
आयपीएलच्या १५व्या हंगामातील गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संंघामध्ये झालेला क्वॉलिफायर-१ चा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला.
अखेरच्या षटकापंर्यंत चाललेल्या या सामन्यात गुणतालिकेत पहिल्या स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सने राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
या विजयासह घौडदौड कायम ठेवत पांड्या पलटनचा रथ आयपीएल फायनलमध्ये दिमाखात पोहोचला आहे.
गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
राजस्थानने गुजरातसमोर विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
पहिल्याच षटकात एकही धाव न करता सलामीवर वृद्धीमान साहा झेलबाद झाल्यामुळे गुजरातपुढे मोठं आव्हान होतं.
फलंदाज शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड या जोडीने ७२ धावांची भागिदारी केल्यामुळे गुजरातचा डाव सावरला.
परंतु, नंतर संघाच्या ७२ धावा झालेल्या असताना शुभमन गिल आणि ८५ धावा झालेल्या असताना मॅथ्यू वेडची देखील विकेट पडली.
त्यामुळे गुजरात संघासाठी १८९ धावांचे लक्ष्य गाठणं जिकरीचे झाले होते.
त्यानंतर मात्र हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर या जोडीने सावध पवित्रा घेत फलंदाजी केली.
दोघांनीही अनुक्रमे नाबाद ५० आणि ५६ धावा केल्या. डेव्हिड मिलरची खेळी गुजरातसाठी संजिवनी ठरली.
संघ दबावामध्ये असताना त्याने ३६ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि तीन षटकार लगावत ५६ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली.
ज्यामुळे गुजरातला विजयापर्यंत पोहोचता आलं.
कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत यशस्वी कामगिरी करत गुणतालिकेतील पहिले स्थान पक्के करत फायनलमध्ये धडक दिली आहे.
आयपीएलच्या १५व्या हंगामातील फायनलमध्ये पोहोचणारा गुजरात टायटन्स पहिला संघ ठरला आहे.
फायनलमध्ये पोहोचल्यानंतर गुजरात टायटन्स संघाने लाडका कर्णधार हार्दिक पांड्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
‘पापा पांड्या, खूप सारं प्रेम’ असं कॅप्शन देत गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.
(सर्व फोटो : गुजरात टायटन्स/ इन्स्टाग्राम)