-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानतर या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
-
हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यात ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्याचा विचार दिला, त्याच धर्तीवर टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. त्यामुळे शौर्याच्या दृष्टीने त्यांना समकक्ष पाहिले पाहिजे’, असे म्हटले होते. यानंतर वाद पेटल्याचे पाहायाला मिळाले.
-
सपकाळ यांच्या विधानानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस भवनाच्या बाहेर आंदोलन करत घोषणाबाजी केली. या आंदोलनावेळी दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या सर्व गदारोळाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
-
हर्षवर्धन सपकाळ यांनी या विधानाबाबत भूमिका स्पष्ट करताना मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले असल्याचे म्हटले आहे. “शिवप्रेमी बंधू-भगिनींनो, सप्रेम नमस्कार, सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही, तर ऐक्याचा संदेश जावा, या आशयाचे माझे ७० सेकंदांचे वक्तव्य होते. दुर्दैवाने, त्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला. त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला हे आपण पुण्यात पाहिले आहे,” असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.
-
“मी पुन्हा एकदा स्पष्ट आणि ठामपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही, मी केलेली नाही. टिपू सुलतानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजाविरूद्ध लढा दिल्याचे मी म्हटले होते. त्यांच्या योगदानाची दखल घेत थेट भारताच्या संविधानामध्ये देखील त्यांची तसबीर आहे त्यांच्या प्रतिमेच्या संदर्भात समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये,जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये, हीच भूमिका मी मांडली होती,” असेही सपकाळ म्हणाले.
-
तसेच पोस्टमध्ये पुढे सपकाळ यांनी भाजपाचा निषेध करत शिवप्रेमींची माफी मागितली आहे. ते म्हणाले की, “प्रकरणी भाजपाचा तीव्र शब्दात निषेध करतो त्यांच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्या बद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता.”
-
“शिवजयंती दोन दिवसांवर आली आहे, आपण सर्वांनी गैरसमज दूर ठेवूया, अपप्रचाराला बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वराज्य, सहिष्णुता आणि लोककल्याणाचा मार्ग स्वीकारून परस्पर आदर, ऐक्य आणि समन्वयाने महाराष्ट्र घडवूया ही नम्र विनंती. आणी पुढे भाजपाच्या विखारी, खोडसाळ अपप्रचाराविरुद्ध लढत राहू भाजपच्या विकृतीला व ट्रेड-दिल व जेफ़री एपस्टीन घोटाळा चव्हाट्यावर आणत राहू!” असेही सपकाळ त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. याबरोबरच सपकाळ यांनी संत तुकाराम महाराज यांचा अभंग देखील पोस्ट केला आहे.
३ वाजून २६ मिनिटांनी सूर्यग्रहण; १२ राशींवर कसा होईल परिणाम? काय करावे आणि काय टाळावे?
