-
झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा प्रवास ज्या पवित्र पंढरपूर भूमीत सुरू झाला होता, त्याच पंढरपुरात दोन वर्षांनंतर मालिकेने आपल्या यशस्वी प्रवासाचा एक खास टप्पा साजरा केला.
-
विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तांसाठी आणि मालिकेच्या प्रेक्षकांसाठी झी मराठीतर्फे ‘स्वर पंढरी’ या भक्तिमय स्वर-सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा आनंदोत्सव उत्साहात पार पडला.
-
या मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेले कलाकार सावली (प्राप्ती रेडकर), सारंग (साईंकित कामत), अबीर (साईराज केंद्रे) आणि ओवी (वेदांती भोसले) पारंपरिक वेशभूषेत पंढरपुरात दाखल झाले.
-
त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांबरोबर भक्तिरंगात रंगून गेले.
-
सावलीची भूमिका साकारणाऱ्या प्राप्ती रेडकरने आपल्या पंढरपूर वारीच्या भावना व्यक्त करताना सांगितले,
-
“या मालिकेत काम करताना मला दोनदा वारीला जाण्याचा योग आला, तर त्याआधीही मी एकदा गेले होते. त्यामुळे या वर्षी वारीला जाण्याचे माझे हे चौथे वर्ष होते. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते; कारण असं म्हणतात ना तुमची कितीही उत्कट इच्छा असो किंवा तुम्ही कितीही प्रयत्न करा, जोपर्यंत विठुरायाची इच्छा होत नाही, तोपर्यंत दर्शनाचा योग येत नाही. विठूचे बोलावणे आले की दर्शन घडतेच.”
-
“मला चार वेळा दर्शन मिळाले, ही विठुरायाची माझ्यावर असलेली असीम कृपा आहे. माझ्या आई-वडिलांचीही विठ्ठलरायाचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा आहे.”
-
“या मालिकेच्या पहिल्या वर्षाची सुरुवातच आम्ही विठूमाऊलीच्या दर्शनाने केली होती. गेल्या वर्षी आम्ही वारीत चाललो आणि खूप छान दर्शनही झाले. त्यावेळी वारीतच आमचे शूटिंग सुरू होते.”
-
“सुरुवातीला मला वाटायचे की मी एवढे कसे चालू शकेन? पण अनुभवाने सांगते, सोबतचे वारकरी खूप गोड आणि प्रेमळ स्वभावाचे असतात; स्वतः उपाशी राहतील पण दुसऱ्याला आधी खायला देतील.”
-
“वारीदरम्यान पायी चालताना आणि शूटिंग करताना अजिबात थकवा जाणवला नाही. हे बळ साक्षात विठुरायाच देतो.”
-
“प्रचंड गर्दी आणि सततचे शूटिंग असूनही यावेळेस मला मनसोक्त विठ्ठल माऊलींचे दर्शन लाभले. त्यासाठी मी विठुरायाची मनापासून आभारी आहे; हे आभार व्यक्त करायला माझ्याकडे शब्दच नाहीत.”
-
“या वर्षी आम्ही शूटसाठी पंढरपूरला चाललो होतो, पण तिथे शूटिंग होणार का किंवा वारीत सहभागी होता येईल का, याबद्दल काहीच निश्चित नव्हते. पण माझी एकच इच्छा होती की मला वारीत जायचे आहे. मी सतत विठुरायाला साकडं घालत होते, विठुराया, काहीतरी कर जेणेकरून मला दर्शन मिळेल.”
-
दरम्यान, झी मराठीचा आळंदीत वारकऱ्यांच्या सेवेचा एक कार्यक्रम मुसळधार पावसामुळे रद्द झाला. तेव्हा यंदा दर्शन होणार नाही असेच मला वाटले होते.
-
“पण अचानक अवघ्या दोन दिवसांत झी मराठीच्या ‘स्वर पंढरी’ या सोहळ्यामुळे माझी विठुरायाचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण झाली.”
-
“या कार्यक्रमात वारकरी, पंढरपुरातील नागरिक आणि अंध मुलांचा विशेष सहभाग होता. तसेच केतकी माटेगावकरची गाणी, सुंदर नृत्य सादरीकरणे आणि अनेक कलाकारांची उपस्थिती लाभली.”
-
“आमच्या मालिकेचे निर्माते आदिनाथ कोठारे हेदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. हा अत्यंत भव्यदिव्य सोहळा पार पडला.”
-
“याच निमित्ताने मला विठूमाऊलीचे दर्शन झाले आणि एका मोठ्या सोहळ्याचा भाग होण्याचे भाग्य लाभले.”
-
“या अनपेक्षित आणि भक्तिमय अनुभवामुळे मी अत्यंत आनंदी आहे. आषाढ महिन्यात पंढरपूरचे रूप अप्रतिम दिसते आणि त्या संपूर्ण परिसरात एक अलौकिक शक्तीचा वास असल्याचा अनुभव येतो.”
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया