-
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Passes Away in Baramati Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आहे. बारामती येथे विमान लँडिंग होत असताना विमानाचा अपघात झाला.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “अजित पवार हे जनतेचे नेते होते, त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती.”
-
“आज, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे ज्येष्ठ एनडीए सहकारी अजित पवार यांचे एका दुःखद अपघातात निधन झाल्याच्या बातमीने माझे मन खूप दुःखी झाले आहे. गेल्या साडेतीन दशकांपासून अजित पवार यांनी महाराष्ट्रातील समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी ज्या पद्धतीने स्वतःला समर्पित केले ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा ते महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणाशी संबंधित असंख्य मुद्द्यांवर दीर्घ चर्चा करत असत. त्यांचे निधन हे केवळ एनडीए कुटुंबाचेच नाही तर माझ्यासाठीही एक वैयक्तिक नुकसान आहे. मी पवार कुटुंबाप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या वेळी, संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे. देव त्यांच्या दिव्य चरणी स्थान देवो. ओम शांती शांती शांती” असे गृहमंत्री, अमित शाह म्हणाले.
-
“अतिशय दुःखद घटना घडली आहे. अनाकलीनय परिस्थितीत विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. खरं म्हणजे अजित पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्या बद्दल जनसामान्यांत प्रचंड मोठी आस्था होती. अजित दादा संघर्षशील अशाप्रकारचे नेतृत्व होतं. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं अशाप्रकारचं व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे. कारण, अशा प्रकारचा नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते. अशा काळात त्यांचं निघून जाणं, हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारं आहे” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
“मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे. डोंगरा एवढं दुख आहे. महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे. या विमान अपघाताची विमान चौकशी करणार आहोत. आमच्या सहकाऱ्याचा जीव गेला आहे. त्यामुळे नक्कीच विमान अपघाताची चौकशी होणार. असे अपघात पुन्हा होता कामा नये म्हणून चौकशी करणार” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
-
“त्यांच्यासोबत जे क्षण मिळाले, त्यांच्यासारखा पारदर्शी नेता पाहिला नाही. त्यांनी नाही म्हटलं की ते काम नाहीच होणार आणि होणार म्हटलं की ते काम होणारच. बारामती क्षेत्रात शरद पवारांच्या आशीर्वादाने त्यांचं खूप मोठं योगदान होतं” असे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार, अरविंद सावंत म्हणाले.
-
मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर. प्रतिक्रिया देताना झाले भावूक. “ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केलं, ते दादा आम्हाला सोडून गेले” असे हसन मुश्रीफ म्हणाले.
-
“अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल. त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहतोय. दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावरची पकड. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील”, असं शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले.
-
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली वाहताना खासदार प्रणिती शिंदे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अजित दादांनी आऊट ऑफ द बॉक्स विचार करून निधी उपलब्ध करून दिल्याच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. असे नेतृत्व पुन्हा होणे नाही, असे म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली.
-
भाजप नेते, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. ही पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.”
-
“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आज विमान अपघातात झालेल्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायक आहे. या दुःखाच्या प्रसंगी मी महाराष्ट्रातील जनतेसोबत आहे. या कठीण काळात संपूर्ण पवार कुटुंब आणि त्यांच्या प्रियजनांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो.” असे काँग्रेस खासदार, राहुल गांधी म्हणाले.
-
मनसे नेते बाळा नांदगांवकर म्हणाले, “बोले तैसा चाले… सत्तेत असो की विरोधात जे पोटात तेच ओठावर असणारे अजित दादा पवार यांच्या अशा आपल्यातून निघून जाण्याची बातमी सकाळी पाहिली आणि स्तब्ध झालो. त्यांचे माझे वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध हे ३ दशकांहून अधिकचे आहेत. प्रशासनावर पकड ठेऊन काम होणार असेल तर नक्की करणारे आणि नसेल होणार तर बघू, सांगतो असे राजकीय टिपण्णी न करता सरळ नाही बोलणारे दादा मी जवळून पाहिले आहेत. एवढे वर्षे जनतेतून निवडून येऊन जनतेला अपेक्षित आर्थिक शिस्तीचा, विकासाभिमुख राज्यकर्ता कसा असावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अजित दादा. राज्याची आर्थिक घडी चांगली रहावी, विकास व्हावा, गरजू लोकांची कामे व्हायला च हवी यासाठी सकाळी ६ पासून ग्राउंड वर उतरून काम करणारा एकमेव लोकनेता म्हणून ते परिचित होते. २० वर्षे विधिमंडळात एकत्र असताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. वैयक्तिक जीवनात आत्ताच मुलाचे लग्न झाल्याने आनंदाचे जीवन आले असताना नियतीने हा क्रूर आघात त्यांच्या परिवारावर केला. उगाच गोड बोलून कोणाचाही केसाने गळा कापणे हे त्यांना कधीच जमले नाही. त्यांचा स्पष्टवक्ता असणे हीच त्यांची ओळख झाली होती. आज त्यांच्या जाण्याने केवळ बारामती नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. दादा बोलताना परखड जरी असले तरी कार्यकर्त्यांना न्याय देणारे होते. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठे नेते ही केले. कार्यकर्त्यांचे लोकांचे मोहोळ त्यांच्या मागे असण्याचे कारण म्हणजे.. बोले तैसा चाले हा त्यांचा स्वभाव. दादा ना आपल्या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.”
-
“हा अतिशय मोठा धक्का मला आणि महाराष्ट्रातील सर्व तरुण राजकारणी मंडळींना आहे. अनेक जण त्यांचा आदर्श घेऊन राजकारणात कार्यरत आहेत. विशेषतः कोल्हापूरशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. अनेक वेळा भेट झाल्यानंतर ते कोल्हापूरच्या आठवणी आवर्जून सांगायचे. अशा नेत्याला राज्याने गमावल्यामुळे सर्वच पक्षांतील नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. हे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे”, संजय मंडलिक यांची प्रतिक्रिया.
-
“पवार कुटुंब आणि त्यांच्या समर्थकांसाठी माझ्या सहसेवदना आहे. मी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नीशी बोलले आहे” असे काँग्रेस खासदार, प्रियांका गांधी म्हणाल्या.
-
दरम्यान, राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. कुटुंबीयांशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
काकूंचा काटा किर्रर्र डान्स…. ‘अधिर मन झाले’ गाण्यावरील जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक