
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच अनेक बडे नेते या इफ्तार पार्टीला हजर होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनी येथील छोट्या मुलींना खजूरही खाऊ घातले.

राज्यामध्ये सध्या मशिदीच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच या इफ्तार पार्टीमध्ये पवार काय बोलतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं.

यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाषणं दिली. मात्र शरद पवार यांनी आपल्या भाषणामधून अप्रत्यक्षपणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला.

“राज्यातील जनता ज्याप्रकारे सर्वधर्मसमभाव मानते त्यामध्ये हिंदू असो की मुसलमान, ख्रिश्चन असो या सर्वांनी आपापसातील बंधुभाव टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवे” असं पवार यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल बोलताना म्हटलंय.

“देशाच्या राजधानीत दिल्लीत एक प्रकारचे वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे असले तरी कायदा व सुव्यवस्था केंद्र सरकारकडे आहे. दिल्लीत हल्ले झाले. देशातील वातावरण बिघडवण्याचे काम झाले आहे. आपापसातील बंधुभाव कमी करण्याचे वक्तव्य करणे योग्य नाही. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत आहे,” असं पवार यांनी आपल्या भाषणामध्ये दिल्लीचा संदर्भ देत म्हटलं.

दिल्लीचा संदर्भ दिल्यानंतर पवार यांनी थेट महाराष्ट्रामधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तो हाणून पाडला पाहिजे अशा अर्थाचं वक्तव्य केलं.


राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही या इफ्तार पार्टीला उपस्थित होते.

“काही लोक आपल्या दरम्यान असलेला बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करेल. सर्व लोकांनी शांतता कायम ठेवावी,” असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले.

“मला आनंद आहे की आज इफ्तार पार्टी होत आहे. गेली दोन वर्षे जगात करोनाचे सावट आले होते. त्यामुळे उत्सव साजरा करायला मिळाला नाही. लग्न समारंभही साजरे करायला मिळाले नाही. आज करोना समस्या कमी झाली आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून रोजा इफ्तार स्वीकारला आहे,” असेही शरद पवार म्हणाले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याकडून शांतता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याबद्दल मी आपला आभारी आहे, असं म्हणत शरद पवार यांनी सर्वांना धन्यवाद म्हटलं.

खासदार सुप्रिया सुळेंनीही यावेळेस बोलताना देशातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

“देशात आज जे वातावरण आहे, जे चुकीचे घडत आहे त्याला रोखायला हवे. ‘हम सब एक है’ हा संदेश देत सर्वप्रथम आपण सर्व भारतीय आहोत ही भावना प्रत्येकाने बाळगायला हवी,” असे आवाहन सुप्रिया सुळेंनी केलं. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)