-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात प्रदीर्घ भाषण केलं. यात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले. यात दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती कुणाच्या नावावर इथपासून बापाला विकल्याचा आरोप केला. त्यांच्या भाषणातील २० प्रमुख मुद्द्यांचा हा आढावा.
-
१. मी नतमस्तक झालो कारण राज्याच्या कानाकोपऱ्यातून एवढा मोठा जनसमुदाय आलाय. काही लोक तर रात्रीच आले. पाचची सभा होती, मात्र अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आधीच आले होते – एकनाथ शिंदे
-
२. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली, विचारांना तिलांजली दिली. मग तुम्हाला त्या जागेवर उभा राहण्याचा आणि बोलण्याचा नैतिक अधिकार तरी उरतो का? – एकनाथ शिंदे
-
३. हजारो शिवसैनिकांनी आपला घाम, रक्त, सांडून जो पक्ष उभा केला तो तुम्ही तुमच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी, महत्त्वकांक्षेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण टाकला – एकनाथ शिंदे
-
४. बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला. तुम्ही त्यांच्या तालावर नाचू लागला आणि आम्हालाही नाचवायला लागलात – एकनाथ शिंदे
-
५. बाळासाहेबांनी ज्या पक्षांचा हरामखोर असा उल्लेख केला त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली होती. हे बघून बाळासाहेबांच्या मनालाही वेदना झाल्या असतील – एकनाथ शिंदे
-
६. ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची आहे, ना एकनाथ शिंदेंची आहे. ही शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना आहे. ही तुम्हा तमाम शिवसैनिकांची शिवसेना आहे – एकनाथ शिंदे
-
७. आम्ही सत्तेसाठी लाचारी करून शिवसेनाप्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणारही नाही. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि स्वत्व महत्त्वाचं आहे – एकनाथ शिंदे
-
८. आम्ही गद्दारी केली नाही, तर गदर केलाय. गदर म्हणजे क्रांती. आम्ही गद्दार नाही, तर बाळासाहेबांचा शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले – एकनाथ शिंदे
-
९. आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का? – एकनाथ शिंदे
-
१०. सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? जनतेला समजलं आहे. म्हणून जनता आमच्याबरोबर आहे – एकनाथ शिंदे
-
११. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही जे पाप केलं ते शिवसैनिक कधीही विसरणार नाही. म्हणून महाराष्ट्रातील जनताही तुम्हाला माफ करणार नाही – एकनाथ शिंदे
-
१२. तुम्ही वैचारिक व्यभिचार केला आहे. तुम्ही जे पाप केलंय त्यासाठी आधी बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरील समाधीवर गुडघे टेका आणि माफी मागा, मग आमच्यावर बोला – एकनाथ शिंदे
-
१३. तुमचा कारभार कुणालाही आवडत नव्हता. कोविड कोविड करून तुम्ही सर्वांना घरात बसवलं. दुकानं बंद केली, मंदिरं बंद केली, बाजारपेठा बंद केल्या, पण तुमची दुकानं सुरूच होती – एकनाथ शिंदे
-
१४. तुमची कसली दुकानं सुरू होती हे मी बोलत नाही, पण चालू होती हे मला माहिती होतं. माझ्याशिवाय जास्त कुणाला माहिती असणार आहे – एकनाथ शिंदे
-
१५. या देशाच्या उभारणीत आरएसएसचं मोलाचं योगदान आहे. जेव्हा जेव्हा आपत्ती-संकट येतं तेव्हा आरएसएस पुढे असते. राष्ट्र उभारणीच्या पवित्र कार्यात या संघटनेचा हात कुणीच धरू शकत नाही – एकनाथ शिंदे
-
१६. तुम्ही आरएसएसची आणि पीएफआयची तुलना करता. अरे थोडी तरी काही तरी वाटली पाहिजे. मनाची नाही, तर जनाची तरी वाटली पाहिजे. आरएसएसवर बंदीची मागणी अतिशय हास्यास्पद आणि मुर्खपणाची आहे – एकनाथ शिंदे
-
१७. तुम्ही आम्हाला काय काय म्हणालात. ४० रेडे काय, गटारातील घाण काय, डुक्कर काय, टपरीवाला, रिक्षावाला, पानवाला आणि आणखी बरंच काही म्हटले. असं म्हणणारे आता कोठे आहेत? आपल्यावर बोलल्यावर काय होतं माहिती आहे ना – एकनाथ शिंदे
-
१८. आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर जेव्हा मी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना भेटलो, तेव्हा त्यांनी विचारपूस करण्याऐवजी आनंद दिघेंची संपत्ती कुठे-कुठे आहे? कुणाच्या नावावर आहे? याबाबत विचारलं – एकनाथ शिंदे
-
१९. आनंद दिघे यांचं बँकेत खातंही नव्हतं. मी आजही बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, त्यांनी हे विचारल्यानंतर मला धक्काच बसला, मी कधीही खोटं बोलत नाही, खोटं बोलून सहानुभूती मिळवणारा हा एकनाथ शिंदे नाही – एकनाथ शिंदे
-
२०. ज्या काळात दिघेसाहेबांची लोकप्रियता वाढत होती. त्या काळात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नाही, व्हायचं नाही, असं म्हणत होते, पण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यामुळे पक्षात जे-जे कार्यकर्ते मोठे होतात त्यांना कापा, त्यांना आडवे करा, असं काम उद्धव ठाकरेंनी केलं – एकनाथ शिंदे
Photos : आनंद दिघेंची संपत्ती कुणाच्या नावावर ते बापाला विकण्याचा आरोप, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील २० महत्त्वाचे मुद्दे, वाचा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात प्रदीर्घ भाषण केलं. यात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले. त्यांच्या भाषणातील २० प्रमुख मुद्द्यांचा हा आढावा.
Web Title: Important statements of cm eknath shinde in dasara melava speech at bkc ground mumbai pbs