-
टँकर अपघातामुळे पुणे-मुंबई महामार्गावर तब्बल तीस तासांपेक्षा जास्त काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. हा अपघात मंगळवारी (३ फेब्रुवारी) रोजी आडोशी घाटाजवळ झाला होता. आता त्या वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर धोकादायक पध्दतीने वाहन चालविणे, इतरांच्या जिवितास आणि सुरक्षेस धोका निर्माण होईल अशी कृती करणे, असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.
-
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा दोन मोठ्या शहरांना जोडतो. त्यामुळे या मार्गावर रोजची हजारो वाहने वाहतूक करतात. यातील काही वाहनांनी चुका केल्या तर त्याचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो. या मार्गावर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रात वेगळी मर्यादा असून उर्वरित सखल भागात वेगळी मर्यादा आहे. मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी या वाहतूक वेग मर्यादेचे पालन करणे अनिवार्य आहे.
-
कोणत्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात?
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई लेनवरील किलोमीटर ३६ ते किलोमीटर ४० यादरम्यान वाहनांचा वेग जास्त वाढतो. जी जड वाहने आहेत ती नियंत्रणाच्या बाहेर जातात. त्यामुळे या चार किलोमीटरच्या पट्ट्यात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी महामार्ग पोलिसांची आयटीएमएस प्रणाली आणि इंटरसेप्टर व्हेईकल वेग मर्यादा तोडल्याची कारवाई करत असते. याठिकाणी जड वाहनांचा वेग ४० किमी प्रतितास आणि हलक्या वाहनांसाठी (लाईट व्हेईकल) ६० किमी प्रतितास आहे आहे. या भागात जर वेगमर्यादा मोडून ओव्हरटेक केले तर त्या वाहनांवर कारवाई होते.
-
घाटातील वेगाची मर्यादा
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर घाट परिसरात जड वाहनांसाठी ४० किलोमीटर प्रतितास तर हलक्या वाहनांसाठी ६० किमी प्रतितास अशी वेगमर्यादा आहे. बऱ्याचदा या भागात वाहनचालक वेगाची मर्यादा पाळत नाहीत त्यामुळे अपघात जास्त होतात आणि वाहतूकीची कोंडी होते.
-
सखल भागातील वेगाची मर्यादा
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सखल भागात जड आणि लाईट व्हेईकलसाठी वेगमर्यादा १०० आहे. जर ही वेगमर्यादा मोडली तर त्या वाहनांवर कारवाई होती. वेगमर्यादा मोडल्यानंतरचे गाडीचे फोटो आणि चलन संबंधित चालकाला पाठविण्यात येते.
-
महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून ‘रस्ता सुरक्षा अभियान’ घेतले जातात. यामध्ये चालकांना वाहतुकीचे नियम आणि सूचना दिल्या जातात.