-
पुण्यातील नवले पूल परिसरात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. शनिवारी मध्यरात्री जांभुळवाडी दरी पुलावर आणखी एक गंभीर अपघात घडल्याने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
रात्री सुमारे पावणे बाराच्या सुमारास तीन ते चार वाहनांची एकमेकांवर जोरदार धडक झाली. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
-
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
रात्रीची वेळ असल्याने आणि रस्त्यावर वाहतूक तुलनेने कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
-
अपघातानंतर काही काळासाठी रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहनांच्या धडकेमुळे काचांचे तुकडे आणि वाहनांचे अवशेष रस्त्यावर विखुरले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
-
अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून रस्ता मोकळा करण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
-
दरम्यान, कात्रज-नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
-
विशेषतः वेगमर्यादा नियंत्रण, अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, चेतावणी फलक आणि रस्त्यांच्या दुरुस्तीची गरज अधोरेखित केली जात आहे.
-
सतत होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पावले उचलून हा ‘ब्लॅक स्पॉट’ सुरक्षित करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे मत आहे.
४ वर्षे अमेरिकेत राहिल्यावर मृणाल दुसानिस कुटुंबासह भारतात का परतली? म्हणाली, “आम्ही मायदेशी आलो कारण…”