-
पँगाँग तलावाच्या उत्तरेला भारतीय सैन्याला पहिल्यासारखी फिंगर आठ पर्यंत गस्त घालता आली तरच डोवाल-वँग चर्चा यशस्वी ठरली असे म्हणता येईल असे विश्लेषकांचे मत आहे. कारण चीनने फिंगर फोरपर्यंत घुसखोरी केली आहे.
-
जागतिक नकाशावर चीनच्या आजूबाजूला असणाऱ्या भारताबरोबर फिलिपिन्सपासून ते अगदी नेपाळपर्यंत आणि म्यानमारपर्यंत अनेक देशांशी चीनचे सीमेवरुन वाद आहेत. चीनने नुकताच भूतानच्या सीमेवरील सततेंग अभयारण्याचा भाग हा वादग्रस्त भूभाग असल्याचं म्हटलं आहे. त्यावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. आपल्या विस्तारवादी भूमिकेमुळे चीनचे शेजारच्या देशांशी फारसे चांगले संबंध नाही. शेजारच्या देशांचे भूभाग बळकावण्यासंदर्भात चीनच्या सतत खुरापती सुरु असतात. जाणून घेऊयात कोणत्या १८ देशांसोबत कोणत्या प्रदेशावरुन चीनचे वाद सुरु आहेत.
-
व्हिएतनाम – ऐतिहासिक संदर्भात चीन व्हिएतनामचा मोठ्या भूभागावर मागील अनेक दशकांपासून दावा सांगत आलं आहे. १३६८ ते १६४४ दरम्यान अस्तित्वात असणाऱ्या मिंग राजवटीच्या काळात हा भूभाग चीनचा असल्याचे सांगितले जाते. याच प्रमाणे मॅकेल्सफिल्ड बँक, पार्शियल बेटांबरोबरच दक्षिण चीन समुद्रातील काही भाग आणि स्पार्टली बेटांचा भूभाग आपलाच असल्याचा दावा चीन करतं.
-
भारत – चीनने भारताच्या पूर्वेकडील बऱ्याच मोठ्या भागावर दावा सांगितला आहे. या भागाला अक्साई चीन असं म्हणतात. याशिवाय चीन सध्या लडाखच्या पूर्वेला असणाऱ्या संपूर्ण गलवान खोऱ्यावर आपला हक्क सांगत आहेत. याआधीही अनेकदा चीनने लडाखबरोबरच अरुणालच प्रदेशमधील भूभागावर दावा सांगितला आहे. चीनच्या याच विस्तारवादी भूमिकेमुळे १५ जून रोजी भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हिंसक झटापट झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४३ जवान जखमी अथवा मरण पावल्याचे सांगितले जात आहेत.
-
उत्तर कोरिया – बायकडू आणि जिआंदाओ या दोन भूभागांवरुन उत्तर कोरिया आणि चीनमध्ये वाद आहे. काही प्रसंगी चीनने १२७१ ते १३६८ च्या कालावधीमध्ये अस्तित्वात असणाऱ्या युआन सम्राज्याचा दाखला देत संपूर्ण उत्तर कोरियावरच हक्क सांगितल्याचे संदर्भ इतिहासात सापडतात.
-
रशिया – जगातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणाऱ्या या दोन देशामध्येही भूभागावरुन वाद आहे. दोन्ही देशांमध्ये सीमा आणि भूभागासंदर्भातील अनेक करार झाले आहेत. असं असलं तरी रशियाच्या सीमेतील एक लाख ६० हजार स्वेअर किलोमीटरच्या भूभाग आपलाच असल्याचा दावा चीन करतं.
-
जपान – दक्षिण चीन समुद्रामधील काही भागांवर चीन कायम दावा सांगत आलं आहे. खास करुन सेनकाकू बेटे, रिक्यू बेटांवरुन जपान आणि चीनमध्ये वाद आहेत. या बेटांवर दोन्ही देशांकडून दावा सांगितला जातो. मागील अनेक दशकांपासून या बेटांवरुन चीन-जपानमध्ये वाद सुरु आहे.
-
भूतान – तिबेटच्या सीमेजवळ असणाऱ्या डोंगररांगा खास करुन चेरकीप गोमपा, दोह, डुंगमार, गीसूर, गीझोन, इतसी गोम्पा, खोचार, न्यानरी, रिंगउंग, सानमार, तारचेन आणि झुतहूलफूकवरुन दोन्ही देशांमध्ये वाद आहे. याचबरोबर चीन कुला कानगीर आणि पश्चिमेकडील काही छोट्या डोंगररांगाबरोबरच उत्तरेतील हा नावाच्या संपूर्ण जिल्ह्यावर चीन दावा सांगतं. नुकताच चीनने पूर्व भूतानमधील ताशीगांग जिल्ह्यातील सकटेंग अभयारण्याच्या कामाला आक्षेप घेत हा वादग्रस्त भूभाग असल्याचे जागतिक पर्यावर सुविधा (जीईएफ) परिषदेमध्ये सांगितले.
-
फिलिपिन्स – दक्षिण चीन समुद्रामधील काही भागांवरुन या दोन्ही देशांमध्ये सतत संघर्ष सुरु असतो. फिलिपिन्सने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडेही नेलं. तेथील सुनावणीमध्ये निकाल फिलिपिन्सच्या बाजूने लागला. मात्र चीनने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतरही फिलिपिन्सच्या या प्रदेशावर दावा सांगत वाद चिघळत ठेवण्यालाच प्राधान्य दिलं असल्याचं चित्र दिसत आहे.
-
तैवान – चीन संपूर्ण तैवान देशावरच दावा करतो. मात्र खास करुन मॅकलिस्फी एल्ड बँक, पार्शीयल बेटे, स्कारर्बोग शोएलबरोबरच दक्षिण चीन समुद्रातील तैवानच्या समुद्री सीमांजवळील मोठ्या भागावर चीन दावा करतं. दक्षिण चीन समुद्रामध्ये असलेल्या पार्शियल बेटांवरील हक्कांवरुन चीन, तैवान आणि व्हिएतनामचा ब्रुमाशी वाद आहे.
-
ब्रुनोई – स्पार्टली बेटांच्या हक्कांवरुन चीनचा मलेशिया, व्हिएतनामबरोबरच ब्रुनोईसोबतही वाद सुरु आहे. या बेटांवर नक्की हक्क कुणाचा यावरुन तिन्ही देशांमध्ये संघर्ष बऱ्याच काळापासून सुरु आहे.
-
सिंगापूर – दक्षिण चीन समुद्रामधील समुद्री सीमावरुन दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहे.
-
कंबोडिया – अनेक देशांप्रमाणे चीनने ऐतिहासिक संदर्भाचा दाखला देत कंबोडियातील काही भूभागांवर हक्क सांगितला आहे. १३६८ ते १६४४ दरम्यान अस्तित्वात असणाऱ्या मिंग राजवटीच्या काळामध्ये हा भूभाग चीनचा होता असा दावा त्यांच्याकडून केला जातो.
-
इंडोनेशिया – इंडोनेशियाच्या समुद्री सीमांजवळीच काही भाग हा आपल्या मालकीचा असल्याचा चीनचा दावा आहे. हा वादग्रस्त भाग हा दक्षिण चीन समुद्रामध्ये आहे.
-
दक्षिण कोरिया – पूर्व चीन समुद्रातील काही भागांवरुन चीन आणि दक्षिण कोरियामध्ये वाद सुरु आहेत. उत्तर कोरियाप्रमाणेच चीनने १२७१ ते १३६८ च्या काळात अस्तित्वात असणाऱ्या युआन राजवटीचा संदर्भ देत संपूर्ण दक्षिण कोरियावरच आपला हक्क सांगितल्याचे संदर्भ सापडतात.
-
नेपाळ – मागील काही दिवसांपासून सतत भारताविरोधात भूमिका घेणाऱ्या नेपाळच्या भूभागावरही त्यांचा मित्र म्हणवून घेणारा चीन दावा करत आहे. नेपाळ आणि चीनमध्ये डाव्यांचे सरकार असले तरी विस्तावरवादी चीनने आपल्या मित्रालाही सोडलेलं नाही. नेपाळ-चीन सीमेवरील भूभागावरुन १७८८ ते १७९२ दरम्यान नेपाळ आणि चीनमध्ये युद्ध झालं आहे. तेव्हापासून चीनने अनेकदा सीमेजवळीच नेपाळचा भाग हा तिबेटचा प्रदेश असून तो पर्यायाने चीनचाच भाग असल्याचा दावा केला आहे.
-
तजाकिस्तान – क्विंग राजवटीचा संदर्भ देत चीन तजाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरील तजाकिस्तानच्या भूभागावर दावा सांगतं. १६४४ ते १९१२ दरम्यान अस्तित्वात असणाऱ्या क्विंग राजवटीच्या काळात हा भूभाग चीनचा होता असा दावा चीनकडून केला जात आहे.
-
लाओस – लाओसच्या सीमेतील बऱ्याच मोठ्या भूभागावर चीन दावा सांगतं. यासाठीही चीनकडून १२७१ ते १३६८ च्या कालावधीमध्ये या भूभागावर सत्ता असणाऱ्या युआन राजवटीचा संदर्भ चीनकडून दिला जातो.
-
मलेशिया – दक्षिण चीन समुद्रामधील काही भाग आणि खास करुन स्पार्टली बेटांच्या हक्कांवरुन चीनचा मलेशियासोबत वाद आहे.
-
मंगोलिया – उत्तर आणि दक्षिण कोरियाप्रमाणेच १२७१ ते १३६८ च्या काळात अस्तित्वात असणाऱ्या युआन राजवटीचा संदर्भ देत चीन संपूर्ण मंगोलियाच्या भूभागावर आपला दावा सांगतं. ऐतिहासिक संदर्भ पाहिल्यास चंगेज खानच्या नेतृत्वाखाली मंगोलियानेच संपूर्ण चीनवर ताबा मिळवला होता.
-
एकंदरित सर्व दावे पाहिल्यास चीन पूर्वेकडील अर्ध्याहून अधिक आशिया खंडाच्या भूभागावर दावा सांगत आहे असचं म्हणता येईल.

हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही