-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या परदेशातील रिअल इस्टेट परवाना व्यवसायातून २०२५ मध्ये ५९.५ दशलक्ष डॉलर्सची कमाई झाली आहे. आखाती देशांमधील विकासकांनी आलिशान मालमत्ता, गोल्फ कोर्सेस आणि रिसॉर्ट्ससाठी ‘ट्रम्प’ हे नाव वापरण्याकरिता मोठी रक्कम मोजल्यामुळे या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.
-
परदेशातील परवाना व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नात २०२४ च्या तुलनेत ७१ टक्क्यांनी वाढ झाली आणि ही रक्कम २०२३ मधील उत्पन्नाच्या जवळपास १० पट होती. सीएनबीसीच्या वृत्तानुसार, या परवाना उत्पन्नापैकी ६० टक्क्यांहून अधिक वाटा आखाती देशांमधील प्रकल्पांतून आला आहे. ज्यामुळे आखात ट्रम्प यांच्या परदेशातील रिअल इस्टेट कमाईचा एक प्रमुख स्रोत बनला आहे.
-
२०२५ मध्ये, संयुक्त अरब अमिरातीशी संबंधित प्रकल्पांमधून ट्रम्प यांना परवाना शुल्काच्या स्वरूपात सुमारे २२ दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर सौदी अरेबियाचा वाटा सुमारे ९ दशलक्ष डॉलर्स होता, तर कतारने सुमारे ५ दशलक्ष डॉलर्सचे योगदान दिले.
-
यातील मोठा हिस्सा सौदीशी संबंधित ‘दार अल अरकान’ आणि त्यांची दुबईस्थित आंतरराष्ट्रीय शाखा ‘दार ग्लोबल’ तसेच संयुक्त अरब अमिरातीस्थित ‘डमॅक’ या विकासकांमार्फत आला आहे. ट्रम्प यांनी ‘दार अल अरकान’ आणि ‘दार ग्लोबल’ यांच्याशी संबंधित प्रकल्पांमधून २५.८ दशलक्ष डॉलर्स मिळाल्याचे जाहीर केले आहे. तर ‘डमॅक’शी संबंधित प्रकल्पांमधून आणखी ११.३ दशलक्ष डॉलर्स मिळाले.
-
परदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नातील वाढीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण ट्रम्प हे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष असण्यासोबतच, परदेशातील विकासकांशी संबंधित असलेल्या एका खाजगी व्यवसायाचे लाभार्थीही आहेत.
-
परवाना मॉडेलअंतर्गत, स्थानिक विकासक साधारणपणे मालमत्तांसाठी वित्तपुरवठा व बांधकाम करतात, तर ‘ट्रम्प ऑर्गनायझेशन ला ‘ट्रम्प’ ब्रँड वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल मोबदला मिळतो. काही प्रकल्पांमध्ये कंपनी व्यवस्थापन सेवाही पुरवते.
-
परवाना शुल्काच्या कोणत्याही देयकामुळे प्रशासनाच्या निर्णयावर प्रभाव पडल्याचा, एखाद्या विकासकाला विशेष वागणूक मिळाल्याचा किंवा ट्रम्प यांनी एखाद्या कंपनीच्या वतीने वैयक्तिकरित्या हस्तक्षेप केल्याचा कोणताही पुरावा सीएनबीसीला आढळला नाही.
-
तरीही, नैतिकतेबाबतच्या तज्ज्ञांच्या मते, या व्यावसायिक संबंधांमुळे ‘हितसंबंधांचा संघर्ष’ निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्याबाबत प्रश्न उपस्थित होतात.
-
ही बाब विशेषत आखाती प्रदेशात महत्त्वपूर्ण आहे, जिथे खाजगी विकासकांचे सरकार, सार्वभौम निधी आणि सरकारी नियंत्रणाखालील कंपन्यांशी जवळचे संबंध असू शकतात.
“नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले…”, अदिती सारंगधरने सांगितली भावुक आठवण; म्हणाली, “इतकं समाधान…”