-
अजित पवारांच्या विमान अपघातामागे घातपात होता का? याचा तपास करण्याची मागणी रोहित पवार सातत्याने करत आहेत. यासाठी त्यांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत धाव घेतली. पत्रकार परिषदा घेतल्या. तसेच आता त्यांनी या प्रकरणाचा फौजदारी तपास होण्याची मागणी केली आहे.
-
२५ फेब्रुवारी रोजी रोहित पवारांनी मुंबईत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला नाही. त्यानंतर त्यांनी आज (२६ फेब्रुवारी) बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला.
-
रोहित पवार म्हणाले, आम्ही कायद्याचा अभ्यास करून ही मागणी करत आहोत, तरी पोलीस प्रशासन आमचे ऐकत नाही, हा अजित पवारांवर अन्याय आहे. अजितदादा अनेक मोठ्या लोकांचे मित्र होते, त्या मित्रांनी तरी यात लक्ष घालून FIR दाखल करून घेण्याची मागणी करायला हवी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
-
जर अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याबरोबर हे होत असेल तर उद्या सामान्य व्यक्तीला किंवा आमच्यासारख्या आमदाराला काही झाले तर कोण लक्ष देणार? असाही प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.
-
रोहित पवार पुढे म्हणाले की, पुण्यातील उरळी कांचण येथील गावात १६० कबुतरे चोरीला गेले म्हणून FIR दाखल झाला. पण अजित पवारांच्या बाबत गुन्हा दाखल होत नाही, हा कोणता न्याय आहे?
-
डीजीसीएने २४ फेब्रुवारीच्या अहवालात व्हीएसआर कंपनीचे दोष दाखविले गेले. तसेच व्हीएसआर कंपनीचे पाच विमान ग्राऊंड करण्यात आले. जर ही विमाने ग्राऊंड करण्यात आली असतील तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सदोष विमान चुकून दिले की, जाणूनबुजून दिले? याचा तपास करणे आवश्यक असल्याचे रोहित पवार म्हणाले.
-
आम्ही मागणी करत असलेला एफआयआर हा व्हीएसआर कंपनीविरोधात आहे. तसेच विमानाच्या उड्डाणाला परवानगी ज्या यंत्रणेने दिली, त्या डीजीसीएच्या अधिकाऱ्यांविरोधात आम्ही तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे रोहित पवार बारामती येथील पत्रकार परिषदेत म्हणाले.
-
रोहित पवार पुढे म्हणाले की, व्हीएसआर कंपनीकडे एकूण सात विमाने होती. त्यापैकी एका विमानाचा अपघात २०२३ साली झाला होता. तर २८ जानेवारी रोजी अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाची दुर्घटना घडली. आता व्हीएसआर कंपनीची उरलेली पाच विमाने ग्राऊंड करण्यात आली आहेत. याचा अर्थ व्हीएसआर कंपनीची विमाने सदोष आहेत. जर व्हीएसआर कंपनीची विमाने खराब होती, तर ते विमान अजित पवारांना का दिले? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.
-
ॲरो नावाच्या कंपनीने २८ जानेवारी रोजी सकाळी विमान उड्डाणासाठी हवामान चांगले असल्याचा शेरा दिला. एका खासगी व्हॉट्सग्रुपमध्ये विमान उड्डाणासाठी हिरवा कंदील दाखवला गेला होता. त्यामुळेच अजित पवारांनी त्यादिवशी विमान प्रवासाचा निर्णय घेतला होता. यामध्ये आम्ही कोणाचेही नाव घेतले नव्हते, असेही रोहित पवार म्हणाले.
-
व्हीएसआर कंपनीच्या मालकाचे अनेक नेत्यांशी संबंध आहेत. कंपनीचे संचालक रोहित सिंग याच्या लग्नासाठी महाराष्ट्रातील फार मोठा नेता गेला होता. आंध्रचे मुख्यमंत्रीही त्याच्या लग्नाला गेले होते. अजित पवारांचे दुर्घटनाग्रस्त लेयरजेट हे विमान सदोष होते, हे आता डीजीसीएकडून सांगितले जात आहे. मग हे विमान अजित पवारांना चुकून दिले की, जाणूनबुजून दिले गेले? हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. यात कोणत्यातरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे, असा संशय रोहित पवार यांनी उपस्थित केला.
-
AAIB ही संस्था विमान अपघाताचा तपास करत असली गुन्हेगारी पैलू पाहत नाही तर तांत्रिक बाजूने तपास करत असते. डीजीसीए देखील भविष्यात पुन्हा असे अपघात होऊ नयेत, याची दक्षता घेण्यासाठी तांत्रिक बाबींचा तपास करते. पण डीजीसीएचे अधिकारीच या अपघातासाठी जबाबदार असल्याचा आमचा आरोप आहे. त्यामुळे डीजीसीएलाच तपासाचे सर्व अधिकार दिले तर त्यांच्याकडून प्रामाणिक तपास होणार आहे का? असाही प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…