-
भारतात दैनंदिन जीवनात सहज आणि सामान्य दिसणाऱ्या काही सवयी जपानमध्ये मात्र अत्यंत अशिष्ट व अनुचित मानल्या जातात. आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी लोक मोकळेपणाने फोनवर बोलताना, खाताना किंवा इतर कामे करताना सहजगत्या वावरताना दिसतात; परंतु जपानमध्ये सामाजिक नियमांना मोठे स्थान आहे. हे सर्व कडक कायदे नसले तरीही तेथील नागरिक या सामाजिक शिष्टाचारांचे काटेकोरपणे पालन करतात. भारतात सामान्य वाटणाऱ्या, पण जपानमध्ये अनुचित मानल्या जाणाऱ्या अशा प्रमुख सवयी खालीलप्रमाणे : (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
१. ट्रेनमध्ये मोठ्याने बोलणे
जपानमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवास करताना लोक अत्यंत हळू आवाजात संभाषण करतात. ट्रेन किंवा बसमध्ये मोबाईल फोनवर बोलणे आणि मोठ्या आवाजात गप्पा मारणे हे अशिष्टपणाचे लक्षण मानले जाते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
२. रांग मोडणे
जपानमध्ये रांगेत उभे राहून आपली वेळ येण्याची वाट पाहणे हा महत्त्वाचा सामाजिक शिष्टाचार आहे. तेथील रेल्वेस्थानकांवर जमिनीवर प्रवाशांसाठी रांगेचे विशिष्ट चिन्ह बनवलेले असते. तसेच ट्रेन आल्यावर आधी आतील प्रवाशांना उतरू देणे आणि त्यानंतरच आत चढणे हा तेथील नियम आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
३. चालता चालता खाणे-पिणे
भारतात रस्त्याने चालताना खाणे-पिणे ही सामान्य गोष्ट आहे; परंतु जपानच्या रस्त्यांवर ही सवय योग्य मानली जात नाही. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी लोक जेवणासाठी किंवा खाण्यासाठी ठरवून दिलेल्या जागांचा अथवा दुकानांचाच वापर करतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
४. कचरा टाकणे
जपानमधील सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या खूप कमी आढळतात. कारण- तेथील लोक रस्त्यावर कचरा अजिबात टाकत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी कचरा पसरवणे तिथे पूर्णपणे चुकीचे मानले जाते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
५. शूज घालून आत जाणे
जपानमध्ये घरांच्या आत शूज किंवा चप्पल घालून जाण्यास मनाई असते. अनेक पारंपरिक उपाहारगृहे, मंदिरे, हॉटेल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही बाहेर शूज वा चप्पल काढूनच आत प्रवेश करावा लागतो. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
६. टिप देणे
भारत, अमेरिका आणि इतर देशांमधील उपाहारगृहे, कॅफे किंवा हॉटेल्समध्ये टिप देणे ही सामान्य पद्धत आहे; परंतु जपानमध्ये टिप देणे ही संस्कृती नाही आणि ते अनुचित मानले जाते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
७. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे
जपानमध्ये उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केले जात नाही. रस्त्यावरून चालताना धूम्रपान करणे किंवा सिगारेटचे थोटूक जमिनीवर फेकणे हे स्थानिक नियमांचे उल्लंघन ठरते. त्यासाठी तिथे स्वतंत्र धूम्रपान कक्ष (स्मोकिंग एरिया) तयार करण्यात आलेले असतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत