-
लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने मुंबईतील वरळी डोम येथे ‘जन आक्रोश महिला पदयात्रा’ आयोजित केली होती.
-
मात्र, या आंदोलनामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांनाच खडेबोल सुनावले.
-
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
-
भाजपच्या या मोर्चामुळे वरळी आणि परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
-
तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे एका महिलेचा संयम सुटला. तिने थेट मोर्चाच्या ठिकाणी धाव घेत मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला.
-
“विरोध करायचा असेल तर मैदानात करा, सामान्य लोकांना ट्रॅफिकमध्ये का अडकवता?” असा सवाल करत तिने आपला संताप व्यक्त केला.
-
यावेळी पोलीस आणि महिला आंदोलकांमध्येही शाब्दिक चकमक उडाली.
-
या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “केवळ ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ला खूष करण्यासाठी लोकांना तीन-तीन तास वेठीस धरणे चुकीचे आहे. आंदोलनाचे कारण खोटे असेल तर लोक अशीच फजिती करतात,” असे ट्विट पवारांनी केले आहे. तसेच, संबंधित महिलेवर कारवाई न करता सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “महिला आरक्षणाच्या नावाखाली खोटे नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा या धाडसी भगिनीने उघडा पाडला आहे. येणाऱ्या काळात देशातील महिला भाजपला सत्तेतून हाकलल्याशिवाय राहणार नाहीत.”
-
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उपरोधिक टोला लगावत म्हटले की, “हे राम! नारी शक्ती वंदना! मोदीजींनी ठीक म्हटले होते, महिला माफ करणार नाहीत!”
-
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्या महिलेचे समर्थन केले आहे. “त्या भगिनीला आपल्या मुलाला पिकअप करायला जायचे होते. असे कित्येक नागरिक अडकले होते. पोलिसांनी नेत्यांच्या पुढे-पुढे करण्यापेक्षा नागरिकांना उत्तरे दिली पाहिजेत. यापुढे मुंबईकर हे ‘नॉनसेन्स’ खपवून घेणार नाहीत,” अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
१ नंबर! विद्यार्थ्यांसह शिक्षिकेने धरला ठेका, ‘मुकाबला’वर केला जबरदस्त डान्स; पाहा VIDEO