Bihar election : “मला त्यांचं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण करायचं”
- 1 / 10
बिहार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवत असलेली लोक जनशक्ती पार्टी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात भूमिकात घेत स्वतंत्र निवडणूक लढवत असलेल्या लोजपाच्या यशाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्यामागील कारणाचा खुलासा केला आहे. (सर्व छायाचित्र संग्रहित/इंडियन एक्स्प्रेस)
- 2 / 10
लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी 'एनडीटिव्ही'शी संवाद साधताना स्वतंत्र लढण्याच्या निर्णयावर भूमिका मांडली. "अचानक वडिलांचं जाणं माझ्यासाठी खूप अवघड आहे आणि मला त्यांची खूप उणीव जाणवतेय. अशा परिस्थितीसाठी कुणीही मानसिकरित्या आधीच तयार असत नाही. खरं सांगायचं म्हणजे या गोष्टीसाठी सध्या तरी मी बिलकुल तयार नव्हतो."
- 3 / 10
"राज्यात निवडणुका होत आहेत आणि ते माझ्यासोबत नाहीत. ते माझी ताकद होते. मी नेहमी विचार करायचो की ते माझी शक्ती आहेत आणि मी पूर्ण जगाशी लढू शकतो. आता ते आपल्यात नाहीत. पण मी कुमकुवत झालेलो नाही. पुढेही लढत राहिलं," असं चिराग पासवान म्हणाले.
- 4 / 10
"मला त्यांचं स्वप्न पुर्ण करायचं आहे. पक्षानं स्वबळावर राज्यात निवडणुका लढवाव्यात हे त्यांचं सर्वात मोठं स्वप्न होतं. त्यासाठी ते मला नेहमी प्रोत्साहित करायचे. ते मला म्हणायचे की, 'मी (रामविलास पासवान) २००५ मध्ये असा निर्णय घेतला होता. तू तर अजून तरूण आहेस, तू का असा निर्णय घेत नाही,' अशी आठवण चिराग पासवान यांनी सांगितली.
- 5 / 10
"त्यांचं (रामविलास पासवान) म्हणणं होतं की स्वबळावर निवडणूक लढली तरच पक्ष वाढेल. ते मला म्हणाले होते की, सध्या मुख्यमंत्री असलेला व्यक्ती तुझ्यामुळे आणखी पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होत असेल, तर दहा वर्षानंतर तुला पश्चताप होईल की, तुझ्यामुळे बिहारची ही अवस्था आहे."
- 6 / 10
"त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी हे सगळं सुरू होतं. त्यावेळी भाजपाचे नेते नित्यानंद राय, शहनवाज हुसैन, रामकृपाल यादव यांच्याशी ते भेटले होते. त्यांनी स्वतंत्र लढण्यासंदर्भात या सगळ्यांशी चर्चा केली होती," असंही चिराग पासवान म्हणाले.
- 7 / 10
चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. त्यावेळी रामविलास पासवान यांना रुग्णालयात भरती करण्यात आलेलं होतं. ऐन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात असतानाच पासवान यांचं निधन झालं.
- 8 / 10
रामविलास पासवान यांच्याकडे एकदा बिहारच्या मुख्यमंत्री होण्याची संधी आली होती. लालू प्रसाद यादव, नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होण्याची त्यांच्याकडे संधी होती. मात्र, मुस्लीम व्यक्तीला मुख्यमंत्री बनवण्याचा सल्ला देत त्यांनी प्रस्ताव फेटाळून लावला होता.
- 9 / 10
रामविलास पासवान यांना राज्यातील राजकारणात फारसा रस नव्हता. ते दिल्लीतील राजकारणात रमायचे. ते स्वतःकडे राष्ट्रीय स्तरावरील नेता म्हणूनच बघायचे आणि तशा पद्धतीनंच पुढे येण्यासाठी प्रयत्न करायचे.
- 10 / 10
मुलगा चिराग पासवान बिहारचा मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी एकदा माध्यमांशी बोलताना बोलून दाखवली होती. त्यामुळेच २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी लोजपाची सूत्रं चिराग पासवान यांच्याकडे सोपवली होती. (सर्व छायाचित्र संग्रहित/इंडियन एक्स्प्रेस)