
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिची आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्मृतीला दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये तिला हा पुरस्कार मिळाला होता.
पुरुष गटात यावर्षी कोणत्याही भारतीय खेळाडूला कोणत्याही प्रकारात पुरस्कार जिंकता आला नाही. भारताच्या एकाही खेळाडूला आयसीसीच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थानही मिळवता आले नाही.
स्मृतीने गेल्या वर्षी २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३८.८६च्या सरासरीने ८५५ धावा केल्या होत्या. गेल्या वर्षीही तिने एक शतक आणि ५ अर्धशतके झळकावली होती.
गेले वर्ष भारतीय संघासाठी चांगले गेले नव्हते, पण स्मृतीची बॅट तळपत होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताने घरच्या मैदानावर ८ पैकी फक्त दोनच सामने जिंकले. या दोन्ही सामन्यात संघाच्या विजयात स्मृतीने महत्त्वाची भूमिका बजावली.
२०२१ या वर्षात तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खोऱ्याने धावा केल्या. यासोबत महिला टी-२० लीग्समध्येदेखील तिने आपल्या बॅटची जादू दाखवली.
वुमन्स बिग बॅश लीग असो अथवा द हंड्रेड ही क्रिकेट लीग असो, स्मृती मानधनाने सर्वत्र अक्षरशः धुमाकूळ घातला. याचं श्रेय म्हणून तिचा ICC Women’s Cricketer 2021 पुस्काराने गौरव केला जाणार आहे.
स्मृती मानधनाने २०२१ मध्ये मोठी कामगिरी केली आहे. तिने या वर्षी २ कसोटीत ६१ च्या सरासरीने २४४ धावा केल्या आणि डे-नाइट कसोटीत शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली.
स्मृतीने यावर्षी ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५.२०च्या सरासरीने ३५२ धावा केल्या आहेत. तिचा स्ट्राइक रेट ८५ पेक्षा जास्त होता. यावर्षी तिने २ अर्धशतके झळकावली. T-२० मध्ये, मानधनाने ९ डावांमध्ये ३१ च्या सरासरीने २५५ धावा केल्या ज्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे.
स्मृतीने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ६२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ शतकं आणि १९ अर्धशतकांच्या मदतीने २३७७ धावा फटकावल्या आहेत. तर ८४ टी-२० सामन्यांच्या ८२ डावात तिने १९७१ धावा लगावल्या आहेत. यात तिने १४ अर्धशतकं झळकावली आहेत. चार कसोटीत तिच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतकं आहेत.
स्मृती मानधनाव्यतिरिक्त आयसीसी वुमन्स क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कारासाठी आयसीसीने टॅमी ब्यूमॉन्ट, लिजिली ली आणि गॅबी लुईस या तिघींना नामांकन दिलं होतं.(सर्व फोटोंचे सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)