२०२१ चा पहिला आठवडा कसा असेल; वाचा १२ राशींचं भविष्य
- 1 / 12
चंद्राचे भ्रमण षष्ठस्थानाकडून अष्टमस्थानाकडे होत आहे. स्वतवरचे नियंत्रण सोडू नका. सोपा मार्ग नसला तरी अवघडही नाही. नोकरीमध्ये कोणतीही मनामध्ये आडकाठी न ठेवता कामावर लक्ष केंद्रित करा. उशिरा का होईना परिश्रमाला फळ मिळेल. दुसऱ्यांच्या डावपेचाकडे लक्ष न देता व्यापारीवर्गाने मोठी गुंतवणूक करताना शांतपणे विचार करा. आवक पाहून जावक ठरवा. न जमणाऱ्या गोष्टींमध्ये हात घालू नका. खर्च आटोक्यात ठेवला तर पैशाची अडचण निर्माण होणार नाही. राजकीय घडामोडींमध्ये समयसूचकतेने काम करा. थोडय़ा कालावधीसाठी का होईना मित्रांची मदत उपयोगी पडेल. मुलांसाठी केलेल्या तरतुदींचे नियोजन बदलू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. >> शुभ दिनांक : ७, ८ >> महिलांसाठी : नको ते विचार मनात घोळत बसणे टाळा.
- 2 / 12
चंद्र व शुक्राचा शुभयोग गुरू व चंद्राचा एकमेकांशी होणारा योग चांगले फळ देणारा ठरेल. वास्तवतेला महत्त्व देत प्रत्येक कार्य जोमाने पार पाडाल. नियमित व वेळेवर ज्या गोष्टी व्हाव्यात असे वाटते त्या मात्र वेळेत करून घेण्याचा प्रयत्न यशस्वी करा. नोकरीमध्ये सकारात्मक गोष्टी वाढतील. किचकट गोष्टींचा सामना कमी होत जाईल. अधिकार प्राप्त होण्याचे मार्ग तुमच्या पुढे येऊन उभे राहतील. त्याचा पुरेपूर वापर करून घ्या. व्यावसायिकदृष्टय़ा कामातील गती वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात इतरांनी केलेली लुडबुड तुम्हाला चालणार नाही. लेखन क्षेत्रात अनेक नव्या कल्पना समोर येतील. धनदायक गोष्टीत वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात काही बदल पटकन करण्याचा निर्णय घ्याल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. धार्मिक गोष्टींची ओढ राहील. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. >> शुभ दिनांक : ५, ६ >> महिलांसाठी : मानसिक अस्वस्थता कमी होईल.
- 3 / 12
सप्तमस्थानात रवी आणि शुक्र धनू राशीत आहेत. त्यांचा चंद्राशी होणारा योग शुभ कार्य घडवून आणेल. नोकरीमध्ये तारेवरची कसरत कमी होईल, असे असले तरी प्रयत्न सोडून चालणार नाही. कष्ट करणे हे ध्येय मनात ठेवून प्रयत्नवादी राहा. कामाचा बोजा कमी करून योग्य त्या गोष्टीचा अंमल करणे हिताचे ठरेल. व्यवसायामध्ये मात्र एक ना धड भाराभर चिंध्या असे करून चालणार नाही. दोन गोष्टींऐवजी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव सध्या तरी करू नका. आर्थिक नियोजन आधी ठरवून केल्यास खर्च कमी होतील. मित्रपरिवार मदतीला येईल. भाऊबंदकीचा प्रश्न सुटण्याच्या मार्गी असेल. आरोग्य उत्तम राहील. >> शुभ दिनांक : ७, ८ >> महिलांसाठी : अडचणींचा सामना कमी होईल.
- 4 / 12
शुभ ग्रहांची ताकद वाढेल. मोठा उत्साह निर्माण होईल. बऱ्याच दिवसांपासून आजचे काम उद्या करू. अशी परिस्थिती निर्माण होत होती. धाडसी पराक्रम यशस्वी होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांचा असलेला प्रतिसाद, तुमच्या कार्याची दाद देणारा ठरेल. नोकरीमध्ये नावीन्यपूर्ण सुविधा वाढतील. काळजीचे वातावरण कमी होईल. व्यापारी क्षेत्रात प्रगती होईल. आता बाहेरच्या गोष्टी आवाक्यात येतील. व्यवसायातील संभ्रमित स्थिती बदलेल, आणखी स्वरूप बदलण्यासाठी स्वतंत्र विचार करा. त्याचा परिणाम चांगला राहील. पैशांच्या बाबतीत जमेची बाजू राहील. राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी मिळेल. एकूणच सप्ताह आनंददायी ठरेल. मुलांसाठी आगळेवेगळे पाऊल उचलाल. उपासना फलद्रूप होईल. शारीरिक समतोल उत्तम राखता येईल. >>शुभ दिनांक : ३, ९ >> महिलांसाठी : वेळेची कमतरता भरून निघेल.
- 5 / 12
मनाला लागणारी हुरहुर कमी होईल. ग्रहांची साथ उत्तम मिळेल. नोकरीचा हलका सूर मनाची स्थिरता वाढवेल. आतापर्यंत संयम उपयोगी पडेल. नियोजित गोष्टींचा प्रारंभ चालू होईल. सुरुवातीपासून केलेली तयारी यशस्वी होईल. व्यावसायिकदृष्टय़ा देवाणघेवाण वाढवणे शक्य होईल. मालाच्या उत्पादनात वाढ होईल. प्रत्यक्ष व्यवहार करा. इतरांवर जबाबदारी टाकू नका. मोठय़ा व्यावसायिकोंचा दर्जा उंचावेल. व्यवसायातील उलाढाल वाढलेली असेल. व्यापारी क्षेत्राची नवी सुरुवात होईल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. पैशांच्या बाबतीत जमेची बाजू राहील. राजकारणातील वाटचाल यशस्वी ठरेल. नातेवाईक तुमची विचारपूस करतील. कौटुंबिक दुरावा कमी करण्याचा प्रयत्न कराल. आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल. आरोग्याचे स्वास्थ्य उत्तम राहील. >> शुभ दिनांक : ४, ५ >> महिलांसाठी : स्थिर विचार करण्याचा प्रयत्न करा.
- 6 / 12
सप्ताहाची सुरुवात आळसदायक करू नका. कामातील गती वाढवण्याचा प्रयत्न करा. नव्या नोकरीसाठी सध्या तरी प्रयत्न करणे टाळा. नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीपासून लांब राहा. धरसोड वृत्ती कमी करा. व्यापार-व्यवसायाचे चित्रीकरण बदललेले दिसेल. अस्थिर परिस्थितीचा अंदाज घ्या. उत्पन्नाचे पैलू ओळखून गुंतवणूक ठरवा. भूलथापांना बळी पडू नका. रोखीच्या व्यवहारांना महत्त्व द्या. खर्च ठरवून ठेवलेल्या गोष्टींना वेगळे वळण लागणार नाही याची काळजी घ्या. खर्च कमी केल्यास आर्थिक प्राप्ती चांगली राहील. राजकीय क्षेत्रात न जमणाऱ्या गोष्टींसाठी शब्द देणे टाळा. भावंडांच्या बाबतीत घाईचे निर्णय घेऊ नका. कौटुंबिक कलह कमी करण्याचा प्रयत्न करा. आध्यात्मिक उपासनेकडे मन वळेल. प्रकृती उत्तम असेल. >> शुभ दिनांक : ५, ७ >> महिलांसाठी : द्विधा मन:स्थितीतून बाहेर पडा.
- 7 / 12
पराक्रम स्थानातील शुक्र, रवी यांचा लाभस्थानातील चंद्राशी होणारा शुभयोग उत्तम राहील. नोकरदार व्यक्तींनी हेवेदावे बाजूला ठेवावे. नोकरीचा सूर लक्षात घ्या. नेमक्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. तणावमुक्त काम करा. व्यापारी क्षेत्रात धर्य बाळगणे हिताचे ठरेल. व्यापारी कामे परिपूर्ण तयारीने करा. अचानक कोणताही बदल करू नका. प्रत्येक गोष्टीचे पाऊल हे विचारपूर्वक टाका. त्यामुळे नुकसान होणार नाही. उधार वसुली करताना काळजी घ्या. इतरांना फटकून बोलणे टाळा. राजकीय क्षेत्रात कोणतीही गोष्ट धारेवर धरू नका. मित्रांचे सहकार्य उत्तम राहील. आगामी काळासाठी मुलांसाठी केलेली तरतूद योग्य असेल. कुटुंबामध्ये हसतेखेळते वातावरण ठेवा. शारीरिक दगदग करू नका. >> शुभ दिनांक : ८, ९ >> महिलांसाठी : इतरांशी तुलना करणे टाळा.
- 8 / 12
परिस्थितीनुसार घेतलेला निर्णय योग्य ठरेल. प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे चीज होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा राहील. मिळालेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी लागेल. नोकरदार व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी कार्यमग्न राहणे उत्तम राहील. अपेक्षित क्षेत्रात जाण्यासाठी सप्ताह सोनेरी पायघडय़ा टाकणारा ठरेल. नियोजनबद्ध केलेल्या कामात हक्काचे यश मिळेल. व्यापारीवर्गात कष्टाचे प्रमाण वाढेल, पण त्या प्रमाणात फायद्याचे प्रमाणही वाढेल. मिळालेल्या फायद्याचे स्वरूप मात्र खर्चात बदलू नका. राजकीय क्षेत्रातील इतरांच्या कामावर चर्चा करूनका. मोकळा वेळ कुटुंबासाठी द्या. तुमचे नियोजन तुमच्या धर्मपत्नीशी चर्चा करून ठरवा. उपासनेत मन रमवा. मानसिक एकाग्रता वाढवा. प्रकृती निरोगी व उत्तम राहील. >> शुभ दिनांक : ५, ९ >> महिलांसाठी : कोणतेही दडपण न घेता काम करा.
- 9 / 12
चंद्राचे भ्रमण भाग्यस्थानाकडून लाभस्थानाकडे होत आहे. संघर्षदायक वातावरण कमी होईल. अवघड वाटणारी वाटचाल सोपी होईल. नोकरदार व्यक्तींना मोठा दिलासा मिळेल. नवीन संशोधन फलद्रूप होईल. बुद्धीचे चातुर्य उत्तम राहील. धडाडीने निर्णय घेणे सोपे होईल. व्यवसायात होणारी उचलबांगडी कमी होईल. लघुलेखन, वृत्तपत्र, संपादक, पत्रकार इत्यादी क्षेत्रांतील व्यक्तींना आपले मुद्दे योग्य पद्धतीने मांडता येतील. व्यावसायिक यश चांगले मिळेल. आर्थिक गोष्टींचा बोजवारा कमी होईल. धनाचे मार्ग मोकळे होण्यास मदत होईल व राजकीय घडामोडींचा आढावा घेताना संयम बाळगा. प्रत्येक गोष्ट नियमात राहून करा. घरातील सदस्यांसमवेत एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन कराल. इतरांच्या बरोबर स्वतचीही काळजी घ्या. >> शुभ दिनांक : ३, ७ >> महिलांसाठी : युक्तिवाद कामी पडेल.
- 10 / 12
सप्ताहाच्या पूर्वार्धात विचारांचे काहूर कमी करा. सुरुवात अडचणीची समजून हार मानू नका. पुढे काही सुधारित योजनांचा पाठपुरावा करावा लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी योग्य मुद्दे मांडा, त्यानंतर त्यावर काम करा. व्यावसायिकदृष्टय़ा चालू कामकाजात गती वाढेल. फुले-फळे, अत्तर, सुगंधी वस्तू यांचा व्यवसाय असणाऱ्यांना उत्तम लाभ मिळेल. शेती व्यवसायाला लागणारे कष्ट थोडे कमी होतील. कामे यशस्वी होतील. खर्चाचा ताणतणाव कमी होईल. फायद्याचे प्रमाण चांगले राहील. आत्मिक समाधान लाभेल. सामाजिक क्षेत्रातील संकल्पना पूर्ण होतील. सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. वैवाहिक स्तरावर जोडीदार तुमचे कौतुक करेल. नातेवाईकांशी बिघडलेले संबंध सुधारू लागतील. दैव अनुकूल राहील. >> शुभ दिनांक : ५, ९ >> महिलांसाठी : नियोजनपूर्व कामे करावी लागतील.
- 11 / 12
कार्यक्षमता वाढवण्याचा कल जरी असला तरी द्विधा अवस्था होऊ देऊ नका. कर्मचारीवर्गाला कामाचा ताण कमी होईल. विनाकारण होणारी धावपळ आता कमी करता येईल. प्रत्येक कामात सूत्रबद्धता अंगी बाणा. व्यावसायिक कल लक्षात घ्या. दलाली व्यवसायात यश मिळेल. इतर गोष्टींसाठी वेळ वाया घालवू नका. फक्त कामासाठी वेळ द्या. कामातील कमतरता भरून काढा. सतत होणारी आर्थिक अडचण कमी करा. नेमक्या गोष्टींसाठी खर्च करा. उधारीचा व्यवहार टाळा. रोखीच्या व्यवहाराला महत्त्व द्या. राजकीय क्षेत्रात महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. मुख्य ध्येय विकसित करा. घरगुती वादविवाद चव्हाटय़ावर आणू नका. मुलांना चार हिताच्या गोष्टी समजावून सांगा. आध्यात्मिक गोष्टीत मन रमवा. प्रकृतीचे पथ्यपाणी सांभाळा. >> शुभ दिनांक : ७, ८ >> महिलांसाठी : अडचणीवर मात करायला शिका.
- 12 / 12
चंद्र ग्रहाचे भ्रमण षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होत आहे, तेव्हा मनाची अस्थिरता कमी करा. सध्या घाईची कृती करणे टाळा. कामावरती नकळत घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. इतरांशी जमवून घेण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात नको त्या ठिकाणी धाडस वाढवू नका. व्यावसायिक चढ-उतार लक्षात घ्या. हिशोबाच्या नोंदी ठेवा. भागीदारी व्यवसाय नव्याने चालू करू नका. गुंतागुंतीच्या व्यवहारात हात घालणे टाळा. आर्थिक गोष्टी योग्य पद्धतीने हाताळा. अनावश्यक गरजा टाळा. समाजमाध्यमाद्वारे चुकीचा संदेश देऊ नका. घरातील सदस्यांबरोबर वादविवाद टाळा. जोडीदाराच्या सल्लामसलतीने निर्णय घ्या. अतिविचार करणे टाळा. अध्यात्मात मन गुंतवा. शारीरिकदृष्टय़ा प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. >> शुभ दिनांक : ५, ९ >> महिलांसाठी : स्वतसाठी वेळ द्या.