-
वर्ष २०२६ च्या सुरुवातीपासून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या किमतींमधील अंतर वेगाने वाढत आहे. जागतिक स्तरावर सोन्याचे दर स्थिर असतानाही, भारतात सोन्याने मोठी उसळी घेतली असून दोन्ही बाजारपेठांमधील हा फरक आता तब्बल १८ टक्क्यांवर गेला आहे.
-
१ जानेवारी २०२६ रोजी भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३२,६१४ रुपये इतका होता, जो २७ मे २०२६ पर्यंत थेट १,५६,२२९ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच चालू वर्षात भारतात सोने २३,६१५ रुपयांनी महागले आहे. याउलट, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर ४,३१९ डॉलर वरून ४,३८८ डॉलरवर गेला असून तिथे अवघी १.६% वाढ झाली आहे.
-
भारतीय बाजारात सोने महाग होण्याचे पहिले मोठे कारण म्हणजे सरकारने आयात शुल्कात केलेली वाढ. आयात बिल कमी करण्यासाठी सरकारने आयात शुल्क ६% वरून थेट १५% केले आहे. या ९ टक्क्यांच्या वाढीमुळे आयातदारांचा खर्च वाढला असून तो ग्राहकांवर लादला गेला आहे.
-
६ मे ते १२ मे दरम्यान भारतात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १.५ लाख रुपयांच्या आसपास होते. मात्र, १३ मे रोजी आयात शुल्क वाढीची घोषणा होताच, १४ मे रोजी सोन्याच्या दराने प्रति १० ग्रॅम १.६ लाख रुपयांचा नवा उच्चांक गाठला. तेव्हापासून हे दर १.५६ लाख रुपयांच्या आसपास स्थिर आहेत.
-
सोनं महागण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे झालेले अवमूल्यन. २०२६ मध्ये आतापर्यंत रुपया डॉलरच्या तुलनेत जवळपास ७% घसरला आहे. जागतिक बाजारात सोन्याचे व्यवहार डॉलरमध्ये होत असल्याने, रुपया कमकुवत झाल्यावर आंतरराष्ट्रीय किमती स्थिर असल्या तरी भारतीयांना सोन्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात.
-
भारतातील सोन्याचे दर हे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांवर आधारित असतात. या जागतिक दरांमध्ये भारताचे आयात शुल्क आणि रुपया-डॉलरमधील चढ-उतार जोडले जातात, ज्यावरून सोन्याची अंतिम किंमत ठरवली जाते.
-
एकीकडे सोन्याचे दर चढे असले, तरी सध्या भारतीय बाजारात एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, सध्या स्थानिक बाजारात सोन्याच्या दरात मोठी सवलत मिळत आहे. आयात शुल्क वाढीपूर्वी सराफा व्यापाऱ्यांनी कमी शुल्कात आणलेला जुना साठा बाजारात काढल्यामुळे हा डिस्काउंट मिळत आहे.
-
आयात शुल्क वाढीनंतर सोन्याचे भाव वाढताच गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी नफा कमावण्यासाठी प्रत्यक्ष सोने विकायला सुरुवात केली. यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा अचानक वाढला. आयात शुल्क वाढीपूर्वी सोन्यावरील डिस्काउंट प्रति औंस सरासरी १४ डॉलर होता, तो आता थेट १५० डॉलर प्रति औंसपर्यंत वाढला आहे.
-
सध्या सोन्याचे दर जास्त असल्याने आणि मे महिन्याच्या मध्यापासून ते जूनच्या मध्यापर्यंतचा काळ सोने खरेदीसाठी शुभ मानला जात नसल्याने बाजारात शांतता आहे. उन्हाळ्यातील लग्नसराईची खरेदी पूर्ण झाल्यामुळे दागिन्यांची मागणी घटली आहे. बाजारातील ही घटलेली मागणी आणि वाढलेला पुरवठा यांमुळे सोन्यावर डिस्काउंट मिळत असला, तरी १५% आयात शुल्क आणि कमकुवत रुपयामुळे सोन्यातील ही वाढ दीर्घकालीन स्वरूपाची असणार आहे.
Raghuram Rajan: “रघुराम राजन आता निराशावादी झालेत”; भारताच्या GDP आकडेवारीवरील टीकेला मुख्य आर्थिक सल्लागारांचे प्रत्युत्तर