-
“महिलांवर होत असलेले अत्याचार थांबावेत यासाठी आता देशाने जागृत होण्याची वेळ आली आहे. महिलांना कमी लेखण्याची समजण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. आता पुरे झाले,” अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत संतप्त भावना व्यक्त केली.
-
बदलापूरच्या घटनेबाबत भाष्य करताना शिशूवर्गातील मुलींनाही लक्ष्य केले जात असल्याबद्दल राष्ट्रपतींनी खेद व्यक्त केला.
-
‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेसाठी ‘महिला अत्याचार : आता पुरे झाले’ या मथळ्याखाली लिहिलेल्या विशेष लेखात कोलकात्यामधील घटनेवर राष्ट्रपतींनी प्रथमच भाष्य केले.
-
या घटनेमुळे आपल्याप्रमाणेच संपूर्ण देशाने उद्विग्न होण्याची गरज असल्याचे त्यांनी लिहिले आहे.
-
“महिलांना अबला, अकार्यक्षम आणि कमी हुशार समजणारे लोक नंतर एक पाऊल पुढे जातात आणि त्यांना स्त्री म्हणजे एक वस्तू वाटू लागते. आपल्या मुलींनी भयमुक्त वातावरणात पुढे जावे, असे वाटत असेल तर त्यातील हे अडथळे आपण दूर केले पाहिजेत,” असे आवाहन राष्ट्रपतींनी केले आहे.
-
“कोलकात्यातील घटना ही महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या मालिकेतील एक आहे. कोणत्याही सुसंस्कृत समाजामध्ये आपल्या मुली आणि भगिनींवर असे अत्याचार खपवून घेतले जाऊ शकत नाहीत,” अशा शब्दांत मुर्मू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
“एकीकडे कोलकात्यामध्ये विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करीत असताना अन्यत्र असे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. पीडितांमध्ये बालवाडीतील मुलींदेखील आहेत,” असे सांगत राष्ट्रपतींनी बदलापूरच्या घटनेचा नाव न घेता ओझरता उल्लेख केला.
-
राखीपौर्णिमेला भेटायला आलेल्या विद्यार्थिनींनी ‘निर्भया (दिल्लीतील डिसेंबर २०१२मधील घटना) बलात्कारासारख्या घटना पुन्हा होणार नाहीत ना?’ असा निरागस प्रश्न विचारल्याची आठवण राष्ट्रपतींनी आपल्या लेखात सांगितली आहे.
-
त्या घटनेनंतर संतापलेल्या देशाने योजना बनविल्या, धोरणे आखली आणि बदल घडविण्यास सुरुवात केली. मात्र पुढल्या १२ वर्षांत तशाच प्रकारच्या असंख्य घटना घडल्या. आपण यावरून काही धडा शिकलोच नाही का, असा संतप्त सवाल राष्ट्रपतींनी केला.
-
“आता केवळ इतिहासाचा सामना करण्याची नव्हे, तर अंतर्मुख होऊन महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर जालीम उपाय शोधण्याची गरज आहे. सर्वसमावेशक पद्धतीने मुळापासून महिला अत्याचार रोखण्यासाठी आपण काम केले पाहिजे,” असे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मांडले आहे. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

२८ मार्च राशिभविष्य: शुक्ल योगात १२ राशींचा दिवस कसा जाणार? कोणाला करावे लागेल कामाचे योग्य नियोजन, तर कोणाला पाहावी लागेल योग्य संधीची वाट