सहेला रे…
- 1 / 13
‘सहेला रे आ मिल जाए..’ अशा शब्दांत जणू शुद्ध सुरांचीच आयुष्यभर आळवणी करणाऱ्या, त्याच्याशी एकरूप होण्याची आस बाळगणाऱ्या, त्याच्याशी अविचल-अढळ निष्ठा राखणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचे सोमवारी रात्री मुंबईत देहावसान झाले.
- 2 / 13
गेले काही दिवस किशोरीताईंच्या प्रकृतीच्या किरकोळ कुरबुरी सुरू होत्या. मात्र सोमवारी अत्यंत किरकोळ आजाराचे निमित्त झाले आणि या जगविख्यात गायिकेने राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
- 3 / 13
किशोरीताई आमोणकर या हिंदुस्थानी गानपरंपरेतील महत्त्वाच्या गायिका होत्या. संगीतातील जयपूर घराण्याच्या त्या अध्वर्यू मानल्या जात.
- 4 / 13
किशोरीताईंचा जन्म मुंबई येथे १० एप्रिल १९३२ रोजी झाला. १९४० च्या दशकात त्यांनी भेंडी बझार घराण्याच्या गायिका अंजनीबाई मालपेकर यांच्याकडे गाण्याचे धडे घेण्यास सुरुवात केली.
- 5 / 13
जयपूर अत्रौली घराण्याच्या तालेवार गायिका मोगुबाई कुर्डीकर या किशोरीताईंच्या मातोश्री. त्यामुळे गाणे वारसाहक्काने त्यांच्याकडे आले होतेच. मात्र केवळ वारसाहक्कावर समाधान न मानता विलक्षण गुणग्राहक वृत्तीने किशोराताईंनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जे जे मोलाचे ते ते वेचले आणि आपले गाणे समृद्ध केले.
- 6 / 13
‘गीत गाया पत्थरों ने’ या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी १९६४ साली प्रथम पार्श्वगायन केले. मात्र काही काळातच त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या. त्यानंतर थेट १९९० मध्ये ‘दृष्टी’ या हिंदी चित्रपटासाठी गायल्या.
- 7 / 13
संगीत क्षेत्रातील योगदानासाठी किशोरीताईंना १९८५ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९८७ साली पद्म भूषण, २००२ साली पद्म विभूषण हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
- 8 / 13
किशोरीताईंना २००९ साली संगीत नाटक अकादमीची फेलोशिपही मिळाली होती.
- 9 / 13
शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग, अत्यंत कमी प्रमाणात गायलेली भावगीते, चित्रपटगीते हे किशोरीताईंनी मागे ठेवलेले संचित. आवाजावरील हुकूमत, स्वरांमध्ये पूर्ण बुडून जाण्याची क्षमता, सर्जकता, अभ्यास अशा अनेक गुणवैशिष्टय़ांमुळे किशोरीताईंचे गाणे कधी खुंटले नाही.
- 10 / 13
अवघा रंग एक झाला, मी माझे मोहित, जनी जाय पाणियासी हे त्यांचे अभंग, तसेच म्हारो प्रणाम ही मीरेची भजने लोकप्रिय होती. जाईन विचारीत रानफुला, हे श्यामसुंदरा.. ही हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली गाणीही गाजली.
- 11 / 13
‘स्वरार्थ रमणी राग सिद्धांत’ हा ग्रंथ किशोरीताईंनी लिहिला होता.
- 12 / 13
संगीत स्वरांचं असतं, हा ताईंचा विचार नव्यानं गाणं शिकणाऱ्यांसाठी फारच महत्त्वाचा असा आहे.
- 13 / 13
किशोरीताई आज आपल्यात नाही हा एक मोठा धक्का आहे. एखादा राग वेगळ्या नजरेतून बघणे हे त्यांचे गुण केवळ दैवी होते. जरी त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या संगीताचा अमूल्य ठेवा कायम आपल्यात अविरत राहील.