-
२०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारत-न्यूझीलंड दरम्यान होत आहे. या लढतीत कोणत्या खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरेल याबद्दल जाणून घेऊयात…
-
संपूर्ण स्पर्धेत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत १५ च्या सरासरीने १० बळी घेतले आहेत. त्याच्या भेदक यॉर्कर आणि फलंदाजांना अडचणीत टाकणाऱ्या बाउन्सरमुळे तो प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरतो. त्यामुळे रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात बुमराहची गोलंदाजी भारतीय संघासाठी निर्णायक ठरू शकते.
-
न्यूझीलंडचा संघ या स्पर्धेत सुरुवातीला फेव्हरिट मानला जात नव्हता, तरीही कर्णधार मिशेल सँटनरने आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात मोठी भूमिका बजावली आहे. या स्पर्धेत त्याचे नेतृत्व प्रभावी ठरले असून त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे संघाला अनेक सामन्यांत फायदा झाला आहे. सँटनर हा चतुर फिरकी गोलंदाज असून फलंदाजीतही तो संघासाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. त्यामुळे अहमदाबादमधील अंतिम सामन्यात तो ब्लॅक कॅप्ससाठी सामना जिंकणारा खेळाडू ठरू शकतो.
-
भारताचा रहस्यमय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती सध्या १३ बळींसह या स्पर्धेत संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने ६४ धावांत १ बळी अशी या स्पर्धेतील त्याची सर्वात महागडी गोलंदाजी केली होती. तरीही अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल असण्याची शक्यता असल्याने चक्रवर्ती भारतासाठी निर्णायक ठरू शकतो. अंतिम सामन्यात तो भारतासाठी सामना जिंकणारा खेळाडू ठरण्याचीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-
न्यूझीलंडचा आक्रमक सलामीवीर फिन ऍलन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात नाबाद शतक झळकावत संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या दमदार खेळीमुळे न्यूझीलंडला त्या सामन्यात नऊ विकेट्सनी मोठा विजय मिळवता आला. या स्पर्धेत त्याने सात डावांत ५७ च्या सरासरीने २८९ धावा केल्या आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यातही तो भारतीय गोलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरू शकतो.
-
भारतीय सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन याने स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये त्याने नाबाद ९७ धावा केल्या, तर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ८९ धावांची दमदार खेळी साकारली. त्याच्या या दोन्ही खेळींमुळे भारताला त्या सामन्यांत विजय मिळवता आला. सॅमसनने फक्त चार डावांत ७७ च्या सरासरीने आणि २०१ च्या स्ट्राईक रेटने २३२ धावा केल्या आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यातही तो मोठी धावसंख्या उभारेल, अशी भारताला आशा असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, “सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आपण पूर्ण विश्रांती घ्या”