
टी-१५ तसेच ‘कॉलरवाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व अकरा वर्षांत २९ बछड्यांना जन्म देऊन ‘सुपर मॉम’ ठरलेल्या १७ वर्षीय वाघिणीचा शनिवारी संध्याकाळी पेंच प्रकल्पातील राखीव वनक्षेत्रात वार्धक्यामुळे मृत्यू झाला.

तिच्या मृत्यूने वन्यप्रेमी हळहळले आहेत.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शक तत्त्वांनुसार मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.

‘कॉलरवाली वाघिण’, ‘पेंचची राणी’ ‘सुपर मॉम’ अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वाघिणीने २००८ ते २०१९ या ११ वर्षांमध्ये २९ बच्छड्यांना जन्म दिला होता. यापैकी २५ बछडे जिवंत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वार्धक्यामुळे अशक्त झालेली ही वाघीण शुक्रवारी, १४ जानेवारीला जंगलात पर्यटकांना शेवटची दिसली.

तज्ज्ञांच्या मते, वाघाचे सरासरी वय सुमारे १२ वर्षे असते.

मार्च २००८ मध्ये या मादीला रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. त्यानंतर रेडिओ कॉलरने काम करणे बंद केले होते.

जानेवारी २०१० मध्ये तिला पुन्हा रेडिओ कॉलर लावले होते.

सप्टेंबर २००५ मध्ये प्रसिद्ध वाघीण टी-७ ने चार बछड्यांना जन्म दिला होता. यापैकी एक म्हणजे ही ‘कॉलरवाली’ वाघीण होय. (Express Photo: Aniruddha Majumdar))

नंतर ही वाघीण ‘कॉलरवाली’ किंवा टी-१५ या नावाने प्रसिद्ध झाली.

या वाघिणीने नंतर मे २००८ मध्ये प्रथम तीन बछड्यांना जन्म दिला होता, पण ते जगू शकले नव्हते.

त्यानंतर २३ ऑक्टोबर २०१० पाच शावकांना (चार मादी आणि एक नर) जन्म दिला होता.

शेवटच्या वेळी या वाघिणीने डिसेंबर २०१८ मध्ये चार बछड्यांना जन्म दिला होता, असे पी.टी.आय.च्या वृत्तात नमूद केले आहे.

तिच्या मृत्यूनंतर वन्यप्रेमींनीही हळहळ व्यक्त केली आहे.(Photos: ANI/Twitter/Indian Express)