शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमधील १५ महत्वाचे मुद्दे; महाराष्ट्र, मुंबईत काय परिणाम?
- 1 / 15
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार असून, दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदमधील महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.
- 2 / 15
बँक संघटनांनी शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे, मात्र बंदमध्ये सहभागी नसणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. बँक कर्मचारी कामाच्या वेळी हातावर काळी पट्टी बांधून निषेध नोंदवणार आहेत. तर बँक सुरु होण्याआधी किंवा नंतर आंदोलन करतील.
- 3 / 15
जवळपास सर्व व्यवसायिक वाहतूक, ट्रक संघटना बंदमध्ये सहभागी होणार असून यामुळे दूध, फळं आणि भाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
- 4 / 15
दिल्लीमध्ये येणाऱ्या तसंच बाहेर जाण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी वाहतुकीसंबंधी सल्ला दिला आहे. प्रवास करणाऱ्यांना भारत बंदचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेश आणि हरियाणा सीमेवर ठाण मांडला असून दिल्लीत प्रवेश करणारे रस्ते जाम केले आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्ग ९, १९, २४, ४४ आणि ४८ वरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
- 5 / 15
‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना दिल्या. कडक सुरक्षाव्यवस्था ठेवा आणि करोना प्रतिबंधक नियमांचे पालन होईल, याकडे लक्ष द्या, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.
- 6 / 15
काँग्रेसचं सरकार असणाऱ्या पंजाबमध्ये पूर्णपणे शटडाउन पाळला जाणार आहे. जवळपास सर्व व्यापारी संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सत्ताधारी पक्ष तसंच अकाली दल आणि आपचे आमदार आपापल्या मतदारसंघात धरणं आंदोलन करणार आहेत.
- 7 / 15
मुंबई आणि दिल्लीतही फळं आणि भाज्यांचा तुटवडा जाणवणार आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे वाशी मार्केट बंद असणार आहे.
- 8 / 15
शेतकरी संघटनांनी जाहीर केलेल्या देशव्यापी बंदला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पाठिंबा दिला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीही यात सहभागी होणार असून माथाडी, व्यापारी शंभर टक्के सहभागी होणार आहेत. राज्यातील सर्वात मोठी समिती ही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या माध्यमातून मुंबई, ठाणे आणि उपनगरात शेतमालाचा पुरवठा केला जातो. या बाजारात भाजीपाला, फळं, कांदा-बटाटा, धान्य आणि मसाला मार्केट हे पाच बाजार आहेत. यातील व्यापारी आणि माथाडी यांनाही नवीन कृषी कायद्यांमुळे मोठा फटका बसणार आहे.
- 9 / 15
टॅक्सी, ऑटो आणि बसेस सुरु असल्या तरी व्यवसायिक ट्रक बंद आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला नसला तरी दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयाचं स्वातंत्र्य आहे. हॉटेल आणि रेस्तराँदेखील सुरु राहणार आहेत.
- 10 / 15
भारत बंदला ओला, उबेर संघटनांनी पाठिंबा जाहीर करत बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन चालकांना केले आहे. मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी ओला, उबेर सेवा बंद राहतील. मात्र बंदमध्ये सामील होण्यासाठी चालकांवर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. ज्यांना इच्छा असेल त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केल्याचे ते म्हणाले.
- 11 / 15
भारत बंद असला तरी मुंबईतील बेस्ट आणि रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. बेस्ट आणि रेल्वे सुरुच राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
- 12 / 15
मुंबई : बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याला सतर्क राहून आंदोलनाच्या निमित्ताने कायदा हाती घेणाऱ्या प्रत्येकाविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त परमबिर सिंग यांनी दिल्या आहेत.
- 13 / 15
पुण्यातील एपीएमसी मार्केट सुरु आहे. स्थानिक व्यापारी सचिन पायगुडे यांनी म्हटलं आहे की, "आमचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. पण आम्ही मार्केट सुरु ठेवलं आहे जेणेकरुन इतर राज्यांमधून येणारा शेतमाल साठवता येईल. उद्याही त्याची विक्री होऊ शकते".
- 14 / 15
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ९ डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन न करण्याचं त्यांनी ठरवलं आहे.
- 15 / 15
‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना दिल्या. कडक सुरक्षाव्यवस्था ठेवा आणि करोना प्रतिबंधक नियमांचे पालन होईल, याकडे लक्ष द्या, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.