना सुस्थितीत दर्शन मिळणार आहे. उपवास करणाऱ्यांसाठी विविध ठिकाणी फलाहार केंद्रे आणि विश्रांतिगृहे सज्ज ठेवण्यात आली आहेत. राज्य शासन व स्थानिक संस्था यांनीही सर्वतोपरी तयारी केली आहे. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)

IND vs ENG: ड्रीम विकेट! आकाशदीपने रूटला केलं क्लीन बोल्ड; ‘तो’ बॉल पाहून सगळेच चकित, गिलने डोक्याला लावला हात; VIDEO व्हायरल