त्या निरागस जीवांना आईची कूसही मिळाली नाही
- 1 / 11
काळोखानं व्यापून गेलेल्या याच कक्षात त्या जिवांना ठेवण्यात आलं, जिथे त्यांचा किलकिलाट सुरू होता. पण आता तिच खोली स्मशानगत सुन्न झाली आहे. त्या दहा जिवांना इथं नीट श्वासही घेता आला नाही. (छायाचित्रं/संजय राऊत-लोकसत्ता)
- 2 / 11
इवल्या इवल्या चिमुकल्या पावलांची घरात चाहूल लागल्यानंतर वृद्धांपासून सगळ्या घरालाच आनंदाची भरती येते. माय बापासह घरातील वृद्ध कोवळ्याची जिवाची चातकासारखी वाट बघत असतात. कितीतरी स्वप्न आणि आकांक्षाना धुमारे फुटायला लागतात. हा निरागस सजीव देह हातात घेताना माय बापाच्या डोळ्यातील आनंदाला पारावार राहत नाही. परिस्थितीही कशीही असली, तरी 'रोप आपुलच पर होईल येगळं, दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळं,' असं म्हणत त्याच्यासमोर सगळा आनंद ठेवण्याचा जन्मदाते मनाशी निर्धार करतात. (छायाचित्रं/संजय राऊत-लोकसत्ता)
- 3 / 11
पण, या आनंदालाच नजर लागली तर? तीही कधीही भरून न येणाऱ्या दुर्दैवी काळाची... मग त्या जन्मदात्यांच्या आयुष्यात काय होऊ शकतं?
- 4 / 11
हे सगळ्या महाराष्ट्रानेच नव्हे, तर देशात शनिवारी अनुभवलं. भंडारा जिल्हा रुग्णालयात जगण्याची जिद्द घेऊन जन्माला आलेल्या दहा निरागस, निष्पाप चिमुकल्यांना आईची कुसही मिळाली नाही.
- 5 / 11
जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या उपचारासाठी असलेल्या अतिदक्षता शिशू केअर यूनिटमध्येच जणू काळ दबा धरून बसला होता.
- 6 / 11
शनिवारच्या मध्यरात्री काळाला संधी मिळाली आणि दहा चिमुकल्यांच्या आनंदानं हरखून गेलेल्या कुटुंबांच्या आनंदात राख कालवून गेला.
- 7 / 11
काही हाती वेळीच तिथपर्यंत पोहोचले म्हणून सात जीवांना काळाच्या दाढेतून बाहेर काढता आलं नाही, तर आणखी काही कुटुंबांना दुःखाचा प्रहार झेलावा लागला असता. (छायाचित्रं/संजय राऊत-लोकसत्ता)
- 8 / 11
रात्रीला निद्रिस्त पडलेल्या या जिवांना सकाळी आईची भेट होणार नाही, याची किंचितशीही कल्पना नसेल. तर दुसरीकडे सकाळी हसरं तोंड बघता येईल म्हणून त्या 'आई'ही पटकन रात्र सरो म्हणून पापणी लावली असेल.
- 9 / 11
काळ आला आणि त्यांच्या आयुष्यात इवल्या इवल्या पावलांनी येणारा आनंद हिरावून घेऊन गेला.
- 10 / 11
रात्रीच्या अग्नितांडवात त्यांनी बघितलेल्या निरागस स्वप्नांची सकाळपर्यंत राख झाली.
- 11 / 11
एका रात्रीत आनंदाची जागा दुःखाने घेतली. आनंदाश्रू दुःखाच्या धारामध्ये बदलले. सगळं गलितगात्र झालं... त्या मातांचा टाहो... प्रत्येकाच्या काळजाला चिरत गेला.